हॅपी फीट

स्वप्ना साने
सोमवार, 18 मे 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

‘चेहरे से राजरानी, और पैरो से...’ अशीच काही तरी जाहिरात नव्वदीच्या दशकात एका फूट क्रीमच्या प्रॉडक्टची होती आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. कारण त्या एका जाहिरातीमुळे बऱ्याच गृहिणींना स्वतःच्या पावलांना पडलेल्या भेगांची काळजी वाटू लागली. आता ‘पेडिक्युअर’ हे एक आवश्यक ब्यूटी रुटीन झाले आहे. बायकाच नाही तर पुरुषसुद्धा रेग्युलर पेडिक्युअर करून घेतात. पावलांची, पायाच्या नखांची स्वच्छता, भेगा स्वच्छ करणे, मृत त्वचा घासून काढणे आणि रिलॅक्सिंग मसाज करणे ही सगळी प्रक्रिया म्हणजे पेडिक्युअर.

पेडिक्युअर का करावे?
पेडिक्युअर हे एक ‘हेल्थ रुटीन’ आहे. आपली पावले दिवसभर आपल्या शरीराचा भार उचलतात, दिवसभरच्या कामात सगळ्यात जास्त आपण आपल्या पावलांवर अवलंबून असतो आणि तरीही सगळ्यात जास्त ‘निगलेक्टेड’ आपली पावले असतात. दुर्लक्ष केल्यामुळे बरेच वेळा पावलांची त्वचा काळी पडते, रफ होते. नखांची वाढ चांगली होत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे, फंगल इन्फेकशन झाले तर लवकर लक्षात येत नाही. काही जणांना ‘कॉर्न’ होऊ शकतो. तर काहींना फंगल आणि बॅक्टेरिअल ग्रोथमुळे ‘फूट ओडर’चा त्रास होतो. सगळ्यात जास्त त्रास होतो, तो ड्रायनेसमुळे टाचेला भेगा पडल्यामुळे. दुर्लक्षित भेगा इनफेक्टेड होऊन त्यातून रक्त निघू शकते, जे फार वेदनादायी असते.
या सगळ्यासाठी म्हणून पेडिक्युअर ही एक अत्यावश्यक ट्रीटमेंट आहे. रेग्युलर, म्हणजेच महिन्यातून एकदा आपल्या ब्यूटी थेरपिस्टकडून पेडिक्युअर करून घेतले तर वेळेत कॉर्न आणि फंगल इन्फेक्शन ट्रीट करता येते.

पेडिक्युअर कोणी करावे?
पावलांची स्वच्छता ही लहान मोठे, सगळ्यांनीच करायला हवी. पण ज्यांची ड्राय स्किन आहे, सारख्या भेगा पडतात आणि नखांची वाढ चांगली नाही,  इन्फेकशन होत असेल, अशांनी रेग्युलर पेडिक्युअर करायलाच हवे.

सध्या लॉकडाऊनमुळे घरात राहून आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणून, DIY पेडिक्युअर कसे करावे हे बघूया. 
साहित्य : फूट स्क्रॅपर, लुफा किंवा स्पंज, नेल ब्रश किंवा जुना टूथ ब्रशही चालेल, नेलकटर, एक छोटा टब, खडे मीठ, डेटॉल, शाम्पू, गरम पाणी, टॉवेल आणि नारिशिंग क्रीम. 
कृती : आपल्या पावलांचे निरीक्षण करून घ्यावे, नेल पॉलिश असेल तर ते काढून घ्यावे. टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात २ चमचे खडे मीठ, थोडे डेटॉल आणि थोडा शाम्पू घालून पाय १० मिनिटे बुडवून ठेवावेत. नंतर फूट स्क्रॅपर घेऊन टाच आणि पायाची मृत त्वचा घासून काढावी. पायाला इजा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. नेल ब्रश अथवा जुन्या टूथ ब्रशने नखांची स्वछता करावी. लुफा किंवा स्पंजने पाऊल स्वच्छ करावे, ज्यामुळे वरची काळवंडलेली त्वचा साफ होईल. नेलकटरने नखांना ट्रिम करावे आणि शेप द्यायचा असेल तर नेल फाईलरने हवा तसा शेप द्यावा. आता चांगल्या पाण्याने पाय धुऊन घ्यावा आणि टॉवेलने पुसून नारिशिंग क्रीमने मसाज करावा. क्रीम नसेल तर मॉइस्चरायझरही चालेल. कारण मृत त्वचा निघून गेल्यावर आतील त्वचेला पोषण हवे असते. 
विशेष सूचना : क्युटिकल कटर असेल तर नखाभोवतीची मृत त्वचा जमत असेल तरच कट करावी (हे घरी न करता तज्ज्ञांकडून केलेले बरे). मृत नसलेली त्वचा कट झाली तर रक्त येऊन इन्फेकशन होण्याची शक्यता असते. म्हणून काळजी घ्यावी.
टीप : सध्या लहान मोठे घरी असल्यामुळे, एकमेकांना मसाज करून दिल्यास जास्त रिलॅक्सिंग वाटेल. मसाज झाल्यावर सॉक्स घालून ठेवावेत, म्हणजे क्रीम इतर ठिकाणी लागणार नाही आणि पायाला धूळ चिकटणार नाही. शक्यतो ही प्रोसेस रात्री करावी म्हणजे झोप छान लागेल. नेल पॉलिश लावायचे असल्यास दुसऱ्या दिवशी लावावे. 

क्विक टिप्स

  • पायाला भेगा जास्त असतील तर एकाच दिवशी जोर लावून घासून काढू नये, इन्फेक्शन होऊन रक्त येऊ शकते. अशा वेळी आठवड्यातून एकदा पाय घासावेत. 
  • भेगा जास्त असल्यास किंवा डीप क्रॅक असल्यास फूट क्रीमचा वापर करावा आणि कॉर्न असेल तर त्याला स्वच्छ करून कॉर्न टेप लावावी. घरी उगाच घासत बसू नये. ईजा होईल.
  • खूप जास्त घाम येत असेल तर पायाला अँटी फंगल पावडर लावावी आणि तीन ते चार वेळा पाय पाण्याने स्वच्छ धुवावेत. 
  • नखांना सारखे नेल पॉलिश लावू नये. एकदा लावल्यावर चार-पाच दिवसांनी काढावे आणि पुढे दोन-चार दिवस लावू नये. असे केल्यास नेल बेड खराब आणि रफ होत नाही. नखांचा रंग बदलत नाही. 
  • डायबिटिक असाल तर जास्त काळजी घ्यायची असते. शक्य असेल तर तज्ज्ञांकडून पेडिक्युअर करून घेणे आणि घरी करणार असाल, तर कुठेही जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.

संबंधित बातम्या