त्यागावर करावं ’प्रेम’

नीलांबरी जोशी
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

बुक-क्लब
 पुस्तक ः सिरॅनो द बर्जेरॅक
 लेखक ः एडमंड रोस्ताँ

‘तुझा प्रत्येक कटाक्ष मला एका अनिर्वचनीय आनंदाचा धनी करत जातो. रात्रीच्या या काळोखात माझा आत्मा उजळत जातो. माझ्या इच्छांना जरतारी पंख फुटले असते तरीही तुझ्या इतक्‍या प्रेमळ कटाक्षाची मी कल्पना करू शकलो नसतो. पण एक सांग? माझ्या शब्दांमध्ये तुझं अंत:करण हलवून टाकायची ताकद आहे का? खरं तर त्या शब्दांनी तुझ्या हृदयात झालेली थरथर तुझ्या मोगऱ्यासारख्या गंधासकट माझ्यापर्यंत पोचते आहे..’’

’सिरॅनो द बर्जेरॅक’ या फ्रेंच नाटकातला सिरॅनो हा नायक रोक्‍सॉन या नायिकेच्या प्रासादाबाहेर एका काळोख्या रात्री उभा  असतो. तेव्हा तो रोक्‍सॉनच्या सौंदर्याचं वर्णन करतो. त्यावर ती अत्यानंदानं विभोर होत त्याच्याकडे कटाक्ष टाकते. त्यावरून सिरॅनो हे वरचे संवाद म्हणतो. वृत्तीनं कवी असलेल्या सिरॅनो या सरदाराच्या गहिऱ्या, उत्कट प्रेमावरुन  ’’प्यार एक बहता हुआ दरिया है..’’ या गुलजारच्या ओळी या मनस्वी नाटकात सतत आठवत राहतात.

’सिरॅनो द बर्जेरॅक’ हे नाटक एडमंड रोस्ताँ या फ्रेंच साहित्यिकानं १८९७ मध्ये लिहिलं. महत्त्वाचं म्हणजे हे नाटक पूर्णपणे काव्यरुपात लिहिलेलं आहे. यातल्या काव्यपंक्तींच्या स्वरुपावरही चिक्कार संशोधन झालेलं आहे. जगातल्या अनेक भाषांमध्ये या नाटकाचा अनुवाद झाला आहे. जगभरात अनेक ठिकाणी याची चित्रपट, बॅले अशा भिन्न स्वरूपात सादरीकरणं झाली आहेत. या नाटकाचा इंग्रजी अनुवाद वाचताना देखील मूळ नाटककाराच्या प्रतिभेचा अंदाज येतोच.

मंगेश पदकी यांनी ’राव जगदेव मार्तंड’ नावानं या नाटकाचा मराठी भाषेत अनुवाद केला होता. पुस्तकात याच्या पहिल्या प्रयोगाचा तपशील वाचताना डॉ. श्रीराम लागू व स्मिता जयकर यांनी सिरॅनो आणि रोक्‍सॉन यांच्या भूमिका निभावल्याचं कळतं. ’लमाण’ या श्रीराम लागूंच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात या नाटकाचा उल्लेख आहे.

