मॉन्सून हेअर केअर

स्वप्ना साने
सोमवार, 21 जून 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेची आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. हवामानात बदल झाले की आपल्या त्वचेतही बदल घडत असतात. म्हणूनच सीझन चेंज झाला की आपल्याला आपल्या ब्यूटी केअर रूटीनमध्येही थोडा बदल करावा लागतो. 

पावसाळ्यात हवेत खूप जास्त आर्द्रता असते, नेहमीसारखे कोरडे हवामान नसते. त्यामुळे केस फ्रिझी होतात. सारखा शाम्पू केला तर केस वाळत नाहीत आणि मग हेअर ड्रायरचा वापर होतो. सतत हेअर ड्रायर वापरल्यामुळे केस डिहायड्रेट होतात आणि हेअर फॉल सुरू होतो. केस अधिक रूक्ष होऊन, निर्जीव दिसायला लागतात. म्हणूनच पावसाळ्यातही केस नरम, रेशमी आणि हेल्दी दिसण्यासाठी सोप्या घरगुती टिप्स:-

 • आठवड्यातून एकदा तरी खोबरेल तेलाने हेड मसाज करावा. केस खूपच ऑईली असतील तर तेल लावू नये, पण ॲलोव्हेरा जेलने किंवा जास्वंद जेलने हेड मसाज करू शकता. 
 • तुमच्या केसांच्या टाईपनुसार शाम्पू निवडावा. हर्बल शाम्पू वापरावा आणि गार किंवा कोमट पाण्याने केस धुवावेत.  
 •  ड्राय, रफ आणि फ्रिझी केसांना शाम्पूनंतर कंडिशनर जरूर लावावे. कंडिशनरमुळे केस सॉफ्ट होतील, फ्रिझीनेस कमी होईल. 
 • तुमचे केस जर केमिकली ट्रीटेड असतील तर त्याप्रमाणेच हेअर केअर प्रॉडक्ट वापरावे. 
 •  केस टॉवेलने झटकून आणि खूप घासून पुसू नयेत, मुळांना इजा होऊन केस तुटतात. शिवाय स्प्लिट एंड होतात. मायक्रो फायबर टॉवेलने हळुवार केस पुसावेत आणि नॅचरली वाळू द्यावेत. 
 •  केसांना हिटिंग टूलने सेट करायचे झाले, तर हिट प्रोटेक्टिंग लोशनचा वापर करावा. 
 • जर पावसाच्या पाण्याने केस ओले झाले, तर एकदा माइल्ड शाम्पूने धुऊन घ्यावे आणि वाळवावे. पावसाचे पाणी आणि प्रदूषण यामुळे केस चिकट होतात. 
 • मुलतानी माती, मेथी दाणे आणि दही मिक्स करून हा पॅक केसांना लावल्यास पोषण मिळते आणि केस दाट आणि हेल्दी दिसतात. 
 • केस अति फ्रिझी असल्यास, मॉइस्चर लॉक हेअर सीरम लावावे. हे प्रॉडक्ट घेताना आपल्या ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला जरूर घ्यावा. 
 • महिन्यातून एकदा हेअर स्पा जरूर करावा. 
 • केसांची नियमित काळजी घेतल्यास, पावसाळ्यातही तुमचे केस रेशमी आणि चमकदार दिसतील.

संबंधित बातम्या