जगी सर्व सुखी... 

निलांबरी जोशी 
गुरुवार, 25 जानेवारी 2018

बुक-क्लब
जगभर भटकून जगातल्या कोणत्या प्रदेशातली माणसे जास्त सुखी आहेत, बुद्धिमान आहेत, ती कोणत्या काळात आणि कोणत्या प्रदेशात जास्त प्रमाणात होती अशा प्रश्‍नांची उत्तरे एरिक वायनर या लेखकाने ‘जिऑग्रॉफी ऑफ ब्लिस’ आणि ‘जिऑग्राफी ऑफ जिनियस’ या दोन पुस्तकात आहेत. 

जगभर भटकून जगातल्या कोणत्या प्रदेशातली माणसे जास्त सुखी आहेत, बुद्धिमान आहेत, ती कोणत्या काळात आणि कोणत्या प्रदेशात जास्त प्रमाणात होती अशा प्रश्‍नांची उत्तरे एरिक वायनर या लेखकाने केला. हा प्रयत्न म्हणजे ‘जिऑग्रॉफी ऑफ ब्लिस’ आणि ‘जिऑग्राफी ऑफ जिनियस’ ही त्याची दोन पुस्तके होत. 

त्यापैकी ‘जिऑग्राफी ऑफ ब्लिस’ या पुस्तकात एरिकने पृथ्वीवरच्या कोणत्या प्रदेशातले लोक आनंदी असतात? लग्न, शिक्षण, अंमली पदार्थ/दारू, देशातले सरकार अशा असंख्य विषयांचा आनंदाशी काय संबंध आहे? माणसांच्या चेहऱ्यावर हास्य असले म्हणजे ती खरोखर आनंदी असतात का? लग्नामुळे माणूस आनंदी होतो का, आनंदी माणसांचे लग्न करण्याचे प्रमाण जास्त असते अशा अनेक प्रश्‍नांचा वेध घेतला आहे. त्यासाठी तो नेदरलॅंड्‌स, स्वित्झर्लंड, भूतान, कतार, आईसलॅंड, मोलडोव्हा, थायलंड, इंग्लंड आणि भारत अशा अनेक देशांमध्ये एका वर्षभरात फिरला. 

नेदरलॅंड्‌स या देशामध्ये ड्रग्ज, वेश्‍याव्यवसाय असे सगळे खपवून घेतले जाते. त्यामुळे डच लोक आनंदी असावेत असा त्याचा कयास होता; पण प्रत्यक्षात तसे नव्हते. नेदरलॅंड्‌सनंतर एरिक जगात आनंदी असणाऱ्या देशांची क्रमवारी दिलेल्या जागतिक डेटाबेसप्रमाणे वरच्या स्थानावर असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये गेला. 

स्विस माणसांना आपल्याकडची संपत्ती किंवा यश चारचौघात मिरवण्यात रस नव्हता. तसेच ते निसर्गाशी सहज तादात्म्य पावतात. या गोष्टींमुळे ते आनंदी आहेत असे एरिकला वाटले. मुख्य म्हणजे, स्विस लोकांनी आपला मताधिकार वापरून स्विस सैन्यावरचा खर्च कमी करायला लावला आहे. युद्धखोरी कमी करणे हा जगातल्या लोकांनी आनंदाकडे वाटचाल करायचा एक मार्ग आहे.

त्यानंतर वायनर भूतानला गेला. पाश्‍चात्त्य चंगळवादी जीवनमान न स्वीकारता आपली बुद्धिस्ट संस्कृती जपावी यासाठी भूतान या देशाने ग्रॉस नॅशनल हॅपीनेस (जीएनएच) ही संकल्पना १९७२ मध्ये स्वीकारली होती. आपल्याकडचे नागरिक किती प्रमाणात आनंदी आहेत, त्याच्या प्रमाणावर देशाची प्रगती मोजणारा भूतान हा एकमेव देश आहे. ‘लंचबॉक्‍स’ या हिंदी चित्रपटात आपण दोघे भूतानला एकत्र जायचे का? असा प्रश्‍न नायक विचारतो त्यामागे हा संदर्भ होता. 

