रिश्‍ता क्‍या है तेरा मेरा..!

नीलांबरी जोशी
मंगळवार, 20 मार्च 2018

बुक-क्लब    
 कथा संग्रह : अनअकस्टम्ड अर्थ 
 लेखक : झुंपा लाहिरी

फासले ऐसे भी होंगे यह कभी सोचा न था, सामने बैठा था मेरे और वह मेरा न था।’ असा नात्यांचा गुंतागुंतीचा प्रवास आणि त्यातले कधी जवळीक साधणारे तर कधी दूर नेणारे, कधी पराकोटीचा आनंद देणारे तर कधी बेचैन करणारे, कधी एकमेकांना श्‍वापदासारखे चावे घेणारे तर कधी अत्यंत समजूतदार हळवेपणाने एकमेकांना समजून घेणारे, कधी समर्थ साथ देणारे तर कधी असहाय्य करणारे, कधी एकमेकांना आपण किती ओळखतो याचे नवल वाटायला लागणारे तर कधी अनेक वर्षे सोबत राहून एकमेकांचा थांगच लागत नाही असे वाटायला लावणारे असंख्य क्षण झुंपा लाहिरीच्या प्रत्येक कथा-कादंबऱ्यांमध्ये येतात. 

‘अनअकस्टम्ड अर्थ’ यातल्या आठही कथा याला बिलकूल अपवाद नाहीत. बंगाली वंशाचे आईवडील असलेल्या झुंपा लाहिरीच्या ‘द इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज’ या कथासंग्रहाला ‘पुलित्झर’ पारितोषिक मिळाले होते आणि ‘द नेमसेक’ या कादंबरीवर चित्रपटही निघाला होता. त्यानंतरचा २००८ वर्षांचा ‘अनअकस्टम्ड अर्थ’ हा कथासंग्रह ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बेस्टसेलरमध्ये होता. आपली मुळे सोडून दूर देशात गेलेल्या कोणत्याही देशातल्या माणसांना तिची पुस्तके आपलीशी वाटू शकतात. या अर्थाने ही पुस्तके वैश्‍विक आहेत. 

‘अनअकस्टम्ड अर्थ’ या कथासंग्रहातली पहिली याच नावाची कथा रुमाचे वडील, रुमा आणि तिचा मुलगा आकाश या तीन पिढ्यांभोवती फिरते. रुमाचे वडील फार्मा कंपनीतून निवृत्त झालेले असतात. रुमाची आई मरण पावल्यानंतर ते अमेरिकेतल्या एका शहरात आनंदात राहात असतात. वर्षातून अनेकदा युरोपमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या ट्रीपवर जाणारे रुमाचे वडील तिकडून आपली खुशाली रुमाला कळवत असतात. अशाच एका ट्रिपला जायच्या आधी ते रुमाकडे आठवडाभर जायचे ठरवतात. वकील असलेल्या रुमाने ॲडमशी लग्न केलेले असते. त्यांचा मुलगा आकाश जन्माला आल्यानंतर ती नोकरी सोडून देते. आता रुमाचे दुसरे अपत्य तिच्या पोटात वाढत असते. ॲडम आठवडाभरासाठी टूरवर जाईल तेव्हाच वडील आपल्याकडे राहायला येतील याची रुमाला जरा धास्तीच असते. आईशी रुमाचे पूर्वीपासून सख्य असते, पण वडील तिला कायम दूरस्थ भासतात. 

पण तिचे वडील येतात आणि रुमाच्या अपेक्षेपेक्षा सगळेच वेगळे घडते. ते आकाशबरोबर दोस्ती करतात, त्याला अंघोळ घालायला मदत करतात. त्याला रात्री गोष्टी वाचून दाखवतात. एखाद्या वेळेला बंगाली जेवण केले नसेल तर अमेरिकन पद्धतीचे जेवणही ते आनंदाने जेवतात. रुमाला आणि आकाशला त्यांची सवयच होऊन जाते. रुमा तर त्यांना आपल्यासोबत राहायला यायचा आग्रह करते. पण आपली स्वतंत्र दुनिया सोडायला ते राजी होत नाहीत. 

