गॅटसबी विलक्षण एकाकी!

नीलांबरी जोशी
शुक्रवार, 9 मार्च 2018

बुक-क्लब
कादंबरी : द ग्रेट गॅटसबी 
लेखक : एफ. स्कॉट फिटझगेराल्ड 
 

पु. ल. देशपांडे यांनी चिं. त्र्यं. खानोलकर यांच्यावर लिहिलेल्या 'खानोलकर' या लेखातला एक संवाद आहे. खानोलकरांच्या 'रात्र काळी घागर काळी' या कादंबरीमध्ये अच्युत नावाचं पात्र आहे. हा कादंबरीतला अच्युत पाय गमावून पांगळा होतो. पुलंनी त्यावरुन खानोलकरांना एकदा विचारलं होतं, 'त्या अच्याला पांगळं का केलंस?', त्यावर खानोलकर म्हणाले, 'केलं नाही, तो झाला'....! तसंच एफ स्कॉट फिटझगेराल्ट या लेखकाकडूनही जे गॅटसबी हा नायक ''विलक्षण एकाकी झाला असणार'' असं 'द ग्रेट गॅटसबी' या कादंबरीत कायम वाटत राहतं. 

'द ग्रेट गॅटसबी' ही कादंबरी अमेरिकेतल्या जॅझ एजचं प्रतिनिधित्व करते असं मानलं जातं. पहिल्या महायुद्धानंतरच्या १९२०च्या दशकात अमेरिकेत पैशाचा ओघ वाढला. कळसाला पोचलेल्या संपत्तीबरोबरच गुन्हेगारी, हाव, महत्त्वाकांक्षा, बंडखोरपणा या सगळ्या गोष्टी अपरिहार्यपणे वाढत गेल्या. तेव्हा अमेरिकेत खानदानी आणि नवश्रीमंत माणसं, त्यांच्या नेत्रदीपक पार्ट्या, दारूबंदी असतानाही त्या पार्ट्यांमध्ये पाण्यासारखी वाहणारी दारू, बेभान करणाऱ्या जॅझ संगीतावर थिरकणारी तरुणाई या सर्व गोष्टी 'रोअरिंग ट्‌वेंटीज' म्हणवल्या जाणाऱ्या काळाचा अविभाज्य भाग होत्या. त्यामुळे फिटझगेराल्डनंच या काळाला 'जॅझ एज' असं नाव दिलं होतं. त्याच्या 'द ग्रेट गॅटसबी' या कादंबरीत याच काळातलं, पैसा आणि चंगळवाद या गोष्टींच्या नादात संवेदनशीलता आणि सहानुभूती हरवून बसलेलं भेसूर जग दिसतं. 

खरं तर १९२० मध्ये प्रकाशित झाल्यावर या कादंबरीच्या पहिल्या वर्षी फक्त वीस हजार प्रती खपल्या होत्या. फिटझगेराल्ड १९४० मध्ये मरण पावला तेव्हा 'आपण आणि आपली पुस्तकं अपयशी आहोत' अशी खंत घेऊनच मरण पावला. पण नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ही कादंबरी प्रचंड लोकप्रिय झाली. अमेरिकेतल्या शाळांमध्ये अनेक अभ्यासक्रमांतही तिचा समावेश झाला. १९९८ मध्ये 'मॉडर्न लायब्ररी'नं त्या काळातली दुसऱ्या क्रमांकांवरची सर्वोत्तम कादंबरी म्हणून 'द ग्रेट गॅटसबी'ला गौरवलं. 

