कूलिंग फेस पॅक

स्वप्ना साने
सोमवार, 7 जून 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

यंदाच्या उन्हाळ्यातही लॉकडाउन असल्याने आपण घरीच बसून होतो. पण तरीही गर्मी आणि घामामुळे चिकचिक होतच होती आणि फ्रेशही वाटत नाही. म्हणूनच आज बघूया या उष्ण वातावरणातसुद्धा त्वचेला तजेलदार आणि फ्रेश कसे ठेवता येईल.

चेहऱ्याची त्वचा शरीरावरील इतर त्वचेपेक्षा नाजूक, नितळ आणि सेन्सेटिव्ह असते. गर्मीमुळे सारखा घाम येऊन त्वचा कोमेजून जाते, चेहरा निस्तेज दिसायला लागतो. चेहरा परत फ्रेश आणि ग्लोइंग दिसण्यासाठी बघूया अगदी साधे सोपे घरी करता येतील असे कूलिंग फेस पॅक...

  • काकडी + मध : काकडीच्या सरामध्ये थोडा मध घालून चांगले मिक्स करावे आणि कापसाच्या बोळ्याने चेहरा, गळा आणि मानेवर व्यवस्थित लावावे. पंधरा मिनिटांनी गार पाण्याने धुऊन घ्यावे. काकडीचा कूलिंग इफेक्ट लगेच जाणवेल. त्वचा टाइट आणि तजेलदार दिसेल.
  • थंड दही + हळद : दह्यात ब्लिचिंग आणि मॉइस्चरायझिंग प्रॉपर्टी आहे. त्यामुळे थंड दह्यामध्ये हळद घालून केलेले फेस पॅक ड्राय स्किनसाठी उत्तम फेस पॅक आहे. हा पॅक १२-१५ मिनिटे लावावा, त्यावर लावू नये. 
  • ॲलोव्हेरा जेल + मध : चांगल्या क्वालिटीचे ॲलोव्हेरा जेल घेऊन त्यात मध मिक्स करावा. हा जेल पॅक चेहऱ्याला लावावा. १५ ते २० मिनिटे ठेवून गार पाण्याने धुऊन घ्यावे. त्वचा टवटवीत आणि फ्रेश जाणवेल. 
  • चंदन पावडर + रोज वॉटर :  चंदन कूलिंग आणि सूदिंग आहे. त्यात त्वचेला हील करणारे गुण आहेत. तसेच गुलाब जलदेखील त्वचेचा ph बॅलन्स करून त्वचेला तजेलदार करते. पंधरा मिनिटे पॅक लावून मग गार पाण्याने धुऊन घ्यावे. 
  • थंडगार दूध + मध : कोरे दूध आणि त्यात थोडा थोडा मध घालून कापसाने पॅक लावावा. तुम्ही सुती रुमाल त्यात डीप करून किंवा टिशू डीप करून शीट मास्क सारखे चेहऱ्यावर लावू शकता. वीस मिनिटांनी चेहरा धुऊन घ्यावा. त्वचा मऊ, शायनिंग आणि हेल्दी दिसेल. 
  • पुदिना + मुलतानी माती : उन्हाळ्यात बहुतेक घरी पुदिना आणला जातो. मुलतानी मातीमध्ये पुदिन्याचा रस मिक्स करून पेस्ट तयार करावी आणि चेहऱ्याला, गळ्याला लावावी. पंधरा मिनिटांनी धुऊन घ्यावे. तजेलदार आणि रीफ्रेश फीलिंगचा अनुभव तुम्हाला नक्कीच आवडेल. 
  • टोमॅटो ज्युस :  टोमॅटो ज्युसमध्ये थोडा मिंट ज्युस किंवा मधही ॲड करता येईल. हा पॅक चेहऱ्याला वीस मिनिटे लावून ठेवावा. ऑईली स्किनसाठी उत्तम पॅक आहे. शिवाय ज्यांना ओपन पोअर्स आहेत, त्यांनापण फायदा होईल. व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर असल्यामुळे, त्वचेला काही डॅमेज असेल तर हील व्हायला मदत होते. पोअर्सचा आकार कमी होऊन स्किन टाइट होते. त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग दिसते.  

वरील सर्व फेस पॅक सगळ्या स्किन टाइप्सला सूट होणारे आहेत. पॅक लावायच्या आधी त्वचा फेस वॉशने स्वच्छ धुऊन घ्यावी. व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स खूप असतील तर नियमित स्क्रबचा वापर करावा. त्वचेचे CTM रूटीन, म्हणजेच क्लिन्सिंग, टोनिंग, आणि मॉइस्चरायझिंग रेग्युलर करावे.

संबंधित बातम्या