बॉडी पॉलिशिंग

स्वप्ना साने
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

ब्यूटी सलून किंवा स्पा सेंटरला गेल्यावर त्यांच्या सर्व्हिस कार्डमध्ये अनेक वेळा आपण बॉडी पॉलिशिंग हे लिहिलेले वाचतो, पण ते नेमके काय असते याची माहिती बऱ्याच लोकांना नसते. काहीतरी फॅन्सी असावे किंवा उगाच काय ते चोचले, हा विचार केला जातो. नाहीतर तरुणांसाठी असावे, नवऱ्या मुलींनी करावयाची ट्रीटमेंट असावी, असेही गैरसमज असतात. चला तर आज आपण बॉडी पॉलिशिंगबद्दलच्या आपल्याकडे असलेल्या माहितीला जरा ‘पॉलिश’ करूया!

पॉलिश करणे, याचा अर्थ स्वच्छ करून चमकवणे, चकचकीत करणे, स्पॉटलेस करणे. बॉडी पॉलिशिंगमध्येही हेच केले जाते. त्वचा सुंदर, नितळ, कोमल आणि स्वस्थ दिसावी, हा या मागचा उद्देश असतो. तरुण, प्रौढ, महिला, पुरुष कोणीही बॉडी पॉलिशिंग करू शकतात. हा ब्यूटी + हेल्थ रूटीनचा भाग आहे. शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करून, सर्वांग सुंदर करण्याची ही प्रोसेस आहे.

बॉडी पॉलिशिंगचे फायदे 

 • पॉलिशिंग स्क्रब वापरून संपूर्ण शरीरावरची मृत त्वचा काढली जाते. त्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि क्लीन फील होते.
 • उन्हामुळे झालेले टॅन क्लिअर होते, त्वचा उजळते. 
 • रफ आणि दुर्लक्षित पार्ट्स, जसे एलबो, गुडघे, मांड्या किंवा पाठ, या पॉलिशिंग प्रोसेसमुळे एकदम सॉफ्ट आणि सिल्की फील होतात.
 • क्रीम किंवा मसाज ऑईल घेऊन लाइट मसाज केला जातो. त्यात इसेन्शियल ऑइलचे काही थेंब वापरतात. या प्रोसेसमुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि शरीरातून टॉक्झिन्स बाहेर निघतात. 
 • रोम छिद्रे क्लिअर होऊन त्वचा हायड्रेट केली जाते. त्यामुळे त्वचेवर एक वेगळीच चमक येते. संपूर्ण शरीरावरची त्वचा उजळते आणि चमकदार होते. 
 • मुख्य म्हणजे, स्किन डिटॉक्स करणारे प्रॉडक्ट्स वापरले जातात. त्वचा जर खूप ड्राय असेल तर स्किनला भरपूर हायड्रेट केले जाते.

बॉडी पॉलिशिंग कोणी करावे 

 1. महिला किंवा पुरुष दोघांनीही महिन्यातून एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्याकडून बॉडी पॉलिशिंग करून घ्यावे. 
 2. प्री-ब्रायडल सेशन्समध्येही लग्नाच्या सहा महिने आधीपासून बॉडी पॉलिशिंग करावे, अर्थातच ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला घेऊन. 
 3. ड्राय स्किन आणि मॅच्युअर स्किन असलेल्यांनी आवर्जून ही प्रोसेस करावी. यामुळे बॉडी रिलॅक्स तर होतेच, शिवाय मृत त्वचेचा थर निघून जाऊन त्वचा मऊ आणि सॉफ्ट होते. एजिंग स्लो करणारी ही प्रोसेस आहे. 

क्विक टिप्स 

 • घरच्या घरी बॉडी स्क्रब तयार करावा; साखर, कॉफी, खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल मिक्स करून पूर्ण शरीरावर हळुवार स्क्रब करावे. नंतर कोमट पाण्याने धुवावे. (हा स्क्रब चेहऱ्याला लावू नये, कारण चेहऱ्याची त्वचा नाजूक असते.)
 • त्वचा खूप ड्राय असेल तर ओटमिल आणि दही मिक्स करून त्याने पॉलिशिंग करावे, टॅन दूर होईल आणि त्वचा लगेच चमकेल. 
 • बदाम तेल घेऊन त्यात लव्हेंडर ऑइलचे काही थेंब टाकून बॉडी मसाज करावा. बॉडी सॉफ्ट आणि हायड्रेटेड फील होईल. 
 • बाजारात काही आयुर्वेदिक बॉडी पॉलिशिंग पॅकपण मिळतात, पण त्याचा वापर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करावा. 

बॉडी पॉलिशिंग हे शक्यतो तज्ज्ञांकडून करून घ्यावे, कारण तुमच्या त्वचेला काय सूट होईल आणि नेमकी कशाची गरज आहे, ते ओळखून ही प्रोसेस केली जाते आणि मसाजही योग्य पद्धतीने केला जातो. हल्ली ऑरगॅनिक प्रॉडक्ट्सचा वापर करून ही ट्रीटमेंट दिली जाते. शरीर आणि मन, स्वस्थ आणि मस्त ठेवण्यासाठी ही खरच एक खूप छान ब्यूटी आणि हेल्थ सर्व्हिस आहे, जरूर करून बघावी.

संबंधित बातम्या