निक कारावे या तरुणाच्या निवेदनातून ही कादंबरी वाचकांसमोर उलगडत जाते. कादंबरी सुरु होते तेव्हा निक बॉंड विकण्यातलं आपलं नशीब आजमावण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रहायला गेलेला असतो. एकदा आपली चुलतबहीण डेझी हिला भेटायला तो तिच्या आलिशान घरात जातो. डेझीचा नवरा टॉम बुचनान हा एक खानदानी गर्भश्रीमंत असतो. निकच्या साध्यासुध्या रहाणीमानापेक्षा टॉम आणि डेझी यांचं राहणीमान अत्यंत उंची दर्जाचं असतं. टॉम आणि निक न्यूयॉर्कमध्ये फिरायला जातात. तेव्हा एका बकाल वस्तीत फिरत असताना टॉमची मैत्रिण मिर्टल विल्सन दोघांच्या समोर येते. मिर्टलचा नवरा एक गॅरेज चालवत असतो. आपल्या नवऱ्याची बायकांबाबतची अय्याशी डेझीला ठाऊक असली तरी ती तिकडे दुर्लक्ष करत असते. 

निकचा शेजारी असतो या कादंबरीचा नायक जे गॅटसबी! गॅटसबी या देखण्या, स्वप्नाळू, गूढ व्यक्तिमत्त्वाच्या तरुणाच्या डोळ्यात कायम काहीसे विलक्षण धुंद असे भाव असतात. डेझीकडून परत आल्यावर गॅटसबी त्याच्या घरासमोरच्या उपसमुद्रातल्या अथांग जलाशयासमोर गूढपणे उभा असलेला निकला दिसतो. समोरच्या बाजूला एक हिरवा प्रकाश आसमंतात भरुन राहिलेला असतो. तो प्रकाश निकच्या मनात घर करुन राहतो. यानंतर निकला गॅटसबीकडून पार्टीचं निमंत्रण येतं. गॅटसबीकडे रोज हजारो जण पार्टीला येत असतात. प्रचंड दारू, नृत्य, संगीत, रोषणाई हे गॅटसबीकडचं रोजचं चित्र असतं. पण पार्टीला येणारं कोणीच त्याचा आप्त होऊ शकत नाही. कोणी त्याच्या अफाट संपत्तीमुळे त्याचा हेवा करत असतं, कोणी त्या पैशांचा फायदा करुन घेऊ बघत असतं. गॅटसबी या माणसावर कोणाचंच प्रेम नसतं. अर्थात आपल्याभोवतीच्या लोकांना याचा पत्ता लागू नये यासाठी भोवती एक धूसर वलय निर्माण करण्याची गरज असणारा गॅटसबी कोणाच्याच जास्त जवळ जाऊ शकत नाही ही बाजूही महत्त्वाची आहे. निक त्या पार्टीला जातो. यानंतर गॅटसबी आणि निकची मैत्री दाट होत जाते. गॅटसबीच्या कामाच्या संदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशीही निकचा परिचय होतो. याच काळात एकदा गॅटसबी त्याची आणि डेझीची पूर्वीची प्रेमकहाणी निकला सांगतो. काही वर्षांपूर्वी गॅटसबी आणि डेझी यांचं एकमेकांवर प्रेम असतं. लष्करात सामान्य अधिकारी असलेला गॅटसबी निर्धन असतो. आपल्या कामासाठी तो दुसऱ्या देशात जातो. दरम्यान टॉमच्या पैशाला भुलून डेझी त्याच्याशी लग्न करते. मात्र गॅटसबी डेझीवरचं आपलं प्रेम विसरुच शकत नाही. त्याची बेचैनी, तगमग मनात काहूर माजवत राहते. तिला काहीही करुन मिळवायचं या निश्‍चयानं तो अमाप संपत्ती जमवतो. पण अमेरिकेत दारूबंदी असताना दारू विकणं आणि