यानंतर एरिक मध्य पूर्वेतल्या कतार या देशात गेला. कतारमध्ये संपत्तीचा साठा आणि उधळपट्टी यातच आनंद सामावलेला आहे. आपल्याकडच्या संपत्तीच्या जोरावर शिक्षण आणि संस्कृतीदेखील विकत घेता येईल, असे कतारमधल्या लोकांना वाटते. धडपड करून काहीतरी मिळवल्याचा आनंद हा प्रकार कतारमध्ये नाहीच. 

आनंदाचा संबंध साधारणपणे चमचमते समुद्रकिनारे आणि पामची उंच झाडे यांच्याशी लावला जातो; पण असे समुद्रकिनारे लाभलेले देश सर्वांत आनंदी नसून थंड आणि अंधारलेला आईसलॅंड हा सर्वांत आनंदी देश आहे असे एरिकला कळले. मग तो तिकडे गेला. आईसलॅंडमध्ये माणसाला त्याच्या गुणदोषांसह सहज स्वीकारले जाते. परंपरागत गोष्टींपेक्षा वेगळे काहीतरी करून पाहणाऱ्या लोकांना तिथे प्रतिष्ठा आहे. आईसलॅंडमध्ये माणसांना त्यांच्या स्वप्नांचा आयुष्यभर पाठपुरावा करता येतो. काही वर्षे कविता केल्या, मग संगीत शिकलो, नंतर काही दिवस फुटबॉलमध्ये घालवले. नंतर आवड म्हणून रसायनशास्त्रात संशोधन केले.. असा आईसलॅंडमधल्या माणसाचा बायोडाटा असू शकतो...! 

यानंतर एरिक मोलडोव्हा या देशात गेला. आनंदी देशांच्या यादीत तो सर्वांत खालच्या क्रमांकावरचा देश आहे. आपल्या दुःखाचे कारण ‘पुरेसे पैसे नाहीत’ असे तिथे अनेकजणांनी एरिकला सांगितले. पण इतर अनेक गरीब देशांच्या तुलनेत तिथल्या लोकांना पैसा ही भेडसावणारी समस्या नाही, तर आपण काहीच बदलू शकत नाही या हताशपणामुळे ते जास्त दुःखी आहेत असे एरिकचे मत आहे. 

प्रचंड संपत्ती असणे आणि प्रचंड गरिबी असणे या दोन्ही टोकाला ‘आता अजून काय?’ अशी निराशा येते. त्यामुळे कतार आणि मोलडोव्हा या दोन देशांची समस्या एकच आहे असे एरिक मानतो. हे फार विचारात पाडणारे विधान आहे. 

थायलंड हा लोकांना पृथ्वीवरचा स्वर्ग वाटतो. हसरे लोक आणि सुरेख समुद्रकिनारे असलेला हा देश. तिथल्या लोकांना काय दुःख असणार, असेच आपल्याला वाटते. पण तिथले लोक विचार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आलेला क्षण जगावा.. इतकेच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण थायी लोकांच्या हास्यामागे दरवेळी खरा आनंद असतोच असे नाही असे एरिकचे मत बनले. 

यानंतर एरिक लंडनमध्ये पोचला तेव्हा इमिग्रेशन ऑफिसरला त्याने आनंदाच्या शोधात तिथे पोचल्याचे सांगितले. त्या ऑफिसरचा यावर अजिबात विश्वास तर बसला नाहीच, पण एरिक त्याला चक्क दहशतवादी वाटला. ब्रिटनमध्ये लोक एकूण फारसे आनंदी नव्हते. पण ते फारसे दुःखीही नव्हते. एकूण आनंद वरून माणसाच्या मनावर बिंबवता येत नाही, तो आतूनच यावा लागतो असे एरिकचे लंडनबद्दल मत आहे. 

