थंडीतही जपा त्वचेचं आरोग्य

स्वप्ना साने
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

ही  गुलाबी हवा... वेड लावी जिवा.. खरंच, किती बेधुंद करणार गाणं आहे नाही? पण हीच गुलाबी हवा, त्वचेला आणि केसांना किती रूक्ष आणि निस्तेज करते, हे आपण सगळेच हिवाळ्यात अनुभवतो. थंडी सुरू झाली की चेहरा दिवसभर टवटवीत दिसत नाही, थोड्या वेळात काळवंडतो किंवा रूक्षही दिसतो. हात-पायांची दशा तर विचारायलाच नको. बरं, हवेत गारवा इतका असतो की सारखा चेहरा स्वच्छ करून टचअप करायलाही नको वाटतं. केसांची काळजी कशी घ्यायची हाही मोठा प्रश्‍न असतो. म्हणूनच आज या समस्यांची उत्तरं शोधूयात.

आपल्यापैकी अनेकांना आपला स्किन टाइप माहितीच नसतो, त्यामुळं कुठलंही फेस क्रीम वापरायचं किंवा नवीन क्रीम बाजारात आलं, की त्याची ॲड बघून लगेच क्रीम घ्यायची इच्छा होते... आणि चुकून जर आपल्याला ते प्रॉडक्ट सूट नाही झालं तर त्याचे उलट परिणाम होतात, जसं पिंपल्स, रॅशेस, रिंकल्स, काळे डाग यांसारख्या समस्या उद्‍भवतात. मग डरमॅटोलॉजिस्टकडं फेऱ्या सुरू होतात. 

आपण थोडं स्वतःच्या स्किन आणि हेअर टाइपबद्दल जागरूक झालो, तर त्वचेवरचे प्रयोग टाळू शकतो. आपल्या ब्युटी थेरपिस्टच्या सल्ल्यानुसार स्किन टाइप बघून कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सची निवड करावी. 

हिवाळ्यात केस आणि त्वचा जास्त कोरडी आणि निस्तेज होते. डेड स्किनचा थर जास्त जाणवतो, कारण थंडीमुळं आपण बॉडी स्क्रब, फेस स्क्रब, एक्सफोलिएशन हे सगळं करत नाही. इतकंच काय तर फेशिअल, क्लीनअपसुद्धा टाळतो. परिणामी, त्वचा अधिकच ड्राय आणि निस्तेज दिसते. 

म्हणजेच, हिवाळ्यात त्वचेला क्लीन्सिंग, नरीशिंगची जास्त गरज असते. योग्य ते फेशिअल किंवा क्लीनअप करून चेहऱ्याला पोषण देता येईल. संपूर्ण शरीरासाठी बॉडी स्पा किंवा आयुर्वेदिक अभ्यंग करायला हवं, ज्यामुळं शरीरावरचा मृतकोशिकांचा थर निघून त्वचा मऊ, सतेज आणि टवटवीत होते. मसाज क्रीम किंवा अभ्यंग तेल वापरल्यामुळं रक्ताभिसरण व्यवस्थित होऊन त्वचेला पोषण मिळतं. 

केस सुदृढ आणि चमकदार दिसण्यासाठी हेड मसाज आणि हेअर स्पा नक्की घ्यावा. हेअर स्पा घेतल्यानं केसांना पोषण मिळतं. हेड मसाजनंतर आयुर्वेदिक हेअर पॅकसुद्धा वापरू शकता. आजकाल बाजारात बरेच पॅक उपलब्ध आहेत, पण तरी तो आपल्या ब्युटी थेरपिस्टच्या सल्ल्यानुसारच निवडावा, म्हणजे तुमच्या केसांना सूट होईल. 

हिवाळ्यातला मेकअप
हिवाळ्यात मेकअप करायचा असल्यास पहिल्यांदा त्वचेला भरपूर हायड्रेट करावं, म्हणजेच चांगल्या पोषक मॉइश्‍चरायझरचा वापर करावा. थोडं थांबून नंतर त्यावर पॅन केक किंवा पॅन स्टिक, मूस, अथवा फाउंडेशनचा उपयोग करावा. लिपस्टिकसुद्धा मॉइश्‍चर युक्त असावी, जेणेकरून दिवसभर ओठ सॉफ्ट राहतील. शक्य असल्यास लीप बाम बेस म्हणून लावावे. या दिवसांत मेकअप थोडा ‘dewy look’चा असावा. म्हणजेच खूप पावडर लावून मॅट लुक नाही आणि अति जास्त क्रीम वापरून ऑयली लुकपण नाही. म्हणूनच हा मॉइश्‍चर युक्त dewy look. 

क्विक टिप्स

  • हिवाळ्यात साबणाचा वापर टाळावा. शक्य असल्यास उटणं वापरावं, तेही थोडा तेल मसाज केल्यानंतर. अगदी रोज जमलं नाही तरी आठवड्यातून एकदा तरी वापरावं. 
  • त्वचेला उपयुक्त असं बॉडी लोशन सकाळी आणि रात्री नियमितपणे वापरावं. 
  • चेहऱ्याला रात्री पोषक क्रीमनं पाच मिनिटं मसाज करावा आणि सकाळी साध्या पण्यानं धुऊन घ्यावं.
  • मेकअप काढताना एका कापसाच्या बोळ्यावर ऑलिव्ह ऑइल घेऊन चेहरा, गळा, मान पुसून काढावी. त्यामुळं त्वचा ड्राय होत नाही. 
  • आठवड्यातून एकदा पपईचा गर आणि केळं मिक्स करून एक छोटा चमचा मध घालून पॅक लावावा आणि १५ मिनिटांनंतर कोमट पाण्यानं धुवावा. असं केल्यास टॅन कमी होतोच आणि चेहरापण टवटवीत दिसतो.
  • ऑयली स्किनसाठी दही आणि बेसनाचा पॅक एकदम उत्तम आहे. 

संबंधित बातम्या