कथेच्या शेवटी रुमाला त्यांचे पोस्टात टाकायचे राहिलेले एक पोस्टकार्ड सापडते. त्यावर मीनाक्षी बागची नावाच्या महिलेचा उल्लेख असतो. कथेच्या ओघात रुमाच्या वडिलांच्या मनोगतांमधून अमेरिकेत एकटी राहणारी, उच्चविद्याविभूषित, आधुनिक पोशाख घालणारी बागची ही नेटकी स्त्री रुमाच्या वडिलांना आवडत असल्याचे वाचकांना कळलेलेच असते. ते पोस्टकार्ड पाहून आपल्या वडिलांच्या सत्तरीतही उत्फुल्ल जगण्याचे, आकाशबरोबर तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने खेळण्याचे, खाण्यापिण्याच्या बाबतीत तडजोड करताना कुरकूर न करण्याचे आणि युरोपमध्ये फिरताना हरवून जाण्याचे कारण रुमाला कळते. ते असते तिचे वडील आणि मीनाक्षी बागची यांच्यातले प्रेम..! पुस्तकातली ही पहिली कथा केवळ आठ दिवसांचे आयुष्य रंगवते तर दुसरी ‘हेल-हेवन’ ही कथा मात्र २५ वर्षांचा काळ वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा करते. या कथेची नायिका उषा तिच्या नजरेतून आपल्या कुटुंबाचे पूर्वायुष्य सांगत जाते. उषा लहान असताना बॉस्टनमध्ये ती आणि तिची आई अपर्णा यांना एके दिवशी प्रणब चक्रवर्ती हा अमेरिकेतला एमआयटीमधला पदवीधर तरुण भेटतो. कलकत्त्यातल्या घराची आणि कुटुंबीयांची त्याला सतत आठवण येत असते. बंगाली वंशाची अपर्णा आणि उषा यांच्या कुटुंबाशी त्यांची चटकन मैत्री होते. उषा तर प्रणबकाकाला चिकटतेच. अपर्णाचा नवरा श्‍यामलदा हा बायकोशी फटकून वागणारा असल्यामुळे अपर्णाला मनमोकळा प्रणब आवडायला लागतो. या नात्यात पुढे जाता येणार नाही हे दोघांनाही ठाऊक असते. पण तरीही आपल्या डेबोरा या मैत्रिणीला घेऊन प्रणब घरी आल्यावर अपर्णाला तिचा मत्सर वाटतो. प्रणबचे डेबोराशी लग्न होते. अपर्णा प्रत्येक भेटीत डेबोराच्या चुका काढत राहते. त्या दोघांचे पटणार नाही आणि त्यांचा घटस्फोट होईल असे म्हणत राहते. 

लग्नानंतर २३ वर्षांनी दुसऱ्याच एका बंगाली विवाहित स्त्रीच्या मोहात सापडलेला प्रणब, डेबोरा आणि आपल्या दोन मुलींना सोडून देतो. त्यांचा घटस्फोट होणार हे अटळ झाल्यावर डेबोरा फोन करून अपर्णापाशी आपले दुःख व्यक्त करते. अपर्णा तिचे सांत्वन करते. पण तेव्हाच एका पुरुषाने लग्नाचे वचन देऊन फसवलेल्या उषाला आपले एक गुपितही सांगते. ते म्हणजे, प्रणबचे लग्न ठरल्यावर अपर्णाने एकदा पेटवून घेऊन आत्महत्या करू असा विचार केलेला असतो. आई-मुलीमधले जिव्हाळ्याचे नाते या प्रसंगात मनाला एकदम भिडते. 

