मिसिंग आउट एनीथिंग?

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

ब्लॉग
 

समजा, पॅरिसचा माइंड ब्लोइंग व्ह्यू इन्स्टाला अपलोड करूनही तासाभरात फारसे लाईक्स आले नाहीत किंवा 'ब्लॅक अँड व्हाइट फोटो चॅलेंज'मध्ये तुम्हाला सोडून तुमच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये असणाऱ्या सगळ्यांना कोणी ना कोणी टॅग केलंय किंवा फेसबुक ग्रुपवर पाठवलेली इन्स्टंट लाडवांची रेसिपी दिवाळी संपली तरी अॅडमिननं अॅप्रूव्ह केली नाहीये किंवा  #OOTD ट्रेंडिंग असताना कोणालाही तुमचा हवा तसा बुमरँग जमत नाहीये... किंवा ट्विटरवर सुरू असणाऱ्या एखाद्या ट्रेंडवर नेमकं काय लिहायचं हे काही केल्या सुचत नाहीये... काय वाटेल? वैताग.. चिडचिड.. त्रास.. थोडूसं डिप्रेशन..?

हल्ली हे माझ्याबरोबरही सतत होतं. मी कुठंही बाहेर गेले, नवं पुस्तक घेतलं वाचायला, काही नवं ट्राय आउट केलं किंवा एखादा क्षणिक पण नवा विचार डोक्यात आला, की मला शक्य तितक्या लवकर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते अपडेट करायचं असतं. सोशल मीडिया हाताळण्यासाठी मी माझ्या मेंदूचे कप्पे केलेत की काय असंही मला कधीकधी वाटतं. फेसबुकवर काहीतरी हलकंफुलकं लिहिणं, ट्विटरवर ट्रेंड्सनुसार स्वतःची मतं मांडणं, कोरावर जगभरातल्या अनोळखी लोकांचे असंबद्ध प्रश्न सोडवणं आणि लिंक्डइनवर माझ्यात असणारी वर्किंग लेडी प्रोफेशनली काय विचार करते हे व्यक्त करणं.. हे सगळं माझं रोज सुरू असतं, अगदी अनइंटरएप्टेड. स्वतःचं पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल असं तीन पातळ्यांवर सुरू असणारं आयुष्य जास्तीत जास्त हॅपनिंग ठेवण्याचा प्रयत्न मी दिवसरात्र करते. साहजिकच सोशल मीडियावर २४ तास अॅक्टिव्ह असणं ही मी माझी गरज बनवून घेतलीये, जे अगदी ऑब्व्हियस आहे म्हणा. सतत अपडेटेड राहण्याची ही गरज माझ्याकडून कुठंही काही मिस होऊ नये, मी कोणाच्याही मागं पडू नये या भीतीतून असते. ही अशी ‘मिस आउट’ होण्याची भीती आजच्या युथमध्ये अगदी कॉमन आहे. खरं तर सोशल मीडियाच्या अतिरेकानं ती वाढतीये. फोमो म्हणतात याला, ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’.

‘फिअर ऑफ मिसिंग आउट’ म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अॅक्च्युअल किंवा व्हर्चुअल माणसांपासून वेगळं किंवा एकटं पडण्याची भीती. असं घडू नये म्हणून सतत एकमेकांशी कनेक्टेड राहण्याची किंवा अगदी सहज इतरांना अॅव्हेलेबल होण्याची निकड. यामध्ये स्वतःचा स्पेस असणं, स्वतःबरोबर वेळ एन्जॉय करता येणं यापेक्षाही सतत ‘सोशल’ असणं महत्त्वाचं वाटत राहतं. इतरांनी अपडेट केलेली स्टेट्स किंवा स्टोरीज पाहून, आपण तिथं का नाही हे सतत डोक्यात येत राहतं. सोशल मीडियावर सुरू असणारे ट्रेंड्स किंवा चॅलेंजेस मिस झाले, की वाईट वाटतं. एखादी नवी सीरिज, मूव्ही, नवं पुस्तक, नव्यानं लाँच झालेलं गाणं आपल्याला ‘अजूनही’ माहीत नाही यामुळं स्वतःवर चिडचिड होते. शाळा-कॉलेजचं रियुनियन, मित्रांची विकेंड पार्टी, ऑफिमध्ये कलिगचा बर्थडे आपल्याशिवाय होऊ शकतो हे झेपत नाही. मग सुरू होते धडपड या व्हर्चुअल जगात एकटं न पडण्याची.

खरं तर हार्वर्डमध्ये एमबीए झालेल्या पॅट्रिक जे. मॅकगिनिसने जेव्हा पहिल्यांदा फोमो ही टर्म वापरली त्यावेळी सुरुवातीला ती फोबो (फिअर ऑफ अ बेटर ऑप्शन) अशी होती. न्यूयॉर्कमध्ये ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आलेली अनिश्चितता हे फोबो मागचं कारण. पुढं बेटर ऑप्शनपेक्षा, ते ऑप्शन मिस होण्याची आपल्याला भीती वाटतीये हे मॅकगिनिसच्या लक्षात आलं आणि फोमो वापरलं गेलं. सुरुवातीला फोमोचा वापर हा अगदीच प्रोफेशनल कॉन्टेक्स्टमध्ये झाला. कोणत्याही कामाचे उत्तम रिझल्ट्स मिळवताना कोणतातरी एखादा पर्याय मिस होणं या भीतीसाठी फोमो वापरलं जायचं. पुढं जसजसे या शब्दाचे संदर्भ बदलत गेले, याचा अर्थही बदलला. पण सगळ्याच्या तळाशी असणारी भीती मात्र सगळ्या बदलांना पुरून उरली.

एकटं पडण्याची भीती असणं यात मला खरंच काही वावगं वाटत नाही. खरं तर ही अशी भीती सोशल मीडियाची बूम नसतानाही होतीच की. शाळेत, कॉलेजमध्ये आपला ग्रुप नसणं, एकट्यानं बसून डबा खावा लागणं, उन्हाळ्याच्या सुटीत नेमकं आपल्याला गावाला जाता न येणं या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये फोमो डोकावून जायचाच. आता प्रमाण वाढलंय, हरकत नाही. सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे’ अशी स्थिती असताना, आपण कमी पडतोय, आपल्या आयुष्यात काही घडत नाहीये, आपण हवे तितके कुल नाहीये असं वाटणं साहजिक आहे. गरज आहे ती याला हाताबाहेर कसं जाऊ द्यायचं नाही याची काळजी घेण्याची. त्यापासून लांब पळणं किंवा लांब राहणं हा उपाय असू शकत नाही असं मला वाटत. कधीतरी कुठंतरी हा एकटेपणा, हे मिस आउट होण्याचं फिलिंग गाठणार तुम्हाला, ही फॅक्ट आहे. मग त्यापासून दूर पळण्यापेक्षा, महिन्यातून काही दिवस सोशल मीडिया डिटॉक्स करून स्वतःबरोबर एकट्यानं वेळ एंजॉय करण्याची सवय लावता आली तर?

संबंधित बातम्या