कोरड्या त्वचेला जपा
बोल्ड अँड ब्यूटिफुल
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने
हिवाळ्यात कोरड्या हवामानामुळे त्वचा कोरडी होते, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स वाढतात. ड्रायनेसमुळे ओठसुद्धा फाटतात आणि क्वचित रक्तसुद्धा येते. टाचेलाही भेगा पडतात. या सगळ्या समस्यांवर आपण काही सिम्पल ब्यूटी टिप्स फॉलो केल्या तर या ऋतूतही तुमची त्वचा खुलून दिसेल.
सर्वप्रथम, रात्री झोपायच्या आधी CTM, म्हणजेच क्लिन्सिंग, टोनिंग आणि मॉइस्चरायझिंग रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावरचा दिवसभराचा मेकअप किंवा धुळीचे कण वगैरे निघून जातात. टोनरमुळे ph बॅलन्स करून त्वचा हायड्रेट होते. बाकी हातापायाला लावायला बॉडी लोशनचा वापर करावा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार प्रॉडक्ट निवडावेत.
आठवड्यातून एकदा तरी एखादे उटणे लावून किंवा बॉडी स्क्रबचा वापर करून आंघोळ करावी. यामुळे संपूर्ण शरीरावरची मृत त्वचा निघून जाते. हे करायच्या आधी तिळाच्या किंवा खोबऱ्याच्या तेलाने अभ्यंग केले, तर आणखी छान इफेक्ट येतो. नंतर बॉडी लोशन जरूर लावावे.
चेहऱ्याला आठवड्यातून एकदा स्क्रब करावे आणि हायड्रेटिंग मास्क लावावा. बाजारात उपलब्ध असलेले तयार स्क्रब लावू शकता किंवा घरगुती स्क्रब लावू शकता. ऑईली स्किन असेल तर क्ले पॅक लावता येईल. नॉर्मल किंवा ड्राय स्किन असेल तर हायड्रेटिंग शीट मास्क लावावे. पिंपल्स असतील तर अँटिसेप्टिक हिलींग पॅक लावावा. भेगा पडलेल्या ओठांसाठी लिप बाम निवडताना त्यात कोको बटर आणि शिया बटर असलेले प्रॉडक्ट घ्यावे. शक्यतो लिपस्टिक लावायच्या आधी लिप बामचा बेस लावून मग लिपस्टिक लावावी.
टाचांना भेगा असतील तर आधी नीट पेडिक्युअर करून घ्यावे किंवा रात्री झोपण्यापूर्वी घरीच फूट स्क्रॅपर आणि फूट ब्रश वापरून टाच स्वच्छ करावी. नंतर फूट क्रीम लावून पायात सॉक्स घालावेत. खूप जास्त भेगा आणि दुखऱ्या टाचा असतील तर तज्ज्ञांकडून पेडिक्युअर करावे.
क्विक टिप्स
- खूप थंडीत किंवा प्रवासामध्ये बाजारात मिळणाऱ्या क्लिन्सिंग, टोनिंग आणि मॉइस्चरायझिंग वाईप्सच्या पॉकेट पॅकचा वापर करावा. हायड्रेटिंग शीट मास्क लावला तर जास्त सोयीचे आहे.
- मेकअपचा कमीत कमी वापर करावा. अगदीच आवश्यक असेल तर टिंटेड सिरम किंवा लोशन लावावे.
- एक चांगले हँड क्रीम नेहमी जवळ ठेवावे.
- ड्राय आणि मॅच्युअर स्किन असेल तर बॉडी बटर वापरावे, ते जास्त हायड्रेटिंग असतात.
- प्रवास करताना आपली विंटर ब्यूटी किट तयार ठेवावी. त्यात रेडीमेड CTM वाईप्स, मेकअप रिमुव्हिंग वाईप्स, लिप बाम, बॉडी बटर, फूट क्रीम, हायड्रेटिंग शीट मास्क आणि आवश्यक तेच मेकअप प्रॉडक्ट्स असावेत.
- महिन्यातून एकदा क्लिनअप किंवा फेशियल करावे. या ऋतूमध्ये त्वचेला जास्त पोषण हवे असते.