यातला सिॅरनो फ़्रेंच आर्मीतला एक सरदार असतो. तो आक्रमक वृत्तीचा असला तरी हरहुन्नरी असतो. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो एक, दैवदत्त देणगी असलेला, भाषा ज्यावर प्रसन्न आहे असा कवी असतो. पण आपलं नाक जरा वाजवीपेक्षा जास्त लांब आहे याचा त्याला भयंकर न्यूनगंड असतो. आपल्या कुरुपतेमुळे आपण कोणत्याच स्त्रीच्या प्रेमाला पात्र ठरणार नाही असा त्याचा ठाम समज असतो. त्यामुळेच रोक्‍सॉन या अत्यंत देखण्या युवतीवर त्याचं पराकोटीचं प्रेम असलं तरी तो व्यक्त करुच शकत नाही. ’सिरॅनो द बर्जेरॅक’ या नाटकातले पहिले चार अंक  १६४० या वर्षात पॅरिसमध्ये घडतात. शेवटचा अंक १६५५ मध्ये एका चर्चमध्ये घडतो. नाटकात सुरवातीला एका मोठ्या हॉलमध्ये नाटक पहायला पॅरिसमधल्या विविध स्तरांवरचे लोक जमलेले असतात. नाटक संपतं आणि रिकाम्या हॉलमध्ये लोकांच्या गप्पा चालू होतात. तिथे ख्रिश्‍चियान हा सरदार आपल्या मित्रांसोबत आलेला असतो. अत्यंत  सुस्वरुप अशा रोक्‍सॉनवर अनेकजण फिदा असतात. ख्रिश्‍चियानचंही तिच्यावर प्रेम असतं. एकूण तिथे गदारोळ चाललेला असतानाच सिरॅनो प्रवेश करतो. तलवारबाजीत निपुण असल्यानं तो नाटकात काम करणाऱ्या अभिनेत्यालाच तलवारीचे हात करायचं आव्हान देतो. यानंतर त्याचे तलवारीचे हात व काव्यपंक्ती या हातात हात घालून जातात. गर्दी पांगते.

यानंतर सिरॅनो एका सरदारापाशी आपलं रोक्‍सॉनवर प्रेम असल्याचं कबूल करतो. तेवढ्यात रोक्‍सॉनचीच एक दासी तिथे येते आणि रोक्‍सॉननं सिरॅनोला एकांतात भेटायला बोलावल्याचा निरोप देते. दुसरा एक सरदार येऊन सिरॅनोच्या परतीच्या वाटेवर शंभर एक लोक त्याला मारायला टपले आहेत असा निरोप देतो. 

दुसऱ्या अंकात दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली असते. एका बेकरीतल्या छोट्या खोलीत रोक्‍सॉन आणि सिरॅनो भेटणार असतात. आधी सिरॅनो येतो. रोक्‍सॉनला भेटायला अर्थातच तो फार फार उत्सुक असतो. दरम्यान तो रोक्‍सॉनवरचं आपलं गहिरं प्रेम व्यक्त करणारं एक लांबलचक पत्र लिहितो. रोक्‍सॉन येते. सिरॅनोशी बोलता बोलता शंभर लोकांबरोबर एकट्यानं लढल्यामुळे जखमी झालेल्या त्याच्या हाताला ती मलमपट्टी करते. तेव्हाच आपलं ख्रिश्‍चियानवर प्रेम असल्याचं सिरॅनोला सांगते. ख्रिश्‍चियान एका युध्दाच्या मोहिमेवर असतो आणि तिला त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असते. सिरॅनो सरदार असल्यामुळे त्यानं ख्रिश्‍चियानचं रक्षण करावं अशी गळ घालायला रोक्‍सॉननं सिरॅनोला एकांतात भेटायला बोलाबलेलं असतं. आपली प्राणप्रिय रोक्‍सॉन दुसऱ्या  कोणावर तरी प्रेम करते आहे याचा सिरॅनोला मानसिक धक्का बसतो. पण आपल्या भावना लपवून तो तिच्या प्रस्तावाला होकार देतो.  तेवढ्यात सिरॅनोचा मित्र तिथे येऊन आदल्या दिवशीच्या लढाईत जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. त्याच्याबरोबरच्या सैनिकांमध्ये ख्रिश्‍चियानसुद्धा असतो. बोलाचालीत ख्रिश्‍चियान सिरॅनोच्या लांबलचक नाकाचा उल्लेख करतो. त्यामुळे सिरॅनो चिडतो पण अखेरीस त्यांची मैत्री होते. मग ख्रिश्‍चियान ’’रोक्‍सॉनला एका प्रेमपत्र पाठवायचं आहे पण लिहिण्यात आपल्याला गती नाही’’ असं सिरॅनोला सांगतो. मग सिरॅनो स्वत:चं रोक्‍सॉनला देण्यासाठी लिहून ठेवलेलं पत्र ख्रिश्‍चियानला देतो.

