श्रीगणेशाच्या आगमनासाठी...

सोनिया उपासनी
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

चातुर्मासाबरोबरच ओळीने सर्व सणावारांना सुरुवात होते. भाद्रपद चतुर्थीला आगमन होते ते श्रीगणरायाचे व त्यापाठोपाठ श्रीगौरींचे. याआधीची तयारी थोडी थोडकी थोडीच असते? ती करता करता स्वतःसाठी वेळ मिळत नाही. म्हणूनच आधीपासूनच कोणते कपडे घालायचे याचे योग्य नियोजन केले तर या सगळ्या दमणुकीनंतरही छान ग्रेसफुल दिसता येते.

गणेश चतुर्थी म्हटली की सणासाठी नवीन पोशाख आवर्जून घेतला जातो. भरजरी काठापदाराचे पोशाख निवडले, तर ते फक्त कार्यप्रसंगीच परत घातले जातात. याउलट थोडी स्मार्ट शॉपिंग केली किंवा आपल्या वॉर्डरोबमध्ये जे उपलब्ध आहे त्यात थोडा फेरबदल केला, तर जुन्यातूनच नवीन फॅशन तयार करता येते.

काठापदराच्या सिल्कच्या साड्यांवरचे ब्लाउज घालून घालून लवकर जुने दिसायला लागतात. याच साड्यांवर जर छानसा ट्रेंडी ब्लाउज शिवला, तर साडीचा लूकही बदलतो. ट्रॅडिशनल साड्यांवर सिल्क ईकत, कॉटन सिल्क, अजरख मोडाल सिल्क, सिल्क कलमकारी प्रिंटचे स्लीव्हलेस ब्लाउज, पफ स्लीव्हचे ब्लाउज, हाय नेक, कॉलरचे ब्लाउज, नेटेड स्लीव्हचे ब्लाउज शिवून घेतले तर कुठल्याही साडीवर कॉन्ट्रास्ट कलर ब्लाउज टीमअप करता येतो. 

जुन्या बनारसी जॉर्जेट साड्या अथवा हलक्या रंगांच्या सिल्क किंवा कॉटनसिल्कच्या साड्यांचे ब्राईट कलरमध्ये डाय करून सुरेख नूतनीकरण करता येते. यामुळे ज्या साड्या नेसून नेसून कंटाळा आलेला असतो, त्या नव्या उमेदीने या उत्सवात पुन्हा नव्याने परिधान करता येतील.

नवीन साड्या घ्यायच्या झाल्या तर हलक्या फुलक्या ॲनिमल प्रिंट असलेल्या सिल्कच्या साड्या, सिल्क कलमकारी साड्या, लिनन सिल्क सिम्पल बॉर्डरच्या साड्या घ्याव्यात, ज्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. या फेस्टिव्ह सीझनची शोभा तर वाढवतातच, पण इतरवेळीसुद्धा नेसून मिरवता येतात. सोन्याच्या दागिन्यांचा अट्टाहास नसेल तर सीझनप्रमाणे पोशाखाला साजेल अशी कॉपर बेस, सिल्व्हर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातली तर लूक अधिकच खुलून दिसेल. तरुण वर्गाला आई किंवा आजीच्या जुन्या सिल्क साड्यांचे छानसे वन पीस ड्रेस, सलवार कुर्ते, घागरे, अथवा शरारे शिवता येतील. ज्यांना सिल्क मेंटेन करायला त्रास होतो, त्यांच्यासाठी बाजारपेठांमध्ये प्युअर कॉटन आणि लिननमध्ये मनमोहक रंगांमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. इमिटेशन, फ्लोरल, मिनाकारी ज्वेलरीमध्ये तर भरपूर डिझाईनचे पर्याय आहेत. बच्चेकंपनीलासुद्धा पोशाखांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आहेत, उदा. खणाचे फ्रॉक, सेमी सिल्क सलवार कुर्ते, लाँग ट्रॅडिशनल ड्रेस, चनिया चोळी, परकर पोलके. पुरुष वर्गासाठी वेगवेगळे काठापदाराचे शिवलेले धोतर व त्यावर प्लेन कुर्ता; जीन्सवर अजरख, दाबू प्रिंट, सांगानेरी प्रिंटचे शॉर्ट कुर्ते, अथवा लाँग कुर्ते टीमअप केले, तर छान फेस्टिव्ह लूक एन्जॉय करता येईल.

चला तर मग सज्ज होऊया गणरायाच्या व गौरींच्या आगमनासाठी!

संबंधित बातम्या