स्किन सीरम

स्वप्ना साने
सोमवार, 29 मार्च 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 

हल्ली आपण ‘सीरम’ हा शब्द प्रत्येक ब्यूटी प्रॉडक्टच्या ॲडमध्ये ऐकतो, प्रॉडक्ट पण बघतो. पण हा प्रकार नेमका आहे तरी काय? हे क्रीम आहे, की अजून काही?

सीरम हे एक स्किन केअर प्रॉडक्ट आहे. याचे मुख्य पोषक घटक त्वचेमध्ये लगेच सामावून जातात आणि कमी वेळात जास्त चांगले इफेक्ट्स मिळतात. सीरमचे टेक्श्चर अगदी लाइट आणि नॉन ग्रीसी असते. त्याचे चार ते पाच थेंबसुद्धा चेहऱ्याला पुरेसे असतात. दोन बोटांनी हलकेच पॅट करत किंवा मसाज करत सीरम त्वचेमध्ये जिरवता येते. 

सीरम कधी वापरावे आणि कोणते वापरावे हा प्रश्न पडतोच. असंख्य जाहिराती बघून कन्फ्युजन होते. वयाच्या तिसाव्या वर्षापासून फेस सीरम लावता येते. साधारणपणे तेव्हापासूनच त्वचेमध्ये थोडे बदल व्हायला लागतात आणि एजिंग साइन्स सुरू होतात. 

साधारणपणे स्किन सीरम हे एक प्रकारचे ॲक्टिव्ह लिक्विड असते, म्हणून ते विशिष्ट कारणांसाठी तयार केलेले असते, उदाहरणार्थ, डार्क पॅची स्किन, एकने, अँटी एजिंग, ड्राय डीहायड्रेटेड स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन. आपल्या त्वचेला यापैकी नेमक्या कोणत्या सीरमची आवश्यकता आहे, हे आपल्या ब्यूटी थेरपिस्टला विचारूनच सीरम वापरावे. 
चांगले सीरम कसे ओळखावे?

  •  फेस सीरममध्ये कोणते महत्त्वाचे घटक आहेत ते पाहावे. त्यामध्ये सिरामाईड्ससारखे स्किन हायड्रेटिंग घटक असायला हवेत. हे हायड्रेटर त्वचेमधील ओलावा आत लॉक करतात. त्वचा दीर्घकाळ सॉफ्ट राहते. 
  •  चांगल्या सीरमचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे, अँटी ऑक्सिडंट्स. हे घटक त्वचेमधील फ्री रॅडीकल्स नष्ट करून एजिंग कंट्रोल करतात, जसे की ग्रेप सीड ऑईल, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी.
  •  सीरममध्ये झिंकसारखा अँटी इन्फ्लमेटरी एजंट आवश्यक आहे. स्किन सेन्सिटिव्हिटी, रेडनेस आणि सन बर्नसारख्या प्रॉब्लेम्सपासून त्वचा हील करण्यासाठी याचा उपयोग होतो. 
  •  त्वचेला उजळपणा देणाऱ्या, तसेच टॅन आणि डार्क पॅच कमी करणाऱ्या नैसर्गिक घटकांचाही सीरममध्ये  समावेश असायला हवा. 
  • काही सीरम फेशियल किटमध्ये येतात. ते फेशियल करताना इतर प्रॉडक्ट्सबरोबर वापरायचे असतात.

सीरम हे ॲक्टिव्ह लिक्विड असल्यामुळे कमी वेळात हवे ते रिझल्ट मिळतात आणि अगदी चार-पाच थेंब पुरेसे असतात. पण ते सीरम त्वचेमध्ये जास्त वेळ टिकवण्यासाठी, त्यावर दिवसा सन स्क्रीन आणि रात्री मॉइस्चरायझर लावावे. फेस क्रीमचा उपयोग करावा. चेहरा स्वच्छ धुऊन किंवा क्लिन्सिंग, टोनिंग करून, मग सीरम लावावे आणि ते जिरल्यावर त्यावर मॉइस्चरायझर लावावे. 
सीरम हे जेल बेस्ड किंवा ऑईल बेस्ड असू शकते. त्याप्रमाणे त्यात मुख्य घटक असतात. तुमच्या त्वचेला नेमक्या कोणत्या सीरमची गरज आहे, हे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ठरवावे.

संबंधित बातम्या