तेरे देसमें मेरे भेसमें..!

नीलांबरी जोशी
गुरुवार, 21 जून 2018

बुक-क्लब
 कादंबरी : द इनहेरिटन्स ऑफ लॉस
 लेखिका : किरण देसाई

‘‘पण त्याच्या अंगाला वास येतोय.’’ मालकाची बायको म्हणत होती, ‘‘तो केसांना जे तेल लावतो त्याची मला बहुतेक ऍलर्जी आहे.’’ तिला युरोपमधल्या गरीब देशांमधून आलेली माणसं नोकर म्हणून अपेक्षित होती. बल्गेरियन किंवा झेकोस्लोव्हाकियन्स..! त्यांचा धर्म, त्यांच्या त्वचेचा रंग, त्यांच्या खाण्याच्या सवयी तरी जुळल्या असत्या; पण ती माणसं मात्र अमेरिकेत फारशी येत नव्हती. मालकानं मग साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, शांपू, नेलकटर आणि मुख्य म्हणजे एक डिओड्रंट आणला आणि बिजूला ते वापरायला सांगितलं....! बुकर पारितोषिक विजेत्या किरण देसाईच्या 'द इनहेरिटन्स ऑफ लॉस' या कादंबरीतला बिजू हा नेपाळमधला गरीब तरुण अमेरिकेत नशीब आजमवायला जातो. तिथे एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये वेटरचं काम करत असताना त्याला ही वागणूक मिळते. 

या कादंबरीची लेखिका किरण देसाई या सुप्रसिद्ध लेखिका अनिता देसाई यांची मुलगी. भारतात चंदीगढमध्ये जन्माला आलेल्या किरणनं शिक्षण पुणे-मुंबई या ठिकाणी राहून घेतलं. वयाच्या १५व्या वर्षी किरण आपल्या आईबरोबर प्रथम इंग्लंड आणि नंतर अमेरिकेत गेली. १९९८मध्ये अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाच तिची पहिली 'हल्लाबालो इन द गुआव्हा ऑर्चर्ड' ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर आठ वर्षांनी 'द इनहेरिटन्स ऑफ लॉस' ही कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीला २००६ मध्ये 'बुकर' हे मानाचं पारितोषिक मिळालं. महत्त्वाचे म्हणजे ‘‘सर्वात लहान वयात हे पारितोषिक मिळवणं’’ हे किरण देसाई हिचं रेकॉर्ड आहे. 

‘‘पाहाता पाहाता अंधारलं आणि त्या काळोखात झाडांच्या फक्त आकृत्याच दिसायला लागल्या’’ किंवा ‘‘दिवसभर संध्याकाळच्या रंगासारखं धुकं पहाडावरुन पाण्यातला एखादा जीव पाण्यात तरंगावा तसं तरंगत होतं’’ अशा तरल वर्णनांनी ही कादंबरी सुरू होते. त्यातून हिमालयातल्या कांचनगंगेच्या पायथ्याशी वसलेल्या एका गावातल्या 'सई' या कादंबरीतल्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेबद्दल वाचकांना कळत जातं. पण सुरवातीला तरल वाटलेली ही कादंबरी नंतर मात्र धर्मापासून ते वसाहतवादापर्यंत अनेक विषयांवर भाष्य करत जाते. 

गावातल्या एका प्रासादासारख्या बंगल्यात जेमुभाई पटेल हे धनवान जज्ज, त्यांचा एक अनामिक खानसामा आणि जेमुभाईंची नात सई हे तिघं राहात असतात. कादंबरीतली अजून एक महत्त्वाची व्यक्तिरेखा 'मट' या कुत्र्याची आहे. 