‘चॉईस ऑफ अकामॉडेशन्स’ या तिसऱ्या कथेत अमित आणि त्याची बायको मेगन अमितच्या एका मैत्रिणीच्या लग्नासाठी दुसऱ्या शहरात जातात. छोट्याछोट्या गोष्टींवरून दोघेही अस्वस्थ असतात. त्यात अमित दारू पिऊन झिंगतो. मेगनबरोबर आपण फारसे आनंदात नसल्याचे एका मित्रापाशी कबूल करतो. या कथेत शेवटी अमित आणि मेगन एकत्र येतात. ‘ओन्ली गुडनेस’ या चौथ्या कथेत सुधा आणि राहुल या बहीण-भावंडांचे समांतर आयुष्य आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका चौकोनी कुटुंबातला राहुल विद्यापीठात शिकत असताना त्याला दारूचे व्यसन लागते. दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल त्याला एकदा अटकही होते. नंतर आईवडिलांबरोबर राहून तो छोट्यामोठ्या नोकऱ्या करत दिवस काढायला लागतो. एलेना या मुलीशी लग्न ठरल्यावर सगळे ठीकठाक होईल असे वाटते. पण लग्नातच दारू पिऊन गोंधळ घातल्याने राहुलचे आईवडिलांशी भांडण होते. तो वेगळा रहायला लागतो.

दरम्यान सुधा मात्र ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स’मधून उत्तम शिक्षण घेते. रॉजरसोबत लग्न करून ती लंडनमध्येच स्थिरावते. तिला नील हा मुलगा आणि क्रिस्टल ही मुलगी अशी दोन अपत्ये होतात. क्रिस्टल लहान असताना राहुल लंडनला येणार असल्याचे सुधाला कळवतो. तेव्हा सुधा त्याला आपल्या घरी बोलावते खरी, पण त्याच्या दारूच्या व्यसनामुळे तिच्या मनात धाकधूकच असते. आश्‍चर्य म्हणजे राहुल तिच्या घरात खूप जबाबदारीने वागतो. आपण दारू सोडल्याचे सुधाला सांगतो. सुधाचा जरासा विश्‍वास बसल्यावर ती आणि रॉजर एकदा मुलांना राहुलपाशी सोडून चित्रपट पाहायला जातात. पण ते परत येतात तर नीलला टबमध्ये बसवून राहुल दारूच्या नशेत तर्रर्र झालेला दिसतो. आता परत सुधाचा आपल्यावर कधीच विश्‍वास बसणार नाही, या विचाराने राहुल तिथून निघून जातो. दोघे कायमचे दुरावतात. ‘नोबडीज बिझिनेस’ ही पाचवी कथा न्यूयॉर्कमध्ये राहणारा पॉल वाचकांना सांगतो. तो राहात असतो, त्या अपार्टमेंटचा खर्च वाटून घ्यायला तिथे संगीता ही तिशीतली अविवाहित तरुणीदेखील राहायला येते. चार्ल्स हा संगीताचा मित्र तिला मदत करत असतो. त्या दोघांमध्ये प्रेम असावे असे वाटले, तरी संगीताचे मनापासून प्रेम असते ते फारुखवर..! पण फारुख तिच्याशी भांडण उकरून काढतो आणि निघून जातो. दरम्यान आपल्या बहिणीला झालेले बाळ पाहायला संगीता लंडनला जाते. इकडे पॉलला एका स्त्रीचा सारखा फोन येतो. तिच्याकडून ती फारुखची प्रेयसी असल्याचे पॉलला कळते. संगीता आपली चुलतबहीण आहे, असे त्या स्त्रीला फारुखने सांगितलेले असते. संगीताचे फारुखवर किती प्रेम आहे हे ठाऊक असलेल्या पॉलला धक्काच बसतो. संगीता लंडनहून परत आल्यावर त्या दुसऱ्या स्त्रीकडून तिला फारूखच्या उच्छृंखल स्वभावाबद्दल माहिती कळते. फारूखला अनेक मैत्रिणी असतात. त्यांच्यावर हुकमत गाजवायची, त्यांच्याकडून कामे करून घ्यायची अशी फारुखची वृत्ती असते. या माहितीने संगीता खूप अस्वस्थ होते आणि बहिणीकडे निघून जाते. कथेच्या शेवटी पॉलला एका बागेत फारुखबरोबर दुसरीच एक मैत्रीण दिसते. 

