‘हेअर फॉल’ला म्हणा बाय...!

स्वप्ना साने
सोमवार, 27 एप्रिल 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

परफेक्ट लुकसाठी त्वचा आणि ड्रेसइतकेच महत्त्व आहे ते केसांना. आपण त्वचेसाठी बरेच प्रयोग करत असतो, पण केसांकडे मात्र दुर्लक्ष होते... आणि अचानक एक दिवस केस खूप गळायला लागले किंवा पांढरे दिसायला लागले, की आपल्याला जाग येते. मग आपण जो जे उपाय सांगेल, ते वाट्टेल तसे करत सुटतो. मग एक एक केससुद्धा खूप जिव्हाळ्याचा वाटतो. 

सध्या सगळेच ‘हेअर फॉल ट्रॉमा’मध्ये आहेत. नेमके असे काय झाले आहे, की सगळ्याच वयोगटातील व्यक्तींना हेअर फॉल अनुभवावा लागतोय? केस पांढरे होणे हे तर अगदीच कॉमन झाले आहे आणि केसांचे टेक्सचर इतके खराब, की जणू त्यात काही जानच नाही!

ही तुमची, माझी आणि सगळ्यांची हेअर (हॉरर) स्टोरी आहे... 

हेअर फॉल का होतोय? तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. स्ट्रेसफुल लाइफ, झोप पूर्ण न होणे, वेळी अवेळी जेवण, पौष्टिक अन्नाची कमतरता, सतत स्ट्राँग केमिकल्सचा वापर, व्हिटॅमिन्सची कमतरता, प्रोटीन्सची कमतरता, स्ट्रिक्ट डाएटिंग, हॉर्मोनल इम्बॅलन्स, दीर्घ आजारपण, प्रदूषण इत्यादी... आणि काही प्रमाणात बोरचे पाणी आणि आनुवंशिकता. 

इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केस गळणे आणि केस तुटणे यातील फरक लक्षात घेणे. केसांवर जर अति तीव्र हीट प्रोसेस केली, तर ते डिहायड्रेट होतात. तसेच जास्त वेळा शाम्पू केल्यानेसुद्धा नॅचरल ऑईल निघून जाते व केस ड्राय होतात. परिणामी, केस कडक आणि ब्रिटल होतात आणि तुटतात. केसांना वारंवार मेंदी लावल्यानेसुद्धा केस रूक्ष होतात आणि तुटतात. हल्ली केसांना हायलाइट करणे, स्ट्रेट करणे, हॉट आयर्नने कर्ल्स करणे हे फॅशनमध्ये आहे. पण या नादात आपण आपल्याच केसांना हानी पोचवत असतो.

आपल्या हेअर फॉलचे नेमके कारण लक्षात घेऊन त्यानुसार काळजी घेणे गरजेचे आहे. वेळेत ट्रीटमेंट सुरू केली, तर त्याचा फायदा होतो. रूक्ष केसांना डीप कंडिशनिंग करून हायड्रेट करता येते, केसांची क्वालिटी सुधारते. योग्य ते पोषण केसांना मिळायला हवे, जसे जेवणातून व्हिटॅमिन्स, प्रोटीन, झिंक, कॅल्शिअम आणि इतर सत्त्व मिळणे आवश्‍यक आहे. बायोटिन किंवा व्हिटॅमिन H केसांना पोषण देऊन हेअर फॉल कमी करते. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बायोटिन सप्लिमेंट घ्यावे.

शाम्पूची निवड केसांची क्वालिटी आणि टाइप बघून करावी. खूप स्ट्राँग शाम्पूचा वापर करू नये. शाम्पू करण्याआधी ऑईल मसाज करावा आणि महत्त्वाचे म्हणजे केस कंगव्याने विंचरावेत. असे केल्यास रक्त प्रवाह सुधारतो आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.

केस पांढरे झाले असतील, तर मेंदीपेक्षा चांगल्या क्वालिटीचा हेअर कलर वापरावा. अर्थात ॲलर्जी टेस्ट करूनच. कलर म्हणजे शेवटी केमिकलच, त्यामुळे चांगली क्वालिटी असणे महत्त्वाचे आणि नंतर केसांची केअरही महत्त्वाची! केसांना मेंदी लावायची असेल, तर ती केमिकल विरहित हिरव्या पानाची लावावी, ३० मिनिटांत धुऊन घ्यावी. पण वारंवार मेंदी लावणे टाळावे. 

सतत स्ट्रेटनरचा आणि हॉट आयर्नचा उपयोग केल्याने केस रूक्ष होतात. डिहायड्रेट होतात. अशा केसांना हेअर स्पा ट्रीटमेंट किंवा डॅमेज रिपेअर थेरपी, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी.

क्विक टिप्स :-

  • बदाम, ऑलिव्ह तेल आणि एरंडेल तेल समप्रमाणात घेऊन मिक्स करून आठवड्यातून दोन वेळा तरी हेड मसाज करावा.
  • सौम्य शिकेकाई किंवा हर्बल शाम्पूने केस धुवावेत.
  • रूक्ष केसांना कंडिशनिंग करावे.
  • रात्री झोपण्यापूर्वी केस चांगले १० मिनिटे तरी विंचरावेत. रक्त प्रवाह वाढतो आणि पोषण मिळते.
  • केसांना २० मिनिटे दही लावून मग सौम्य शाम्पू करावा. केस सॉफ्ट होतील.
  • शक्यतो गार पाण्याने केस धुवावेत किंवा कोमट पाणी वापरावे. गरम पाण्यामुळे केस रूक्ष होतात.
  • केस ओले असताना कधीच विंचरू नयेत, ते तुटतात आणि स्प्लिट्सही तयार होतात.
  • केस हेल्दी राहण्यासाठी तीन महिन्यांनी ट्रिम करत राहावे.
  • केसांना अंड्याचा पॅक लावल्यास ते मऊ आणि चमकदार होतील. अंड्यातील पांढरा भाग वेगळा करून चांगला फेटून घ्यावा आणि केसांना लावावा. अर्ध्या तासात धुवावा.
  •      केस खूप गळत असतील किंवा टक्कल पडत असेल, तर वेळेत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार सुरू करावेत.

संबंधित बातम्या