भारतावर ब्रिटिशांचं राज्य असताना त्या काळात शिकलेल्या, साहेबी परंपरांचा अभिमान बाळगणाऱ्या, वुडहाऊस आणि क्रिकेट या दोन गोष्टींबद्दल त्या ब्रिटिशांना आवडतात म्हणून महत्त्व देणाऱ्या, पोळी सुद्धा काटाचमचा घेऊन खाणाऱ्या, भारतातल्या परंपरा आणि रीतिरिवाज यांचा तिटकारा करणाऱ्या एका विशिष्ट वर्गाचे जेमुभाई हे प्रतिनिधी आहेत. जेमुभाई वयाच्या विसाव्या वर्षी १९६९ मध्ये इंग्लंडमध्ये शिकायला गेलेले असतात. तेव्हा त्यांचं १४ वर्षांच्या खालच्या जातीतल्या निमी या मुलीबरोबर केवळ तिच्या संपत्तीकडे पाहून लग्न झालेलं असतं. तरुण जेमूच्या उज्वल भवितव्याकडे पाहून आपला सामाजिक स्तर उंचावेल यासाठी निमीचे वडिलांनी भरपूर हुंडा देऊन हे स्थळ पटकावलेलं असतं. लग्न झाल्यावर ताबडतोब वकिलीच्या उच्च शिक्षणासाठी केंब्रिजमध्ये गेलेल्या जेमूला त्याचे वर्गमित्र 'भारतीय वंशाचा' म्हणून कमी लेखतात. मित्र हिडिसफिडिस करतात या कारणानं जेमू बराच काळ एकाकी घालवतो आणि एकलकोंडा बनतो. 

भारतात परत आल्यावर जेमुभाई सरकारी नोकरी धरतात. त्या नोकरीत फिरताना खाण्यापिण्याची हेळसांड होऊ नये यासाठी ते एक खानसामा निवडतात. खानसामा हा देखील इंग्रजांचं अनुकरण करण्याचाच एक प्रकार असतो. जेमुभाई या दरम्यान निमीवर कमालीचे नाखुष असतात. अशिक्षित निमीनं कोणाशी बोलू नये, मिळूनमिसळून वागू नये यासाठी ते तिला घरात डांबून ठेवल्यासारखंच वागवतात. दरम्यान निमीचा गावंढळपणा एका प्रकरणात उघडकीला आल्यावर जेमुभाई तिला मारहाण करुन माहेरी पाठवून देतात. नवऱ्याकडून परत आलेली बायको हा तिथे प्रचंड अपमान समजला जातो. माहेरी असतानाच निमी एका मुलीला जन्म देते. अखेरीस निमी स्टोव्हच्या ज्वाळेचा भडका उडून मरण पावते. निमीच्या माहेरच्याच एका नातेवाईकानं तिचा खर्च वाचवण्यासाठी तिला त्या ज्वाळेत ढकललं असावं असा जेमुभाईंना संशय असतो. अर्थात आपला संशय पडताळून पहायच्या भानगडीत ते पडत नाहीत. 

निमीची मुलगी आणि सईची आई ज्या माणसाशी लग्न करते तो रशियात अंतराळवीराचं प्रशिक्षण घेत असतो. नंतर सईचे आईवडील मरण पावता तेव्हा लहानग्या सईला जेमुभाई घेऊन येतात. ''आपण बायकोला सोडून दिल्यानंतर ती मरण पावली'' या अपराधी भावनेतून ते नातीचा सांभाळ करतात. जेमुभाईंच्या सामाजिक प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे घराबाहेरच्या लोकांमध्ये ते सईलाही मिसळून देत नाहीत. ती एकाकी पडते. 

भारतीयांबद्दचा जेमुभाई यांच्या मनात खूप तिरस्कार असतो त्यामुळे ते सईला कॉन्व्हेंटमध्ये घालतात. तसंच नोनी आणि लोला या दोन अँग्लो इंडियन स्त्रियांना ते सईला शिकवायला घरी बोलावतात. मात्र सई हुशार असल्यामुळे तिला गणितात आणि विज्ञानात खूप गती असते. नोनी आणि लोला यांचं ज्ञान त्यामानानं मर्यादित असतं. मग सईला शिकवायला ग्यान हा तरुण नेपाळी शिक्षक येतो. घुसमटलेली सई त्याच्याकडे तारुण्यसुलभ भावनेनं आकर्षित होते. सामाजिक आणि आर्थिक स्तरावर प्रचंड तफावत असतानाही ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. घरातल्या म्हाताऱ्या खानसाम्याला सईबद्दल ममत्व असतं. त्याला सई आणि ग्यानच्या प्रेमातले अडथळे दिसत असतात त्यामुळे तो त्यांना विरोध करायचा प्रयत्न करतो. 

