पन्नाशीनंतरची काळजी
बोल्ड अँड ब्यूटिफुल
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने
टीव्हीवर जाहिराती बघितल्या तर एक लक्षात येते, की सर्व सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये सुंदर तरुण मॉडेल्स दाखवल्या जातात. मग प्रश्न असा, की ते प्रॉडक्ट्स फक्त तरुणाईने वापरायचे असे का? पन्नाशी ओलांडलेल्या वयोगटातील व्यक्तींनी काय वापरायचे? आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची? याच प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून शोधणार आहोत.
वयोमानानुसार त्वचेतील नॅचरल ऑईल व मॉइस्चर कमी होते आणि त्वचा अधिक ड्राय व डल दिसू लागते. सुरकुत्याही दिसायला लागतात आणि त्वचेची लवचिकता कमी होते. ड्रायनेसमुळे त्वचेवरून कोंडाही पडायला लागतो. त्यात जर मधुमेह असेल तर त्वचा जास्तच रूक्ष होते.
उपाय:-
- आंघोळीसाठी शक्य असल्यास, हायड्रेटिंग शॉवर जेल वापरावे, साबणाचा वापर बंद करावा.
- बॉडी ब्रश, लुफाऐवजी, टर्किश टॉवेल/नॅपकिनने त्वचा स्वच्छ करावी.
- चेहऱ्यासाठी क्रीमयुक्त फेस वॉश किंवा ऑईल क्लिन्सर वापरावे.
- त्वचा ओलसर असतानाच, कोको बटर, शे बटर असलेले ड्राय स्किनसाठीचे बॉडी लोशन लावावे, म्हणजे त्वचेला लगेच पोषण मिळते.
- खूप गरम पाण्याने अंघोळ करू नये, त्वचा अधिक रूक्ष होते, कोमट पाणी वापरावे.
- आठवड्यातून एकदा फेस आणि बॉडी स्क्रब करावी, म्हणजे मृत त्वचेचा थर निघून जातो. बाजारात बॉडी स्क्रब उपलब्ध आहेत. आयुर्वेदिक उटणेही वापरू शकता.
- आठवड्यातून एकदा नरीशिंग फेस पॅक लावावा. एजिंग स्किनसाठी हायड्रेटिंग शीट मास्क मिळतात, ते वापरावेत किंवा नॉन ड्राइंग जेल पॅक लावावे.
- महिन्यातून दोन वेळा तज्ज्ञांकडून नरीशिंग फेशिअल करून घ्यावे.
- रात्री झोपताना बॉडी बटर आणि हायड्रेटिंग फेस क्रीम लावावे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फेस सिरम वापरावे, जास्त इफेकटिव्ह असते.
- गरजेनुसार मेनिक्युअर, पेडिक्युअर जरूर करावे. त्यामुळे टाचांना भेगा पडणार नाहीत आणि ड्रायनेसही कमी होईल.
वरील सर्व उपाय स्त्री-पुरुष दोघांनी करावेत, नक्की फायदा होईल. या सगळ्या स्किन केअर रुटीनबरोबर सेल्फ ग्रूमिंग केले तर तुम्हाला अधिक कॉन्फिडंट आणि ग्रेसफुल वाटेल.
(लेखिका कॉम्सेटॉलॉजिस्ट आहेत.)