भारतात ध्यान, योगसाधना आणि शाकाहार याद्वारे मानसिक शांती मिळवण्यासाठी हजारो पर्यटक येतात. वायनरनेही एका आश्रमात राहून हे सर्व करायचे ठरवले. आपण एका कम्युनिटीचे सदस्य आहोत ही जाणीव भारतीय लोकांना आनंद मिळवून देते. भारत हा प्रचंड व्यामिश्र आणि वैविध्यपूर्ण देश असल्यामुळे भारतीय लोकांच्या आनंदाबद्दल खूपच अभ्यास करायला हवा असेही त्याचे मत आहे.

अमेरिकन लोकांना देशभर भटकून आपले बस्तान कुठे बसतेय ते पाहायला आवडते, असे एरिक म्हणतो. पण त्यांच्या आनंदाबद्दल तो फारसे भाष्य करत नाही. समृद्ध करणारे नातेसंबंध माणसाला सर्वांत जास्त आनंदी बनवतात असा निष्कर्ष एरिकने या सर्व भटंकतीनंतर काढला आहे. 

अशीच भटंकती करून एरिकने ‘जिऑग्राफी ऑफ जिनियस’ हे पुस्तक लिहिले. ठरावीक ठिकाणी, ठरावीक काळात अद्‌भुत कल्पना आणि जीनियस माणसे यांचा सुकाळ कसा होतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न वायनरने या पुस्तकात केला आहे. त्यासाठी त्याने सॉक्रेटिसचे अथेन्स, आजची सिलिकॉन व्हॅली, मायकेल एंजेलो आणि लिओनार्डो विंची यांचे फ्लॉरेन्स, मोझार्ट आणि फ्रॉईड यांचे व्हिएन्ना, साँग राजघराणे असलेला चीन आणि आणि रवींद्रनाथ टागोर यांचे कलकत्ता ही शहरे निवडली आहेत. 

जीनियस पैदा होण्यामागच्या त्याने लिहिलेल्या कारणांपैकी काही मजेशीर वाटतात, तर काही गंभीरपणे खरी वाटतात. उदाहरणार्थ, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल या तत्त्वज्ञांच्या काळात ग्रीक लोक आरोग्याला आणि फिटनेसला महत्त्व देत असत आणि खूप चालत असत हे कारण वायनर मांडतो. ‘जास्त चालणारी माणसे, बसून राहणाऱ्या माणसांपेक्षा दुप्पट क्रिएटिव्ह असतात’ असा नंतरच्या काळात संशोधकांनी एक निष्कर्ष काढला होता. चार्ल्स डिकन्स, मार्क ट्‌वेन, वर्डस्वर्थ हे साहित्यिक खूप चालायचे. चालताना माणूस डायव्हर्जंट पद्धतीत म्हणजे बहुश्रुतपणे - अनेक वेगवेगळ्या मार्गांनी - विचार करतो; तर बसून राहणारा कॉन्व्हर्जंट पद्धतीत (साचेबंद, एकसुरी) विचार करतो असा त्यामागचा विचार होता. 

एरिकने मांडलेला दुसरा मुद्दा दारू पिण्याचा आहे. ग्रीक लोकांना वाइन प्रिय होती. हा मुद्दा स्पष्ट करताना ड्रायव्हिंग करण्यासाठी कायद्याला चालेल इतपत दारू प्यायलेली माणसे इलिनॉय विद्यापीठाच्या ‘क्रिएटिव्हिटी टेस्टस’मध्ये इतरांपेक्षा जास्त गुण मिळवून गेली, या प्रयोगाचा दाखला एरिकने दिला आहे. विल्यम फॉकनर हा अमेरिकन लेखक आणि विन्स्टन चर्चिल हा इंग्लंडमधला मुत्सद्दी नेता या दोघांनी आपल्या बुद्धीचे श्रेय दारूला दिले होते. (यातला, ड्रायव्हिंग करण्यासाठी कायद्याला चालेल इतपत दारू प्यायलेली, हा मुद्दा वाचकांनी लक्षात घ्यावा..) 

पैसा हा मुद्दा एरिकने तिसरा गृहीत धरला आहे. त्यासाठी त्याने सिलिकॉन व्हॅलीमध्ये लागलेल्या शोधांमागे गुंतवणूकदार होते किंवा फ्लोरेन्समध्ये मेडिची राजघराण्याने कलाकारांच्या सृजनशीलतेसाठी पैसे पुरवले अशी उदाहरणे दिली आहेत. 