खानसाम्याचा मुलगा बिजू अमेरिकेत असतो. सई आणि बिजू या दोघांभोवती या कादंबरीचं कथानक कधी भूतकाळ तर कधी वर्तमानकाळ अशा हिंदोळ्यावर झुलत जातं. भारतात असताना मिळणाऱ्या हीन वागणुकीला कंटाळून बिजू अमेरिकेत गेलेला असतो. अमेरिकन संस्कृतीशी त्याची नाळ जुळत नाही. बिजूचा अमेरिकेतला व्हिसा संपल्यावरही हॉटेल्समध्ये भांडी घासून तो कशीबशी गुजराण करत असतो; मात्र वडिलांना पत्रं लिहिताना बिजू आपण खूप आनंदात असल्याचं भासवतो. त्या पत्रांमुळे भारावून जाऊन त्याचे जेमुभाईंकडे खानसाम्याचं काम करणारे वडील मित्र आणि शेजाऱ्यांमध्ये भाव खात असतात. प्रत्यक्षात बिजूला अमेरिकेतल्या इटालियन, चायनीज, टेकअवे फूड विकणाऱ्या हॉटेल्समध्ये तो भारतीय वंशाचा असल्यामुळे मालकांकडून भरपूर शिवीगाळ आणि अपमानास्पद वागणुकीला तोंड द्यावं लागतं. सोबतचे अमेरिकन कर्मचारी त्याला छळतात ते वेगळंच. कंटाळून तो एका हिंदू माणसानं चालवलेल्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये कामाला लागतो. तिथे गायीचं मांस शिजवत नसतात आणि आपल्या भाषेत त्याला सोबतच्या नोकरांबरोबर बोलता येतं एवढीच त्याला जमेची बाजू वाटते. पण तिथेही मालक पुरेसा पगार देत नसल्यामुळे बिजूला स्वयंपाकघरातच झोपावं लागतं. तशात एका अपघातात त्याच्या पायाला जखम होते. अपंगावस्थेत त्याला काम करणं दुरापास्त होतं. वैद्यकीय खर्चाची बिलंही द्यायची असतात. शेवटी या सगळ्याला वैतागून तो उरलेसुरले पैसे घेऊन परत भारतात यायचं ठरवतो. 

तोपर्यंत भारतात नेपाळी लोकांची चळवळ सुरू होते. 'गुरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या' (जीएनएलएफ) आंदोलनात स्वतंत्र गुरखालॅंडची मागणी केली जाते. या दरम्यान सई आणि ग्यानचं प्रेम पणाला लागतं. आपले पूर्वज नेपाळी होते आणि लष्करात लढताना ते मेसोपोटेमिया, ब्रम्हदेश, इटलीत मरण पावलेले होते असं ग्यानला कळतं. स्वतंत्र भारतात आपल्याला खालच्या दर्जाची वागणूक मिळते, असं पटल्यामुळे ग्यानही 'जीएनएलएफ'मध्ये सामील होतो. सईच्या घराचा कानाकोपरा ठाऊक असल्यानं त्या घराचा रस्ता आपल्या साथीदारांना ग्यानच दाखवतो. ते सर्वजण सईच्या घरातून दारूच्या बाटल्या, अन्न आणि शस्त्रं पळवतात. 

सई आणि गावातले अनेक लोक त्या दहशतीच्या छायेखाली वावरत असतात. या दरम्यान सई एकदा ग्यानच्या घरी जाते. तिथल्या दारिद्रयाच्या दर्शनानं ती भयचकित होते. याच काळात 'जीएनएलएफ'चे सदस्य लोला आणि नोनीचं घर ताब्यात घेऊन त्यांना हाकलून देतात. 

