टीन्स ब्यूटी

स्वप्ना साने
शुक्रवार, 19 जून 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

टीनएजर म्हणजेच वय वर्ष तेरा ते एकोणीस या वयोगटातील मुलगे आणि मुली. हार्मोनल चेंजेसमुळे शारीरिक आणि मानसिक पातळीवर होणारे बदल आणि त्यातून उद्‍भवणाऱ्या प्रश्‍नांचा डोंगर या टीनएजर्ससमोर असतो. स्वतःच्या लुक्सबद्दल अचानक ते कॉन्शस होतात. ‘एम आय लुकिंग गूड?’ हा प्रश्‍न आरशात बघून स्वतःलाच विचारायचा, हे ९९ टक्के टीनएजर्स नकळत अनुभवत असतात. तुमच्या घरी टीनएजर असेल तर नक्कीच हा अनुभव तुम्हाला आला असेल. वयात येत असताना बरेच बदल घडत असतात. त्यातील एक बदल मुख्यतः त्वचेशी संबंधित आहे. वयात येत असताना त्वचेतील होणारे बदल आणि त्वचा विकार याबद्दल आपण जाणून घेऊया आणि त्यावर काय उपचार करता येतील ते बघूया. 

मुरूम आणि पुटकुळ्या येणे हा टीनएजर्सचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. प्युबर्टी, म्हणजेच वयात येत असताना, त्वचेमधील तैलग्रंथी जास्त सक्रिय होतात. त्यामुळे सीबम जास्त सिक्रिट होते. हे सीबम मृत त्वचेच्या संपर्कात येऊन त्वचेतील रोम छिद्रे बंद करते, त्यामुळे होतात ते ब्लॅक हेड्स आणि पिंपल्स.

मुलगे किंवा मुली दोघांनाही मुरूम आणि पुटकुळ्या येऊ शकतात. त्यावर वेळेत उपचार केले नाहीत तर पस होऊ शकतो आणि पुढे त्वचेवर त्याचे डाग पडतात. मुरूम हे कपाळावर आणि गालावर जास्त येतात. त्यात जर काळजी घेतली नाही, तर बॅक्टेरिअल इन्फेकशन होऊन मुरुमांच्या गाठी तयार होतात, त्यात पस होतो. हे सगळे बदल घडत असतात ते हार्मोन्समुळे. वयाच्या २० ते २१ व्या वर्षापर्यंत त्याचे प्रमाण कमी होते आणि ते नाहीसेही होतात.

टीनएजर्सचा आणखी एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे अति घाम येणे. हार्मोनल बदलांमुळे घामाच्या ग्रंथी जास्त सक्रिय होतात. त्यामुळे खूप जास्त घाम येणे हापण टीनएजर्ससाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. घाम येणे ही शारीरिक तापमान संतुलित ठेवण्याची नैसर्गिक क्रिया आहे. पण जेव्हा हा घाम बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो, त्यावेळी त्याला दुर्गंधी येते. 

उपचार : फक्त स्ट्राँग डिओ वापरणे हे या प्रॉब्लेमचे सोल्युशन नाही. सेल्फ हायजिन खूप महत्त्वाचे आहे. हाताला पायाला घाम येत असेल, तर जमेल तेव्हा हात पाय गार पाण्याने धुवावेत. नंतर अँटी पर्सपीरेंट पावडर लावावी. दिवसातून दोन वेळा स्वच्छ अंघोळ करावी. ब्यूटी सोपऐवजी डिओडरंट सोप वापरावा.  त्वचा ड्राय करून पावडर लावावी. शक्य तो सुती कपडे वापरावेत आणि स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत. एकदा घातलेला कपडा धुऊनच परत वापरावा. 

आहार संतुलित घ्यावा. घाम ट्रिगर करणारे पदार्थ, खूप तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावेत. भरपूर पाणी, ताक प्यावे, फळे खावीत.

इन शॉर्ट, हायजिन आणि संतुलित आहार हे टीनएजर्ससाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज भासत असेल तर जरूर घ्यावा. टीनएजर्सनीपण स्वतः जागरूक असणे महत्त्वाचे आहे, अर्थात पालकांनीही जागरूक होऊन आपल्या ‘टीनएजर’शी कम्युनिकेट करावे. शारीरिक आणि मानसिक बदल होत असताना, योग्य ती काळजी घेतली तर खूप इझिली आणि ब्यूटीफुली हा टीन्स टप्पा पार पडेल.

  • त्वचेमधील बदल जाणवताच थोडी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. सेल्फ हायजिन खूप महत्त्वाचे आहे. त्वचा तेलकट जाणवत असेल, तर योग्य तो ऑइल कंट्रोल फेस वॉश वापरावा. दिवसातून तीन वेळा चेहरा स्वच्छ धुवावा आणि नंतर ॲलोव्हेरा जेल लावावे.
  • त्वचेवर खूप जास्त प्रमाणात ब्लॅक हेड्स किंवा व्हाइट हेड्स झाले असतील, तर ब्यूटी थेरपिस्टकडून डीप क्लिन्सिंग करावे. म्हणजे नंतर होम केअर घेऊन ते कंट्रोल करता येते.
  • त्वचेवर मुरूम, पुटकुळ्या जास्त झाल्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार करावे. कुठलीही पुटकुळी अथवा मुरूम नखाने फोडू नये, यामुळे इन्फेक्शन होते आणि जखम वाढते. वेळेत काळजी घेतल्यास आणि सकस आहार घेतल्यास मुरूम लवकर बरे होतात.

संबंधित बातम्या