शिक्षण सर्वांसाठी खुले असण्याचाही जिनियस बनण्यात नक्कीच उपयोग होतो. उदाहरणार्थ, स्कॉटलंडमध्ये एका चर्चने सर्वांना बायबल वाचता यावे यासाठी शिक्षण दिले. त्यानंतर जवळपास प्रत्येकजण मिल्टन आणि दांते या साहित्यिकांचे साहित्य वाचायला लागला..!  ब्रिटिशांनी भारतात खरेतर आपल्यासाठी कारकून पैदा करायला शिक्षणाचा प्रचार केला पण त्याचा परिणाम म्हणून अनेक प्रज्ञावंत कवीही पैदा झाले. रवींद्रनाथ टागोर यांना कवितांसाठी नोबेल पारितोषिक मिळाले. १८४० ते १९२० च्या दरम्यान कलकत्ता शहरात ‘इंटलेक्‍च्युअल्स’ची मांदियाळी होती. जगातल्या सर्व शहरांपेक्षा जास्त पुस्तके तिथे प्रकाशित होत होती. कला, साहित्य, विज्ञान आणि धर्म या विषयात कलकत्ता बहरत होते. बंकिमचंद्र, हेन्री डेरोझियो, स्वामी विवेकानंद आणि जगदीशचंद्र बोस, वयाच्या विसाव्या वर्षांपर्यंत निरक्षर असणारी आणि नंतर बंगाली भाषेतले पहिले आत्मचरित्र लिहिणारी महिला राससुंदरीदेवी अशा अनेकांचा यात उल्लेख आहे. 

अर्थात शिक्षणाच्या बाबतीत, लिओनार्डोच्या काळात फ्लोरेन्समध्ये विद्यापीठ नसल्याने तो ‘स्कॉलॅस्टिक स्ट्रेटजॅकेट’पासून (शिक्षणाच्या साचेबंद पद्धतीतून) वाचला, असा खास ‘एरिक स्टाइल’ शेरा मारायला तो विसरत नाही. 

वेगवेगळ्या संस्कृतींना त्या त्या काळात ही शहरे सामोरी गेली हे जिनियस पैदा होण्याचे महत्त्वाचे कारण एरिक मांडतो. उदाहरणार्थ, चीनमध्ये साँग राजघराण्याच्या काळात सिल्क रोड (रेशीम) यामुळे वस्तू आणि कल्पना यांची प्रचंड देवाणघेवाण व्हायची. इटलीतल्या फ्लोरेन्समध्ये व्यापाऱ्यांची ये-जा होती. अनेक अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते आणि सिलिकॉन व्हॅलीमधले नवीन संस्थापक हे बाहेरच्या देशातून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेले होते. ग्रीसमधल्या अथेन्समध्ये परदेशी लोकांना युद्धकाळातही मुक्त संचार होता. त्यामुळे तिथे बुद्धिमत्ता वाढीला लागली. याउलट स्पार्टा शहरात मात्र असे खुले वातावरण नव्हते. त्यांनी जगापासून स्वतःला तोडण्यासाठी भिंती उभारल्या. तिथे बुद्धिवंत किंवा विचारवंतांची वानवा झाली. अशा भिंती सर्वांत जास्त वेगाने सृजनशीलतेचा सत्यानाश करतात..! 

अनेक उदाहरणे, निरीक्षणे, मानसशास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग, अनेक पुस्तके यांचे अचूक संदर्भ या दोन्ही पुस्तकांमध्ये येतात. आनंदाची व्याख्या करताना, ‘तुम्ही दुसरीकडे कुठेतरी असायला हवे होते, दुसरे काहीतरी करायला हवे होते आणि दुसरेच कोणीतरी असायला हवे होते.. असे वाटत नसेल तर.. तुम्ही आनंदात आहात...’ असे एरिक म्हणतो. ते सर्वांत जास्त पटते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या