इतर अनेक बेकायदेशीर गोष्टी करुन गॅटसबीनं ती संपत्ती जमवलेली असते असं निकच्या लक्षात येतं. आपल्या छोटेखानी घरात त्यानं डेझीला बोलवावं आणि आपली तिच्याशी परत एकदा गाठ घालून द्यावी अशी गॅटसबी निकला विनंती करतो. निक ती विनंती मान्य करतो. डेझीबरोबरच्या भेटीचा दिवस जवळ येतो तसं गॅटसबी निकचं घर उत्तमोत्तम वस्तूंनी भरुन टाकतो. डेझी येण्याच्या वाटेवर फुलझाडांच्या कुंड्या ठेवण्यापासून सगळ्या गोष्टींची गॅटसबी उत्कृष्ट व्यवस्था करतो. डेझी आणि गॅटसबी भेटतात. सुरुवातीला दोघंही जरा बिचकत असले तरी पूर्वायुष्यातल्या प्रेमाला उजाळा मिळतो आणि दोघं एकमेकांच्या बाहुपाशात विसावतात. मग गॅटसबी तिला आणि निकला आपल्या घरी घेऊन जातो. घरातल्या उंची वस्तू तिला दाखवण्यात तो रमतो. हलाखीच्या परिस्थितीतून धनंवत बनण्यापर्यंतचा आपला प्रवास तो डेझीला मोठ्या अभिमानानं दाखवत असतो. यानंतर गॅटसबी आणि डेझी एकमेकांना भेटत राहतात. त्यांच्यातलं प्रेम वाढत राहतं. या भेटीगाठींदरम्यान गॅटसबी एकदा निकला आपल्या पूर्वआयुष्याबद्दल पूर्ण कल्पना देतो. जे गॅटसबीचं खरं नाव असतं - जेम्स गॅटझ! अतिशय विपन्नावस्थेतल्या शेतकरी आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या गॅटसबीला आपलं गरीब असणं मनोमन कधीच मान्य नसतं. वयाच्या १७ व्या वर्षी त्याला अचानक डॅन कोडी हा व्यावसायिक भेटतो. कोडीच्या बोटीतून दोघंजण समुद्रातून जगाची सफर करतात. तेव्हा कोडी हा गॅटसबीचा मेंटॉर बनतो. कोडीच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती आणि व्यवसाय यांचा मालक बनलेला जेम्स स्वत:ला जे गॅटसबी म्हणवून घ्यायला सुरुवात करतो. संपत्ती वाढवत नेण्यासाठी समाजातल्या आणि राजकारणातल्या उच्चभ्रू लोकांना हाताशी धरतो. वाट्टेल ते करुन पैसे जमा करत राहतो. गॅटसबीबद्दलचं निकचं गूढ आणि आकर्षण मात्र वाढत राहतं. यानंतर एका प्रसंगात टॉमच्या घरी टॉम, डेझी, निक, गॅटसबी आणि इतर काही मित्रमैत्रिणी जमलेले असतात. तेव्हा गॅटसबीवर आपल्या बायकोचं प्रेम आहे हे टॉमच्या लक्षात येतं. त्यानंतरच्या घटना वेगात घडतात. ते सर्वजण शहरात जातात. परत येताना गॅटसबी आणि डेझी एका गाडीतून येतात. भरधाव वेगानं ती गाडी चाललेली असताना चक्क मिर्टल ही टॉमची मैत्रिण मध्ये येते आणि गाडी तिच्या अंगावरुन पुढे निघून जाते. डेझीनं नवऱ्याला गॅटसबीवरच्या प्रेमाबद्दल सांगायचं आणि मग दुसऱ्या दिवशी दोघांनी पळून जायचं असं गॅटसबी आणि डेझी ठरवतात. गॅटसबी डेझीला तिच्या घरी सोडून आपल्या घरी जातो. अत्यंत उत्कटतेनं प्रत्येक क्षण मोजत तिची वाट पहातो. या प्रतीक्षेला साक्षीदार असतो निक..! 

