‘गोरी’पेक्षा ‘ग्लोइंग’ स्किन हवी

स्वप्ना साने
सोमवार, 9 मार्च 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

आज ३० वर्षे झाली, ‘ती’ रंग गोरा करण्याची कॉस्मेटिक्स नियमित वापरतेय, वयाच्या १९ व्या वर्षापासून! आज ती पन्नाशीला आली, तरी रंग काही गोरा झाला नाही. मग का वापरतेय ती कॉस्मेटिक? तर ते लावल्याशिवाय चेहरा चांगला दिसत नाही, फ्रेश वाटत नाही म्हणून. जणू सवयच झाली आहे त्या प्रॉडक्टची. ही अनेक स्त्रियांची कथा असेल. तिच्यासारख्याच अनेक स्त्रिया ‘गोरी-गोरी’ दिसण्याच्या मोहात पडून त्वचेचे नुकसान करून घेतात. खरेच गोरे दिसणे हाच सुंदरतेचे मापदंड आहे का? नाही... मुळीच नाही!

‘गोरी स्किन’ की ‘ग्लोइंग स्किन’ 
त्वचेचा रंग कुठलाही असो, गोरा, निमगोरा, सावळा, गव्हाळ... ती त्वचा जर हेल्दी नसेल, ग्लोइंग नसेल, तर चेहरा खुलून दिसणार नाही. कुठलेही फेअरनेस क्रीम तुम्हाला तात्पुरता फेअर लुक देईल, पण मुळात तुमचा जो रंग आहे तोच राहणार. उलट ते क्रीम सतत वापरल्यामुळे त्वचेला मात्र त्यातील स्ट्राँग केमिकल्समुळे नुकसान पोचू शकते.

सतत स्किन लायटनिंग किंवा फेअरनेस प्रॉडक्ट्स वापरल्यामुळे त्वचा ड्राय होते, चेहरा ओढल्यासारखा दिसतो. त्वचा सनलाइट सेन्सेटिव्ह होते, रफ होते आणि सुरकुत्याही दिसू लागतात.

बॅन असलेले मर्क्युरी आणि हायड्रोक्विनॉनसारखे कारसिनोजेनिक केमिकल्स अजूनही बऱ्याच लोकल फेअरनेस क्रीम्समध्ये आढळून येतात. त्यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते आणि त्वचेचे टेक्स्चरदेखील खराब होत जाते. आता वेळ आली आहे. जागरूक होण्याची. जाहिरात बघून कुठल्याही ‘गोऱ्या’ करणाऱ्या प्रॉडक्टला बळी पडू नका. 

फेअरनेस क्रीम लावायचे नाही, तर मग चेहरा फ्रेश आणि खुलून दिसायला करावे तरी काय? कॉम्प्लेक्शन कोणते ही असो, जर चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल किंवा चेहरा खूप टॅन झाला असेल, तर त्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी. चेहरा काळवंडलेला दिसतो म्हणून अँटी-टॅन ट्रीटमेंट आणि अँटी पिगमेंटेशन ट्रीटमेंट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करावी. त्वचा गोरी दिसण्यापेक्षा त्वचा ग्लोइंग कशी दिसेल याकडे कल असावा. त्वचा स्वस्थ आणि सुदृढ असेल तरच ‘ग्लोइंग’ दिसेल.सलून्समध्येसुद्धा फेअरनेस फेशिअल म्हणून प्रलोभने दिली जातात, पण हा इफेक्ट तात्पुरता असतो. ब्लीच आणि केमिकल पिल्सचा वापर होतो. त्वचा ‘गोरी’ दिसते, पण कायमसाठी नाही. आपल्या कॉम्प्लेक्शनबद्दल अभिमान बाळगावा... आणि एखादा स्किन प्रॉब्लेम असेलच, तर तो लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यावर उपचार करावेत. रेग्युलर फेशिअल किंवा क्लीनअप तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. काही स्किन लायटनिंग ट्रीटमेंटसुद्धा डरमॅटोलॉजिस्टकडे उपलब्ध असतात. त्याची खरेच आपल्याला गरज आहे का, हा नीट विचार करूनच योग्य तो निर्णय घ्यावा. 

ग्लोइंग स्किनसाठी क्विक टिप्स

  • मसूर डाळ पीठ, दही आणि चिमूटभर हळद मिक्स करून हा पॅक रोज अंघोळीच्या आधी १० मिनिटे लावावा. नियमित वापर केल्यास त्वचा उजळेल आणि सॉफ्ट होईल.
  • ओट्स आणि दही मिक्स करून उत्तम फेस वॉश तयार होतो. या होममेड फेस वॉशमुळे त्वचा सॉफ्ट आणि क्लीन होते.
  • पिगमेंटेशन असल्यास आठवड्यातून दोन वेळा पपईचा गर आणि मध मिक्स करून लावावा. डाग हळूहळू कमी होतील. पण पिगमेंटेशन जास्त प्रमाणात असेल तर योग्य ट्रीटमेंट घ्यावी.
  • उन्हापासून प्रोटेक्शनसाठी सन ब्लॉक किंवा सन स्क्रीनचा नियमित वापर करावा. किमान 40 SPF असलेले प्रॉडक्ट घ्यावे. 
  • ग्लोइंग स्किनसाठी अर्थातच आपल्या त्वचेनुसार योग्य ते प्रॉडक्ट वापरावे, पण योग्य आहार घेणेही महत्त्वाचे आहे.

संबंधित बातम्या