या कथासंग्रहाच्या शेवटी ‘हेमा अँड कौशिक’ या दीर्घकथेची तीन प्रकरणे आहेत. त्यातले ‘वन्स इन अ लाईफटाईम’ हे पहिले प्रकरण हेमाच्या नजरेतून वाचकांसमोर येते. टीनएज हेमा आपल्या आईवडिलांबरोबर अमेरिकेत राहात असते. कौशिकचे आईवडील तेव्हा सात वर्षांनंतर अमेरिकेत परत येतात. सुरवातीला काही दिवस ते हेमाच्या घरात राहतात. सतत दारू पिणाऱ्या आणि सिगारेट्‌स ओढणाऱ्या या जोडप्याबद्दल हेमाच्या मनात अढी बसते. त्यांचा मुलगा कौशिकबरोबर मात्र हेमाचे सख्य जुळते. या प्रकरणाच्या शेवटी कौशिकच्या आईला कर्करोग असल्याचे आणि ती थोड्याच दिवसांची सोबती असल्याचे हेमाला कळते. दुसऱ्या ‘इअर्स एंड’ या प्रकरणात कौशिकच्या नजरेतून घडणाऱ्या घटना दिसतात. कौशिकची आई मरण पावते आणि त्याचे वडील चित्रा या बंगाली महिलेशी लग्न करतात. चित्रा वयाने त्यांच्यापेक्षा बरीच लहान असते. तिला दोन मुली असतात. ते सर्वजण कौशिकशी चांगले वागतात. पण आईपेक्षा जुनाट, परंपरावादी, भित्रट अशा चित्राबद्दल कौशिकच्या मनात तिटकारा निर्माण होतो. कॉलेजचे शिक्षण संपवून तो जगभर स्वतःचे अस्तित्व शोधण्यासाठी फोटोजर्नालिस्ट बनून भटकायला लागतो. तिसऱ्या ‘गोईंग अशोअर’ या प्रकरणात हेमा आणि कौशिक वीस वर्षांनंतर इटलीमध्ये भेटतात. हेमा कॉलेजमध्ये प्राध्यापक असते. एका विवाहित माणसाच्या प्रेमात पडून पोळलेली हेमा तुटपुंज्या ओळखीवर नवीन नावाच्या एका इसमाशी लग्न करण्याच्या बेतात असते. हेमा आणि कौशिक दोघेजण रोममध्ये भटकतात. कथेच्या शेवटी नवीनला सोडून हेमाने आपल्याबरोबर हाँगकाँगमध्ये राहायला यावे, असा प्रस्तावही कौशिक हेमासमोर ठेवतो. पण २००४ च्या त्सुनामीमध्ये कौशिक मरण पावतो. दोघांनी एकत्र येण्याची स्वप्ने भंग पावतात. 

झुंपाच्या कथा वाचताना गौरी देशपांडे यांच्या पुस्तकांची सतत आठवण येते. नात्यातले अनेक धूसर पदर दोघींच्याही लिखाणात सारखेच जाणवत राहतात. ‘नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाग नाही’ या कुसुमाग्रजांच्या कवितेसारखे या कथांमधल्या नात्यांना आणि झुंपाच्या कथांबरोबर आपले जे नाते जुळते त्याला काही नाव देता येत नाही..! 

पुस्तकासाठी ॲमेझॉन लिंक :
https://www.amazon.in/Unaccustomed-Earth-Jhumpa-Lahiri/dp/818400060X

संबंधित बातम्या