कादंबरीच्या शेवटी मिर्टल मरण पावताना गाडी चालवणारी व्यक्ती डेझी होती हे वाचकांना कळतं आणि धक्का बसतो. पण पैशांच्या जोरावर हे प्रकरण टॉम मिटवतो. डेझी चक्क टॉमबरोबर दुसऱ्या शहरात निघून जाते. दरम्यान मिर्टलच्या अपघाताला आणि मृत्यूला गॅटसबीच जबाबदार आहे असं मिर्टलच्या नवऱ्याला पटवण्यात टॉम यशस्वी होतो. डेझी येईल आणि आपण एक नवीन दुनिया उभी करू याचं स्वप्नं पाहणाऱ्या गॅटसबीचा खून होतो. गॅटसबी एकटा, एकाकी मरण पावतो. त्यानं पाण्यासारखा पैसा खर्च करुन दिलेल्या पार्ट्यांना हजर असणारा एकही माणूस त्याच्या शवयात्रेला येत नाही..! ''Let us learn to show our friendship for a man when he is alive and not after he is dead.''.. हे लेखकाचं वाक्‍य मनावर चरे उमटवत राहतं. आपल्या कामावर परतण्यापूर्वी निक एकदा गॅटसबीच्या प्रासादतुल्य घरापाशी थबकतो. रात्रीच्या वेळी समोरच्या हिरव्या गूढ रंगाकडे पाहणाऱ्या गॅटसबीची त्याला प्रकर्षानं आठवण येते. सदोदित पुढचं पाऊल टाकायच्या तयारीत असलेल्या आपल्या सगळ्यांनाच भूतकाळ कसा गॅटसबीप्रमाणेच मागे खेचत असतो त्याची निकला हताश जाणीव होऊन कादंबरी संपते..! 

'द ग्रेट गॅटसबी'ही निव्वळ प्रेमकहाणी मात्र नाही. 'अमेरिकन ड्रीम' भंग पावणं, हावरटपणा अशा संकल्पना यात सतत दिसतात. 'अमेरिकन ड्रीम'चा गॅटसबी कसा बळी ठरतो ते या कादंबरीत उत्कृष्टपणे उतरलं आहे. प्रत्येक अमेरिकन नागरिकाला स्वातंत्र्य, समानता आणि समान संधी मिळायला हवी या आदर्शावर 'अमेरिकन ड्रीम' ही संकल्पना उभी होती. १८९० पासून अमेरिकन मिशनरी आणि उद्योजकांनी अमेरिकेच्या विकासाच्या आणि यशाच्या या मॉडेलचा जगभर प्रचार केला होता. अंगात धडाडी आणि डोळ्यात स्वप्नं असलेल्या कोणीही या देशात यावं आणि स्वत:ची आणि त्याचबरोबर देशाची प्रगती करावी हे त्याकाळी शक्‍य असायचं. तिथे अपवर्ल्ड मोबिलिटी खूपच जास्त होती. त्याचा परिणाम म्हणून उज्वल भवितव्यासाठी, यशस्वितेसाठी अनेक देशातले लाखो लोक अमेरिकेच्या किनाऱ्यावर येऊन धडकायला लागले होते. पण काही काळातच या वाढत्या प्रगतीनं चंगळवादाचं रुप धारण केलं. सामान्य लोक नवनवीन गाड्या, महागडी घरं अशा तथाकथित विकासासाठी मरेस्तोवर काम करत होते. सगळेजण फक्त चंगळवादी ग्राहक बनत चालले होते. याचवेळी झटपट श्रीमंत होण्याच्या मागे लागल्यामुळे गुन्हेगारीही बळावली होती. अमेरिकेत तेव्हा दारूवर पूर्णपणे बंदी होती. अवैधपणे दारू विकून आणि इतर असेच धंदे करुन संपत्ती कमावणाऱ्या थोडक्‍यात कवेत न येणाऱ्या क्षितिजाकडे वाटचाल करण्याची इच्छा बाळगणाऱ्या गॅटसबीची अखेर ठरलेली असतेच..! या कादंबरीची अनेक नाट्यरुपांतरं झाली आणि त्यावर अनेक चित्रपटही निघाले. मात्र टायटॅनिक फेम लिओनार्डो डी कॅप्रिओ यानं जे गॅटसबी २०१३ मध्ये याच नावाच्या चित्रपटात फार गहिरा उतरवला होता.   

पुस्तकासाठी ॲमेझॉन लिंक 
https://www.amazon.com/Great-Gatsby-F-Scott-Fitzgerald/dp/1781396833 
 

संबंधित बातम्या