सेल्फ मेकअप

स्वप्ना साने
सोमवार, 21 डिसेंबर 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

लॉकडाउनमुळे खोळंबलेली लग्ने आता पार पडताहेत. त्यामुळे लग्नाला जायचे तर मेकअप हवाच. म्हणूनच यावेळी आपण बघूया सिम्पल, पण रूप खुलून दिसेल आणि दहा मिनिटांत करू शकाल असा सेल्फ मेकअप.

यासाठी फार काही साहित्य लागणार नाही. बेसिक प्रॉडक्ट्स बहुतेकांच्या ब्यूटी किटमध्ये असतातच, जसे फाउंडेशन, कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक, काजळ, डिझाइनर मॅचिंग टिकल्या. यामध्ये तुम्हाला फक्त ॲड करायचे आहे ते म्हणजे लिप लायनर, आय लायनर, मेकअप रिमूव्ह करायचे वाईप्स, टोनर आणि चांगले मॉइस्चरायाझर.

तुमच्याकडे हे सगळे प्रॉडक्ट्स नसतील तरी काही काळजी करू नका. फाउंडेशन किंवा BB क्रीम, कॉम्पॅक्ट पावडर, लिप लायनर, लिपस्टिक हे फक्त चार प्रॉडक्ट्स घेऊन तुम्ही मस्त तयार होऊ शकता. चला तर मग, करायचा ना स्वतःचा मेकअप!

  1. सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुऊन भरपूर मॉइस्चरायझर लावावे. मॉइस्चरायझर त्वचेत पूर्ण जिरेल असे मसाज करत लावावे आणि पाच मिनिटे थांबावे. म्हणजे ते सेट होईल. 
  2. आपल्या स्किन टोनला मॅच होईल असे फाउंडेशन लावावे. चेहऱ्यावर आधी डॉट्स लावावेत आणि हळुवारपणे ते त्वचेवर ब्लेंड करावे. फाउंडेशन नसेल तर BB क्रीम किंवा टिंटेड सनस्क्रीन पण वापरू शकता. 
  3. आता यावर कॉम्पॅक्ट पावडर लावून फाउंडेशन सेट करावे. पावडर ब्रश असेल तर खूप छान लावता येईल, पण नसेल तर सॉफ्ट स्पंज पण वापरता येईल. फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट नीट ब्लेंड झाले आहेत ना याची खात्री करून घ्यावी. म्हणजेच कुठे पॅच दिसत नाहीये ना ते तपासावे. कमी जास्त लागले असेल तर ते व्यवस्थित ब्लेंड करावे. 
  4. पावडरनंतर लिप लायनरने ओठांची आउट लाईन काढून घ्यावी. लिपस्टिकच्या रंगाला मॅचिंग लिप पेन्सिल असावी, म्हणजे दोन वेगळे रंग दिसणार नाहीत. 
  5. आउट लाईन काढून झाल्यावर लिपस्टिक लावून आपला बेसिक मेकअप पूर्ण करावा. लिप ब्रश असेल तर त्याने व्यवस्थित लावता येते, नसेल तर बसून सावकाश लिपस्टिक लावावी. मग ती सेट करायला एखादा टिशू पेपर घेऊन तो ओठांमध्ये ठेवून ओठ प्रेस करावेत. यामुळे लिपस्टिक जास्त लागली असेल तर टिशू पेपरने कमी करता येते. तसेच लिपस्टिक ग्लॉसी असेल तर मॅट लुक देता येतो.

आहे ना एकदम सोपे! आता या बेसिक मेकअपमध्ये तुमच्या आवडीनुसार आणि प्रॉडक्टच्या उपलब्धतेनुसार थोडा अजून मेकअप करता येतो. उदा. आय लायनर लावू शकता. आय शॅडो किट असेल तर मरून किंवा गोल्ड शॅडो लावून छान ब्लेंड करून घ्यावे. काजळही लावता येईल. हल्ली न्यूड मेकअप लुकचा ट्रेंड आहे. त्यामुळे आय शॅडो प्रायमर लावून त्यावर डायरेक्ट आय लायनर लावू शकता आणि डार्क लिपस्टिक लावून आपला मेकअप पूर्ण करू शकता. 

काही टिप्स 

  • कार्यक्रमासाठी मेकअप करायच्या आधी एकदा घरी ट्रायल करून बघावे, म्हणजे कॉन्फिडन्स येईल.
  • मेकअप किटमध्ये टोनर आणि मेकअप रिमूव्हर वाईप्स असाव्यात. वाईप्समुळे कार्यक्रम झाल्यावर मेकअप नीट काढता येतो. मेकअप काढल्यावर टोनर स्प्रे मारून त्वचा लगेच टोन करून घ्यावी. नंतर मॉइस्चरायझर लावावे, म्हणजे मेकअप केल्यामुळे त्वचेला कुठलेही नुकसान होणार नाही.
  • चांगल्या क्वालिटीचे मेकअप प्रॉडक्ट्स घ्यावेत. फाउंडेशन, लिपस्टिकची शेड शक्य असल्यास आपल्या ब्यूटिशियनला विचारूनच खरेदी करावी. त्वचा रूक्ष असल्यास क्रीम किंवा ऑईल बेस्ड फाउंडेशन घ्यावे. लिपस्टिक शक्य असल्यास जास्त वेळ टिकणारी आणि नॉन ट्रान्सफरेबल घ्यावी.
  • मेकअप ऑकेजन, आपली त्वचा आणि आपला पोषाख या सगळ्याचा विचार करून त्यानुसार करावा, तरच आपले सौंदर्य खुलून दिसेल. 
  • कुठल्याही प्रॉडक्टचा अतिरेक न करता, simple yet elegent look असावा.

संबंधित बातम्या