फेशियलबद्दल समज-गैरसमज

स्वप्ना साने
बुधवार, 6 मे 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेणे, ज्यात त्वचेवरील रोम छिद्रे ओपन करून क्लिन्सिंग करणे, मृत त्वचा काढणे, नवीन त्वचेला मसाज क्रीमने पद्धतशीर मसाज करत पोषण देणे आणि त्वचा तजेलदार होऊन टोन्ड होण्यासाठी नरिशिंग फेस पॅक लावणे, या संपूर्ण प्रक्रियेला ‘फेशियल’ असे म्हणतात. त्याबद्दल आज जाणून घेऊ. 

फेशियल का करावे?
आपल्या शरीराचा सर्वात मोठा भाग म्हणजे ‘स्किन’ होय... आणि इतर भागांपेक्षा चेहऱ्यावरची स्किन फार नितळ असते, तसेच ‘एक्सपोज्ड’ही. हवामानातील बदल असो किंवा प्रदूषण, स्ट्राँग प्रॉडक्ट्स असोत किंवा किचनमधील फोडणीची प्रोसेस; एवढेच नाही तर स्ट्रेस, टेन्शन, थकवा या सगळ्याचा परिणाम चेहऱ्यावर होत असतो...
या सगळ्या रोज घडणाऱ्या गोष्टींमुळे चेहऱ्याची त्वचा लवकर खराब होते. त्वचा निस्तेज होऊन फाइन लाइन्स दिसायला लागतात. त्वचेची एक नैसर्गिक क्रिया असते. ती म्हणजे सतत पेशी तयार होत असतात आणि सगळ्यात वरच्या पेशींचा लेअर काही दिवसांनी मृत होतो. ही मृत त्वचा नियमित क्लीन करायची असते, जेणेकरून नवीन पेशींना पोषण मिळेल आणि त्वचा सतेज आणि कोमल दिसेल. म्हणून फेशियल हा पर्याय आहे. यामुळे मृत त्वचा तर नष्ट होतेच, पण नवीन पेशींना मसाजद्वारे पोषण मिळते. मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. 

फेशियल कोणी व केव्हापासून करावे?
फेशियल वयाच्या २५ ते २८ वर्षांपासून करता येते. स्त्री, पुरुष दोघांनीही फेशियल करायला हवे. २५ वर्षाच्या आधी क्लीन अप करावे. वयोमानानुसार आणि त्वचेनुसार कोणते फेशियल किती वेळा करावे हे ठरवता येते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला घ्यावा लागेल. साधारण ४० वर्षे वयापर्यंत महिन्यातून एकदा, तर त्यापुढे महिन्यातून दोन वेळा, म्हणजे पंधरा दिवसाआड करावे. कारण वय वाढते तसे त्वचेतील नैसर्गिक तेल आणि मॉइस्चर कमी होत जाते. त्वचेची लवचिकता कमी होते, कारण त्वचेतील कोलाजेन आणि ईलस्टीन कमी होत जाते. म्हणून फेशियलद्वारे त्वचा हायड्रेट केली जाते आणि ऑइल व मॉइस्चर बॅलन्स केला जातो.

फेशियलबद्दल काही गैरसमज

  • फेशियल फक्त समारंभ असेल तर करावे - हे चुकीचे आहे. जसे मी सांगितले, फेशियल हे त्वचेसाठी एक हेल्थ रुटीन आहे. त्वचा सुदृढ आणि सतेज दिसण्यासाठी आहे.
  • सारखे फेशियल केल्याने सुरकुत्या पडतात - अतिशय चुकीचा समज आहे. योग्य पद्धतीने फेशियल केल्यास आणि तुमच्या त्वचेला सूट होईल ते प्रॉडक्ट वापरल्यास चेहऱ्यावरची त्वचा टवटवीत होते आणि सुरकुत्या कमी होतात. पण हे फेशियल तज्ज्ञांकडून करावे. 
  • खूप वेळ मासाज केला, की फेशियल छान होते - कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला, की त्याचे विपरित परिणाम होतात. तसेच फेशियलबद्दलही आहे. मसाज १५ ते २० मिनिटे पुरेसा असतो. त्यापेक्षा जास्त वेळ केला, तर तो त्वचेला हानिकारक आहे. साध्या भाषेत सांगायचे, तर जसे ओव्हर एक्सरसाइझ केल्यामुळे शरीराला नुकसान होते, तसेच मसाज म्हणजे एक प्रकारचा चेहऱ्याचा व्यायाम होय. जास्त केल्यास पेशींना नुकसान पोचू शकते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे खूप प्रेशर देऊन जोरजोरात मसाज करू नये आणि आपल्या थेरपिस्टलाही तशी रिक्वेस्ट करू नये. जास्त प्रेशरमुळे चेहऱ्यावरील मासपेशींना इजा होऊन विपरित परिणाम होतील. 
  • सगळे फेशियल सारखेच असतात - असे मुळीच नाही. फार पूर्वी एक-दोन प्रकारचे फेशियल असायचे. आता जसे विज्ञान प्रगत झाले, तसे वेगवेगळे प्रॉडक्ट्स उपलब्ध झाले आहेत. त्वचेच्या प्रकारानुसार आणि त्वचेचे काही प्रॉब्लेम असतील, तर त्याला ट्रीटमेंटसाठी म्हणून फेशियल प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. काही हर्बल तर काही केमिकल प्रॉडक्ट्स. पण त्याचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा.

क्विक टिप्स

  • उन्हाळ्यात थंडगार पॅक त्वचेला लावला, तर खूप रिफ्रेशिंग वाटते. एक बोलमध्ये ४ चमचे ॲलोव्हेरा जेल आणि २ चमचे दही मिक्स करावे. चांगले फेटून घ्यावे आणि १५ ते २० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवावे. नंतर पॅक गार पाण्याने धुऊन टाकावा. चेहरा लगेच ग्लो होईल आणि टवटवीत दिसेल. दह्यात लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेला क्लीन करते आणि ॲलोव्हेरा जेल चेहरा हायड्रेट करून तजेलदार करते. 
  • त्वचा काळवंडली असेल, तर एक बटाटा किसून रस काढावा व त्यामध्ये २ चमचे बेसन घालावे. मिक्स करून लावावे. १५ मिनिटांनी गार पाण्याने धुऊन घ्यावे. त्वचा तर उजळेलच आणि टॅनही निघून जाईल. बेसनऐवजी मुलतानी मातीसुद्धा घेऊ शकता. 
  • तयार ग्रीन टी ४ चमचे, २ चमचे ॲलोव्हेरा जेल आणि १ चमचा मध, त्यात चिमूटभर हळद आणि ४ थेंब लिंबाचा रस घालावा. चांगले मिक्स करून घ्यावे आणि हा लेप चेहऱ्याला १५ मिनिटे लावून ठेवावा. नंतर गार पाण्याने धुवावे. त्वचा एकदम टवटवीत दिसेल. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला फ्री रॅडीकल्सपासून प्रोटेक्ट करतात. फ्री रॅडीकल्स त्वचेला डॅमेज करतात, त्यामुळे सुरकुत्या येणे, पिगमेंटेशन, फ्रेकल्ससारखे त्वचा विकार होतात. मध आणि हळद अँटिसेप्टिक आहेत, त्यामुळे मुरूम, पुटकुळ्या बऱ्या होण्यास मदत होते. 
     

संबंधित बातम्या