मर्द को दर्द?

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 9 डिसेंबर 2019

ब्लॉग
 

गेल्या आठवड्यात 'इंटरनॅशनल मेन्स डे'ला आयुष्मान खुरानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 'जेंटलमन किसे कहते हैं?' असं हेडिंग असणारी, गौरव सोळंकीची कविता होती ती. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ही कविता, तिचा कंटेन्ट गाजला. अनेकांनी आपापली स्टेटस या कवितेने अपडेट करून 'इसे कहते हैं असली मर्द' वगैरे लिहून 'हॅप्पी मेन्स डे'ही विश केलं.

सेंटी होणारा, राजकारणापेक्षा वाणसामानावर चर्चा करणारा, नीट ड्राईव्ह न करता येणारा, घरातल्या छोट्यामोठ्या दुरुस्त्या न जमणारा, स्वयंपाकघरात लुडबुडण्याची - खरेदीची हौस असणारा, चारचौघांत भांडण किंवा मारामारी करता न येणारा, ऐनवेळी समोरच्यावर आवाज चढण्याऐवजी डोळ्यात पाणी येणारा, कासावीस होणारा... एकूण काय तर कोणत्याही अँगलने 'हिरो' नसणारा 'तो' या कवितेनं सगळ्यांसमोर आला आणि पुरुष असण्याच्या स्टिरीओटाइप चौकटींपलीकडं असणारं त्याचं हे माणूसपण, मला प्रेमात पाडून गेलं त्याच्या.

बाप, भाऊ, नवरा, प्रियकर आणि मित्र या ठराविक चौकटींच्या पलीकडं 'पुरुष' नावाचं काहीतरी असू शकेल असा विचार येतंच नाही डोक्यात फारसा. आपल्या आसपास असणारे पुरुष हे याच चौकटींमध्ये वावरत असतात आणि आपणही नात्यांचे ठराविक संदर्भ मेंदूत पक्के करत, त्यांच्या प्रत्येक हालचालींचे अर्थ लावत असतो. आयुष्यात नव्यानं येणाऱ्या कोणत्याही पुरुषाला एका ठराविक चौकटीचा किंवा नात्याचा टॅग लावला की मला उगाच रिलॅक्स वाटतं. 'हा कोण?' याचं उत्तर मला देता यायला हवं अशी उगाच एक जबरदस्ती असते माझी स्वतःवर, कारण त्या नात्याची चौकट, तिच्या मर्यादा-रिलेशनशिपची पेरिफेरी हे सगळं माझ्यापुरतं डिफाइंड असतं. या पलीकडचा पुरुष मला एक्सप्लोर करायचा नसतो. का? कारण फक्त पुरुष म्हणून त्याचं असणारं अनोळखीपण मला झेपलं नाही, तर ते मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडं नसतो. संदर्भ आणि स्पष्टीकरणाशिवाय आयुष्यात येणारे पुरुष हे 'प्रत्येक बाईचा फक्त वापर करायचा' एवढा एकच अजेंडा डोक्यात ठेवून आसपास वावरत असतात याचं हॅमरिंग इतकं झालेलं असतं, की 'त्याच्याबद्दल' वेगळा काही विचार करण्याची इच्छाही होतं नाही.

एकीकडं त्याचं अनोळखी असणं मला सहन होतं नाही, तर दुसरीकडं 'ओळखीचा तो' नेहमीचंच झाल्यासारखा वागतो, हे समजून घेता येतं नाही. त्यानं एकाचवेळी स्वतःची सगळी टेन्शन्स सांभाळून मला हवं ते सगळं करत आयुष्य बॅलन्स करावं अशी अपेक्षाही असते माझी. माझी सतत काळजी करावी, मला सतत पॅम्पर करावं, माझ्या प्रत्येक विचाराचं, कृतीचं कौतुक करावं, माझ्यातल्या प्रत्येक बदलाचं समर्थन करावं, झालाच तर त्याला सपोर्ट करावा. माझ्यात घडणाऱ्या शारीरिक, मानसिक, भावनिक आंदोलनांना माझ्याबरोबरीनं साथ द्यावी, मला डिप्रेशन, माझं फ्रस्ट्रेशन यातून बाहेर पडायला मदत करावी आणि हे सगळं करताना माझ्यातल्या 'स्त्रीवादी' विचारांना ग्लोरिफाय करावं असं किती नी काय काय असतं या अपेक्षांमध्ये. या सगळ्यामध्ये 'भावना' जेंडर बायस्ड कशा असतील? हे डोक्यातही येतं नाही. तो रडू शकतो, चिडू शकतो, रुसू शकतो, वैतागू शकतो, आसपास घडणाऱ्या अनेक गोष्टींचा त्यालाही त्रास होऊ शकतो हेच विसरायला होतं.

यात पुन्हा तो 'पुरुष' आहे म्हणून 'हे तर करायलाच हवं त्यानं, हे किमान अपेक्षित आहे त्याच्याकडून' वगैरे साइड लिस्ट वाढत जाते. यात त्याला काय करायचंय, कसं जगायचंय, माझ्या सततच्या आसपास असण्यानं तो वैतागतो का? हरवतो का? हे अगदी कधीतरी डोक्यात येतं. असं व्हायला नको खरं तर. त्याचाही विचार मला माझ्याबरोबरीनं करता यायला हवा आणि तोही त्याचं पुरुष असणं बाजूला सारून. त्याच्या गरजा, त्याचं आयुष्य, त्याचे विचार हे फक्त त्याचे, स्वतःपुरते, स्वतःचा विचार करणारे असू शकतात हे मान्य करता यायला हवं.
 माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरुषानं मला कोणत्या न कोणत्या प्रकारे समृद्ध केलंय. माझ्यातल्या बाईपणाला चुचकारत जवळीक साधण्याचे असंख्य पर्याय उपलब्ध असतानाही, मला कुठंही अनकंफर्टेबल फील करू न देता कुशीत घेतलंय, थोपटलंय. त्यांनी माझ्या जेंडरचा ना कधी एक्सक्यूझ दिलाय ना कारण. मध्यरात्री रिक्षातून भटकताना, रात्री पबमध्ये एका कोपऱ्यात बसून असताना, फेसबुकवर अनोळखी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करताना, घरात एकटीनं कोणतीही दुरुस्ती करून घेताना भेटलेला अनोळखी तो माझ्या विचारांच्या बरोबरीनं बदललाय. कदाचित माझंच त्याच्याकडं बघणं, त्याला जज करणं अजूनही ठराविक चौकटीबाहेर गेलं नाहीये. दोन हात फैलावून, 'नाम तो सुना ही होगा' म्हणत, शिफॉन साडीत पळत येणाऱ्या हिरोइनला बाहुपाशात घेणारा हिरो आजही, मिशन अयशस्वी झालं म्हणून रडणाऱ्या नासा प्रमुखांपेक्षा मर्दानी वाटतो, इथंच गंडत सगळं. कारण 'मर्द को दर्द नही होता' हे डोक्याबाहेर जातच नाही. मर्द को दर्द? होता हैं बॉस.. बिलकुल होता हैं।

संबंधित बातम्या