पावसाळा आला, त्वचेला सांभाळा!

स्वप्ना साने
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

बोल्ड अँड ब्यूटिफुल - गरम भजी, वाफाळलेला चहा आणि रम्य आठवणी... ही टिपिकल पावसाळ्याची लक्षणे. पण पावसाळा सुरू झाला, की आणखीही काही लक्षणे दिसू लागतात, ती आपल्या त्वचेवर! खाज, ॲलर्जी, मुरूम, पुटकुळ्या, एक्झीमा आणि इतर बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन्स डोके वर काढू लागतात.
पावसाळ्यात तापमानात सतत बदल होत असतात, हवेत ह्युमिडिटी वाढलेली असते. अशा वेळेस त्वचा तेलकट जाणवते, सारखा घाम येतो. त्यामुळे ऑइली त्वचा असणाऱ्यांना तर फारच अडचणी येतात. सारखा चेहरा धुवायला लागतो आणि असे नाही केले तर घाम आणि तेलकटपणा हे त्वचेतील पोअर्स ब्लॉक करून व्हाइट हेड्स आणि पिंपल्सला निमंत्रण देतात.
याशिवाय हाय ह्युमिडिटीमुळे केस फार रफ आणि ड्राय दिसतात. नीट सेट होत नाहीत. काहींना हेअर फॉलही खूप होतो. अशा वेळी गरम पाण्याने हेअर वॉश करणे टाळावे. ड्रायरचा वापर करू नये. ऑइल मसाज करून सौम्य शाम्पूने केस धुवावेत. 
एवढेच नाही, तर वाढलेल्या ह्युमिडिटीमुळे आणि सतत येणाऱ्या घामामुळे, शरीरातील पाणी कमी होऊन त्वचा डीहायड्रेट होते. त्यामुळे ड्रायनेस वाढतो, खाज सुटते. सात ते आठ ग्लास पाणी दिवसभरात प्यायलाच पाहिजे. ड्राय स्किन असणाऱ्यांनी जास्त काळजी घ्यावी. 
पावसात भिजायची मजाच वेगळी असते, पण अंगावरचे कपडे जास्त वेळ ओले राहिले किंवा ओले शूज जास्त वेळ घातले गेले, तर बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकते. हवेतील आर्द्रता अशा इन्फेक्शनला पोषक असते. त्यामुळे कापड्यांवरील बॅक्टेरिया त्वचेवर वाढतात. 

पावसाळी इन्फेक्शन्स 
पावसाळ्यात होणाऱ्या असंख्य प्रकारच्या स्किन ॲलर्जी आहेत. खाजवणे, लालसर रॅश, पुटकुळ्या येणे अशी साधारण लक्षणे असतात. जास्त करून पाठीवर आणि हातापायावर ही लक्षणे आढळून येतात. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. स्वच्छता पाळावी. त्वचा कोरडी करून कॅलमाईन लोशन लावावे. अँटी फंगल पावडरचा वापर करावा. 

  • ॲथलीट्स फूट : पायाच्या बोटांमध्ये आणि तळपायाला खाज सुटणे, फोड येणे, ही लक्षणे या फंगल इन्फेक्शनची आहेत. त्यामुळे पाय नीट धुऊन कोरडा करून, अँटी फंगल पावडर लावावी. कोरडे आणि स्वच्छ शूज वापरावे. 
  • टिनिया फंगल इन्फेक्शन : स्किन फोल्ड्समध्ये होणारे हे इन्फेक्शन आहे. उदा. मांड्या, अंडर आर्म्स इथे खाज सुटून रॅश येणे. हे नखांनापण होऊ शकते, त्यामुळे नखे तुटतात. स्काल्पमध्ये झाल्यावर खाज सुटते आणि ड्राय फ्लेक्स होतात. 
  • नखांची स्वच्छता, ट्रिमिंग आवश्यक आहे. तसेच केस आणि स्काल्प स्वच्छ असावे, आठवड्यातून २ किंवा ३ वेळा शाम्पू करावा. 
  • एकन आणि एक्झीमा : अति जास्त घामामुळे आणि आर्द्रतेमुळे मुरूम, पुटकुळ्या होऊ शकतात. तर, काहींना त्वचेवर रॅश येऊन खाज सुटणे, त्वचा लालसर होणे यांसारखी एक्झीमाची लक्षणेही दिसू शकतात. अशा वेळी तज्ज्ञांकडून सल्ला घेऊन योग्य तो उपचार करावा. 

पावसाळ्यातील स्किन इन्फेक्शन टाळण्यासाठी काही टिप्स:-

  1. खूप घट्ट आणि फिटिंगचे कपडे घालू नयेत. स्वच्छ सुती कपडे वापरावे.
  2. पावसाळी चपलांचा वापर करावा. प्रत्येक वेळी बाहेरून आल्यावर चपला स्वच्छ आणि कोरड्या कराव्यात.
  3. कपडे, नॅपकिन, टॉवेल, पांघरूण हे आपले आपलेच वापरावे. इतरांचे वापरू नये आणि आपलेही इतरांबरोबर शेअर करणे टाळावे. 
  4. अंघोळ झाल्यावर अंडर आर्म्स, मांड्या, पाठ आणि पायाच्या बोटांमध्ये अँटी फंगल पावडर लावावी.
  5. केसांना सौम्य शाम्पू आणि हॉट ऑइल मसाज द्यावा. नारळाच्या दुधाचा हेअर पॅक लावावा. फायदा होईल.
  6. चेहरा स्वच्छ धुवावा. खूप हेवी मेकअप करू नये. मुरूम असतील तर अँटी एकने फेस वॉश वापरावा. 

पावसाळ्यात होणाऱ्या या त्वचा इन्फेक्शन्सची माहिती घेऊन, जर तुम्ही योग्य ती काळजी घेतली, तर नक्कीच तुम्हालाही पावसात भिजण्याचा आनंद लुटता येईल, अगदी बिनधास्त!

संबंधित बातम्या