लॉकडाऊनमध्येही त्वचेला जपा
बोल्ड अँड ब्यूटिफुल
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
‘लॉकडाऊन’ पिरियड आहे म्हणून स्किन आणि हेअर केअरला लॉकडाऊन करायची अजिबात गरज नाही. आज आपण बघूया घरच्या घरी करता येणाऱ्या सोप्या ब्यूटी ट्रिटमेंट्स.
फेस स्क्रब
एक चमचाभर कॉफी, थोडी साखर आणि थोडे खोबरेल तेल मिक्स करावे आणि पाच मिनिटे स्क्रब करावे. १० मिनिटांनंतर धुऊन टाकावे. त्वचा खूप ग्लो होईल. तसेच हे स्क्रब चेहऱ्याबरोबरच शरीरालासुद्धा चालेल. टॅन कमी होईल आणि त्वचा सॉफ्ट व सिल्की फील होईल. सगळ्या स्किन टाईपला सूट होणारा असा हा स्क्रब आहे. फक्त खूप पिंपल्स असल्यास वापरू नये.
फेस पॅक
खाली दिलेल्या पॅकचे प्रकार तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता. लहान- मोठे सगळ्यांना वापरता येतील.
- ऊन वाढते आहे, तसे तापमानही वाढते आहे. अशा वेळेस थंड काही लावायला सगळ्यांनाच आवडेल. त्यासाठी थंडगार काकडी किसून घ्यावी, त्यात थोडे बेसन घालावे. हा पॅक १५ मिनिटे लावून ठेवावा आणि नंतर गार पाण्याने धुऊन टाकावा. हा पॅक सगळ्या स्किन टाईपला सूट होतो. नंतर लाइट मोईस्चरायझर लावावे.
- खूप ड्राय स्किन किंवा एजिंग स्किन असेल, तर दही आणि मिल्क पावडर मिक्स करून पॅक लावावा. १५ मिनिटांनंतर धुऊन घ्यावा. त्वचा सॉफ्ट आणि तजेलदार दिसेल.
- त्वचेवर खूप जास्त पिंपल्स असतील, तर एक चमचा मध आणि एक चिमूट हळद मिक्स करून लावावी. १५ मिनिटांनी धुवावा. नंतर अलोव्हेरा जेल लावून घ्यावे. हळूहळू पिंपल्स कमी होतील. टोमॅटोचा पल्प लावल्यानेसुद्धा बराच फरक जाणवेल. त्यात असलेल्या असिडिक प्रॉपर्टीजमुळे मुरूम आणि पुटकुळ्या बऱ्या होण्यास मदत होते आणि त्वचा क्लीन होते.
- आपल्या स्वयंपाकघरामधील आणखी एक मॅजिक प्रॉडक्ट आहे, ‘ग्रीन टी’. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्ज २० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवाव्यात. नंतर या थंडगार बॅग्ज तुम्ही डोळ्यावर ठेवू शकता. तुम्हाला डोळ्यांचा पफीनेस आणि डार्क सर्कल्स नक्कीच कमी झालेले दिसतील.
- तयार थंडगार ग्रीन टीमध्ये मऊ रुमाल किंवा टिशू डीप करून चेहऱ्यावर २० मिनिटे ठेवावा आणि नंतर चेहरा गार पाण्याने धुऊन घ्यावा. तुम्हाला त्वचेतील फरक नक्कीच आवडेल. पिंपल्ससाठी हा घरगुती उपाय खूप छान आहे.
‘लॉकडाऊन’मुळे सगळ्यात जास्त कुठली त्वचा खराब झाली असेल, तर ती म्हणजे आपल्या हातांची. एकतर सारखे हाथ धुवायचे. दुसरे म्हणजे स्वयंपाकघरात काहीतरी खायला करायचे, भांडी घासायची, कपडे धुवायचे यांमुळे वारंवार डिटर्जंटशी संपर्क येतो आणि हाताची त्वचा कोरडी पडते. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे, त्यांची स्किन काळी पडते किंवा रॅशसुद्धा येतो. अशा वेळेस सगळ्यात जास्त काळजी घ्यायची ती आपल्या हातांची. प्रत्येक वेळी हात धुतल्यावर थोडे क्रीम लावावे आणि रात्री झोपायच्या आधी हाताला हँड क्रीम किंवा नरीशिंग क्रिमने मसाज करावा.
हातांना लावायचा पॅक
चार चमचे कणीक घेऊन त्यात थोडे दही किंवा साय घालावी. त्यात दोन चमचे मध, चिमूटभर हळद मिक्स करून १० मिनिटे हाताला लावून ठेवावे आणि नंतर गार पाण्याने धुवावे. धुतल्यानंतर नरीशिंग क्रीम लावावे. हा पॅक रोजही लावता येईल.
हे सगळे करत असताना ‘लॉकडाऊन’ पिरियडही आनंदात जाईल. काळजी घ्या, घरातच रहा!
क्विक टिप्स
- नखे कापत राहावीत, वाढू देऊ नयेत आणि स्वच्छ ठेवावीत.
- हाथ सॅनिटाईझ करावे आणि नंतर क्रीमसुद्धा लावावे. रात्री झोपायच्या आधी क्रीम नक्की लावावे, रात्रभरात त्वचेला पोषण मिळेल.
- केस स्वछ धुवावेत, माईल्ड शाम्पू वापरावा आणि ऑइल मसाज करायला विसरू नये.
- सतत मोबाइल आणि टीव्हीची स्क्रीन बघू नये, डोळ्यांवर ताण येतो. त्यासाठी काकडीचे काप करून डोळ्यावर ठेवावेत, आराम मिळेल.
- हेल्दी खावे, पाणी भरपूर प्यावे, ग्रीन टी घ्यावा आणि आवडेल ती ॲक्टिव्हिटी करावी.
- शेवटचे महत्त्वाचे म्हणजे, घरच्या घरी मेडिटेशन करावे आणि सूर्यनमस्कार घालावेत.