या दहशतसत्रात पोलिस जेमुभाईंच्या खानसाम्याला पकडतात. त्यांच्या चकमकीत मट हा जेमुभाईंचा कुत्रा मरतो. हे पाहून जेमुभाई आपल्या निष्ठावान खानसाम्याला चांगलंच बदडून काढतात. बिजूला हे कळतं. अमेरिकेत दडपला गेलेला बिजू परत यायचं ठरवतो. तो तसा येतोही. पण गावात आल्यावर घरी परत येताना 'जीएनएलएफ'चे सदस्य त्याच्या अंगावरचे कपडे आणि पैसे असं सगळं लुटतात. अंगावर कपडा नसलेला बिजू एका महिलेचा चोरलेला गाऊन घालून परत येतो. कसंही असलं तरी आपला मुलगा परत आला याचा खानसाम्याला आनंद होतो आणि कादंबरी संपते. 

या कादंबरीत जेमुभाई भारतातल्या लोकांशी जुळवून घेऊ शकत नाहीत आणि ब्रिटिश त्यांना स्वीकारत नाहीत. सतत दडपणात असल्यामुळे सईला जेमुभाईंबरोबर आत्मीयता वाटत नाही आणि ग्यानही तिला परका ठरतो. बिजूला भारतात आपण नकोसे आहोत असं वाटल्यानं तो अमेरिकेत जातो. अमेरिकन लोकही त्याला स्वीकारत नाहीत. या सर्व व्यक्तिरेखांना आपली पाळंमुळं कशाशी जोडली आहेत याचा प्रश्नच पडतो. या अर्थानं या कादंबरीचं नाव 'इनहेरिटन्स ऑफ लॉस' असं आहे. खरं तर जगातल्या सर्वच स्थलांतरित लोकांना आपण कुठून आलो आणि कुठे चाललो आहोत असे प्रश्न पडणं साहजिक आहे. या अर्थानं ही कादंबरी वैश्विक आहे. स्थलांतराची कारणं वेळोवेळी वेगवेगळी असली तरी पर्यावरणातल्या समस्या, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ही आपला देश सोडून दुसरीकडे जाण्याची महत्त्वाची कारणं असतात. त्यातही उच्च शिक्षण आणि नोकरी/व्यवसाय यातून स्वत:ची उन्नती हा स्थलांतर करण्याचा सहसा प्रमुख हेतू असतो. मग वर्णभेद, परदेशातली संस्कृती, धर्म आणि सामाजिक वर्गव्यवस्था या गोष्टी दुसऱ्या देशात खूप महत्त्वाच्या ठरत जातात. अशाच कटू अनुभवातून 'मुजाहिर' असं म्हणल्याचा नासिरुद्दीन शहाला आलेला राग 'सरफरोश' चित्रपटात दिसतो, जॅक निकोलसनच्या भूमिकेनं गाजलेला 'चायना टाऊन' सानफ्रान्सिस्कोमधल्या चिनी कम्युनिटीबद्दल बोलतो.. ! अरुण साधू यांच्या 'त्रिशंकू' मधल्या नायकाची अवस्थाही काही फार वेगळी नाही. २०१७ मध्ये भारतीय वंशाचे इतर देशात राहणारे लोक १.७ कोटी होते असं युनायटेड नेशन्सचा अहवाल सांगतो. जगात एकूण २५.८ कोटी लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक झालेले आहेत. 

स्थलांतरित लोकांच्या प्रश्नाबरोबरच वसाहतवादाचे परिणाम; धर्म, वर्ण, वंश आणि जात या भेदांमधले जगभरातले वाद, वसाहतवादाचे परिणाम अशा अनेक धगधगत्या प्रश्नांना लेखिकेनं यात हात घातला आहे. ''एकदा प्रवास सुरू झाल्यानंतर त्याला शेवट नसतो'' असं एक वाक्‍य या कादंबरीत आहे. पण लेखिकेनं मांडलेल्या प्रश्नांचा प्रवास मात्र मानवतावादी, विवेकवादी जग निर्माण होऊन संपावा असं ही कादंबरी वाचून मनात येतं..!

संबंधित बातम्या