तिसरा अंक सुरू होण्यापूर्वी रोक्‍सॉननं ख्रिश्‍चियानचं (प्रत्यक्षात सिरॅनोचं) प्रेमपत्र वाचलेलं असतं. हळवे, तरल शब्द, अस्फुट भावना यांची आवड असल्यामुळे रोक्‍सॉनची अवस्था ’’तेरा खत लेके सनम पाँव कहीं रखते है हम, कही पडते है कदम’’ अशीच झालेली असते. रोक्‍सॉनच्या घरात नाटकाचा तिसरा अंक सुरू होतो. तेव्हा तिथे काही सरदार येतात/जातात. सिरॅनोही येऊन तिच्याशी बोलतो. नंतर ख्रिश्‍चियान येतो आणि रोक्‍सॉनचं प्रेम जिंकायला आपल्याला आता सिरॅनोची गरज नाही असं त्याला ठणकावून सांगतो. तोपर्यंत काळोख दाटतो.

रात्रीच्या अंधारात रोक्‍सॉन तिच्या बाल्कनीत उभी असते. खाली ख्रिश्‍चियान उभा असतो. मागे झाडांच्या गर्दीत सिरॅनो जरा लपलेला असतो. आपल्या सौंदर्याचं वर्णन ख्रिश्‍चियाननं करावं अशी अपेक्षा रोक्‍सॉन व्यक्त करते. ख्रिश्‍चियानला ते जमणं अशक्‍य असतं. त्यामुळे सिरॅनोच मागून त्याला एक एक वाक्‍य सांगतो आणि ख्रिश्‍चियान ते रोक्‍सॉनला ऐकवतो. पण सिरॅनोचा बोलण्याचा वेग जास्त असल्यानं नंतर सिरॅनोच अंधाराचा फायदा घेऊन रोक्‍सॉनच्या सौंदर्याची सुरेख वर्णनं करायला लागतो. त्यावर रोक्‍सॉन विलक्षण खूष होते.

चौथ्या अंकात सुरवातीला जरा गुंतागुंतीचे प्रसंग घडतात. पण ख्रिश्‍चियान आणि रोक्‍सॉनचं लग्न होतं. रोक्‍सॉनच्या सौंदर्यानं पागल झालेल्या आणि लग्नात बाधा आणायला इच्छुक असणाऱ्या एका दुसऱ्या सरदाराला लग्नाच्यावेळी अडवून ठेवायचं काम सिरॅनो करतो. तेव्हा तो चंद्रावर स्वारी करण्याचे सात मार्ग अशी एक धमाल कथा त्या सरदाराला सांगतो. अंतराळप्रवासाबद्दल शोध लागलेले नसताना नाटककारानं यात चंद्रावरच्या प्रवासाबद्दल जे लिहिलं आहे ते विज्ञानविषयक दृष्टिकोनातूनही थक्क करणारं आहे. लग्नानंतर लगेचच ख्रिश्‍चियानला स्पेनबरोबरच्या लढाईवर जावं लागतं. आपल्याला त्यानं रोज एक पत्र लिहावं असं रोक्‍सॉन त्याला बजावते.  ख्रिश्‍चियाननं पत्र लिहिलंय याची खातरजमा करण्याचं काम ती सिरॅनोवर सोपवते.

ख्रिश्‍चियानची तुकडी लढाईत हरत जाते. सगळ्या सैनिकांची उपासमार सुरू होते. पण तरीही एकिकडे सिरॅनो  स्वत:च रोज दोन पत्रं लिहून ती ख्रिश्‍चियानच्या नावावर रोक्‍सॉनपर्यंत जोखीम पत्करुन पोचवत रहातो. एकदा रोक्‍सॉन युध्दभूमीवर घोडागाडीतून येते. सोबत आणलेले खाद्यपदार्थ ख्रिश्‍चियानला देऊन त्याच्या पत्रांमुळे तिचं प्रेम शतगुणित झालं आहे असं सांगते. महत्त्वाचं म्हणजे  ’’ख्रिश्‍चियान दिसायला कुरूप असता तरी त्याच्या प्रतिभेमुळे तिनं तितकंच प्रेम केलं असतं’’ असंही ती पुढे सांगते. नंतरच्या काळात लढाईच्या धुमश्‍चक्रीत ख्रिश्‍चियान मरतो. 

