याचसाठी का केला होता...?

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 23 डिसेंबर 2019

ब्लॉग
 

वर्षभराच्या सगळ्या महिन्यांमध्ये का कुणास ठाऊक, पण मला नेहमीच डिसेंबर हा कन्क्ल्युजन काढणारा महिना वाटतो. तो वर्षाचा शेवटचा महिना आहे, म्हणूनही असेल कदाचित. वर्षाच्या सुरुवातीला असणारे तुम्ही, वर्ष संपेपर्यंत काय आणि किती बदलला याचा हिशोब हा महिना आपल्या नकळत आपल्यापुढे मांडतो. हुकलेल्या अनेक गोष्टींना 'बोल्ड-अंडरलाइन' मार्क करून, ते सहज आपल्या नजरेसमोर येईल असं पाहतो. त्यामुळं किमान या शेवटच्या महिन्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचे अर्थ-संदर्भ शोधून त्यांचा ताळेबंद हिशोब लावत बसण्याची मला अगदीच सवय आहे.

यावर्षी या हिशोबात दोन अल्टिमेट गोष्टींची भर पडली, एक म्हणजे मिस युनिव्हर्स झोझिबिनी टुन्झी आणि दुसरी पंतप्रधान सना मरिन. 'मिस युनिव्हर्स' आणि 'पंतप्रधान' हे दोन शब्द आल्यावर टिपिकली आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहणाऱ्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध असणाऱ्या या दोघी. एखाद्या गोष्टीचा ध्यास, ठरलेले नियम बदलण्याची इच्छा आणि स्वतःचं एक्झाम्पल सेट करून, इतरांना स्टिरीओटाइप विचार बदलायला भाग पडणारं अनोखं कॉकटेल आहे या दोघींचं यश!

सावळा, काळा हे रंग नाहीत आणि ३०-३५ वर्षांची बाई राजकीय अस्थिरतेतून जाणारा देश सांभाळणं शक्य नाही! सौंदर्यस्पर्धा म्हणजे, सौंदर्य, म्हणजे गोरेपणा हा सरळसाधा आणि ठरलेला विचार. एखाद्या देशाचा पंतप्रधान म्हणजे राजकारण, म्हणजे अनुभव-मुरब्बीपणा आणि त्यातही सत्ता हाताळणारा पुरुष असेल तर क्या बात, सगळी चौकटच पूर्ण! हेच ठरलेले नियम मोडून, खरं तर नव्यानं डिफाइन करून स्वतःचं वेगळेपण दाखवून दिलं या दोघींनी.

गंमत म्हणजे, मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत 'मिस युनिव्हर्स झालात तर तरुण मुलींना कुठली महत्त्वाची गोष्ट शिकवाल?' या प्रश्नावर 'लीडरशीप' असं उत्तर झोझिबिनीनं दिलं. 'मुलींना नेतृत्व करायचं आहे, पण समाजाला त्यांना ते करू द्यायचं नाही' असंही तिनं तिच्या उत्तरात सांगितलं आणि त्याच आठवड्यात जगाला सर्वांत तरुण पंतप्रधान मिळाली ती सना मरिनच्या रूपानं!

आपल्याला हवा असणारा अल्टिमेट बदल घडवणं किंवा त्या बदलाचे परिणाम समोर प्रत्यक्ष पाहायला मिळणं यालाच 'सार्थक' वगैरे म्हणत असावेत. हे असं स्वतःला हवे ते बदल घडवणं आणि ते अनुभवणं किती पूर्णता देणारं असेल ना? तसंही आपल्याकडून घडणारी कोणतीही कृती एका ठराविक रिझल्टचा विचार डोक्यात ठेवूनच घडत असते. या छोट्या छोट्या अचिव्हमेंट्सची परिमाणं आपल्या डोक्यात फिक्स असतात. 'शेवटी हे मिळवायचं आहे' किंवा 'असं घडलं पाहिजे' हेच नजरेसमोर ठेवून प्रयत्न सुरू असतात. खरं तर रोजच्या, अगदी निरर्थक किंवा सवयीच्या वाटणाऱ्या गोष्टीही शेवटी मुक्कामाला जाऊन पोचतात. आपल्याला पोचायचं असतं कुठल्यातरी शेवटाला, आपण आपल्यापुरत्या ठरवलेल्या शेवटालाच. ठराविक उद्देशानं सुरू केलेले प्रयत्न एका ठराविक रिझल्टच्या रूपानं आपल्याला मिळायला हवेत हीच अपेक्षा असते. 'याचसाठी केला होता अट्टाहास' म्हणत सुरू असतं रोजच स्ट्रगल, सततच्या अॅडजस्टमेंट्स.

कोणत्या ना कोणत्या प्रकारे वर्तुळ पूर्ण करण्याची माझाही धडपड सुरू असते. खरं तर वर्तुळ पूर्ण करून काही थांबत नाही, उलट त्यापुढं अजून काहीतरी नवं, वेगळं, विचार न केलेलं आपली वाट बघत असतं हे एव्हाना लक्षात आलंय माझ्या, पण तरीही 'शेवटचा दिस गोड व्हावा' हा हट्ट काही सोडता येत नाही. माझ्या मनाप्रमाणं घडवून आणलेल्या गोष्टी क्षणभरासाठी का असेना मला थकवा विसरायला लावतात आणि उगाच कुठंतरी 'एक हिशोब पूर्ण' झाल्याचं समाधानही देऊन जातात. नावीन्यतेचा ध्यास आणि अपूर्णतेची ओढ प्रत्येकालाच असते. सतत सुरू असणारी सायकलच आहे ती. पण सुरू केलेली कोणतीही गोष्ट एका शेवटाला नेऊन ठेवणं हे जास्त समाधान का देऊन जातं हे मला अजूनही समजलं नाहीये. अपेक्षित शेवटाची असणारी सवय की 'सुफळ संपूर्ण' यावर असणारी श्रद्धा हे नेमकं माहीत नाही, पण आयुष्यात एकदातरी 'याचसाठी केला होता अट्टाहास..' असं मला स्वतःशीच कबूल करता यायला हवं, असं उगाच वाटत राहतं.  (समाप्त)  
 

संबंधित बातम्या