नाटकाच्या शेवटच्या पाचव्या अंकाआधी मध्ये १५ वर्षांचा काळ उलटून गेलेला असतो. रोक्‍सॉनला ख्रिश्‍चियानच्या मृत्यूचं दु:ख मात्र वाटतच राहतं. ती एका चर्चमध्ये रहात असते. तिथे तिचे नोकरचाकर आणि नातेवाईक अधूनमधून भेटायला जात असतात. हा अंक सुरू होतो तेव्हा ती सिरॅनोची वाट पहात असते. तो येतो आणि बाहेरच्या जगात काय काय चाललं आहे ते तिला सांगतो. पण तेव्हा सिरॅनो जखमांमुळे अत्यवस्थ अवस्थेत असतो. त्याला मृत्यू समोर दिसत असतो.  ख्रिश्‍चियाननं (म्हणजे त्यानंच) युध्दभूमीवरुन रोक्‍सॉनला लिहिलेलं शेवटचं पत्र तिनं आपल्याला मोठ्यानं वाचून दाखवावं अशी तो तिला विनंती करतो. ते जीर्ण झालेलं पत्र रोक्‍सॉन त्याच्यात हातात देते आणि त्याला वाचायला सांगते. अंधारात तो ते पूर्ण पत्र वाचतो. अंधारात इतक्‍या सफाईने त्याला पत्र वाचताना पाहून आणि त्याचा आवाज ऐकून रोक्‍सॉनला शंका येते. अखेरीस सगळ्या पत्रांचा, त्यातल्या उत्कट प्रेमाच्या वर्णनांचा मूळ लेखक सिरॅनो आहे हे लक्षात येतं. पूर्वी एका काळोख्या रात्री ख्रिश्‍चियानच्या आड आपल्या सौंदर्याचं वर्णन करणारा आवाजही सिरॅनोचाच होता हेही तिला जाणवतं. आयुष्यभर तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा सिरॅनो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत तिच्यासमोर ते मान्य करत नाही.

सिरॅनो मरणाच्या दारात असताना त्याचे मित्र रडत असतात. रोक्‍सॉन अखेरीस त्याच्यावर आपलं प्रेम असल्याचं त्याला सांगते. मृत्यूच्या दारात उभा असताना सिरॅनो काव्यात्म भाषेत म्हणतो, मी सगळ्या लढाया हरलो.. पण एक गोष्ट मात्र माझ्याकडे आहे.. ती म्हणजे PANACHE.  आज Panache हा शब्द आज प्रचंड आत्मविश्वास किंवा स्टाईल या अर्थाने वापरला जातो. हा शब्द इंग्रजी भाषेत रुढ करण्याचं श्रेय सिरॅनोच्या नाटककाराला जातं.

रोक्‍सॉनच्या प्रेमानं जीव कासावीस होत असतानाही यातला सिरॅनो तिच्या भावनांची सतत कदर करतो. तो आपलं प्रेम मनात दडवून आयुष्यातली सगळी कर्तव्यं सार्थपणे पार पाडतो.

’कॅसा ब्लांका’ या हंफ्री बोगार्ट आणि इनग्रिड बर्गमन यांच्या चित्रपटातला हंफ्रीनं रंगवलेला रिक स्वत:च्या प्रेमापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानतो. प्रेमत्रिकोण असलेल्या या चित्रपटात इनग्रिडनं जिची भूमिका निभावली आहे त्या इल्साला तिच्या नवऱ्याबरोबर रिक स्वेच्छेनं अमेरिकेला पाठवून देतो. त्या चित्रपटाची सिरॅनोवरुन वारंवार आठवण येत रहाते. 

सिरॅनो काय किंवा रिक काय.. दोघांवरून  
प्रेम
योगावर करावं,
भोगावर करावं
पण त्याहूनही अधिक
त्यागावर करावं ..
प्रेम
चारही पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या
जीवनाच्या द्रवावर करावं
आणि पारध्याच्या बाणानं घायाळ
होऊन अरण्यात एकाकी पडलेल्या
स्वत:च्या शवावरही करावं
या कुसुमाग्रजांच्या ओळी मनात येतातच..! 

संबंधित बातम्या