मानवाच्या भवितव्याचा वेध

नीलांबरी जोशी
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

बुकशेल्फ

‘‘मुलांना भौतिकशास्त्र आणि इतिहास शिकवणं एक वेळ सोपं आहे, पण इमोशनल इंटेलिजन्स आणि संवेदनशीलता या दोन गोष्टी शिकवणं खूप अवघड आहे. मुलांवर प्रचंड प्रमाणात माहिती येऊन कोसळत असल्यामुळे त्यांना तंत्रज्ञान आणि माहिती (नॉलेज) हा विषय सर्वात शेवटी शिकवायला हवा..! आज जगातल्या सर्वोच्च कंपन्या ॲपल, ॲमेझॉन, फेसबुक आणि गुगल केवळ तीस वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात नव्हत्या. मग २०५० कोणत्या कोणत्या कंपन्या कोणत्या प्रकारचं काम करत असतील आणि कोणत्या  नोकऱ्या असतील याबद्दल आज आपण काय बोलू शकतो?’’ बिल गेटसपासून बराक ओबामांपर्यंत ज्याचा फॅन क्‍लब आहे त्या युवाल नोहा हरारीनं ’लेसन्स फॉर  सेंच्युरी’ या त्याच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात असे युगप्रवर्तक विचार मांडले आहेत.

‘सेपियन्स’ या आपल्या पुस्तकात हरारीनं मानवजातीच्या इतिहासाचं अत्यंत मर्मभेदी विश्‍लेषण केलं होतं. आणि त्यानंतरच्या ‘होमो ड्युस’ या पुस्तकात हरारीनं मानवाच्या भवितव्याचा वेध घ्यायचा प्रयत्न केला होता. या दोन्ही पुस्तकांच्या ४५ भाषांमध्ये अनुवादित होऊन १.२ कोटी प्रती आजवर अनेक देशांमधल्या लोकांपर्यंत पोचल्या आहेत. विशेष म्हणजे आत्ताच्या वेगवान जगात स्मार्ट फोन न वापरणारा, दिवसातून दोन तास ध्यानधारणा करणारा हरारी हा अत्यंत विद्वान विचारवंत आहे. बर्ट्रांड रसेल, नॉम चॉम्स्की अशा विद्वानांच्या पंक्तीतल्या हरारीनं ऑक्‍सफर्ड विद्यापीठात इतिहासातली डॉक्‍टरेट मिळवली आहे. तो जेरुसलेममधल्या हिब्रू विद्यापीठात इतिहास याच विषयाचा प्राध्यापक आहे.  हे पुस्तक आपण का लिहिलं, यावर हरारीनं विचारांना चालना देणारं मनोगत लिहिलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार सध्याच्या जगात निश्‍चित अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे- अनिश्‍चितता. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यावर आधारित यंत्रमानव यामुळे वाढणारी बेरोजगारी, बदललेल्या कामांच्या स्वरूपाबाबत अनिश्‍चितता, दहशतवाद किंवा पर्यावरणातले बदल यामुळे सतत मृत्यूची टांगती तलवार, आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समजुतींना अकस्मात धक्के देणारे बदल हे सतत चालू आहे. पण मुळात या बदलांची सामान्य लोकांना अजिबात कल्पना नसते. त्या अज्ञानाची हरारी दोन कारणं देतो. पहिलं कारण म्हणजे अनेक जणांना हे ज्ञान मिळवणं अशक्‍यच आहे. ‘‘मुंबईच्या झोपडपट्टीत दोन मुलांच्या दोन वेळेच्या घासासाठी झगडणारी माऊली; मध्यसमुद्रात भरकटलेले आणि आपल्याला पडाव टाकायला हक्काचा जमिनीचा तुकडा कुठे दिसतो आहे का? हे शोधणारे निर्वासित; अपघातात जखमी होऊन इस्पितळात शेवटचा श्‍वास घेण्याची धडपड करणारा जीव यांना जागतिक तापमानवाढ किंवा लोकशाहीची मूलतत्त्व याचा विचार करण्यापेक्षा खूप गंभीर समस्या आहेत. अशा लोकांना शिकवण्यासाठी माझ्या पुस्तकात कोणतेच धडे नाहीत. उलट दुर्दम्य इच्छाशक्ती मीच त्यांच्याकडून शिकेन’’ असं हरारी म्हणतो. पण ज्यांना आपल्या भोवताली काय चाललं आहे त्याबद्दल माहिती करुन घेण्यासाठी वेळेची गुंतवणूक करण्याची इच्छा आणि सवय नाही त्यांच्याबद्दल मात्र हरारीनं ’’आपल्याला त्याहून खूप महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात. आपल्याला आपल्या कामावर जायचं असतं, मुलांना वाढवायचं असतं किंवा पालकांचा सांभाळ करायचा असतो. इतिहास मात्र आपल्याला सवलत देऊ शकत नाही. मानवतेचं भवितव्य तुम्ही गैरहजर असलात तरी ठरत जातंच. पण त्याचे परिणाम मात्र तुम्हाला सगळ्यांनाच भोगावे लागतात.’’ असं म्हणताना प्रत्येकानं दिवसातून थोडा वेळ तरी आजूबाजूच्या घटनांकडे सजगपणे पहावं, कृती करावी असं हरारीनं सुचवलं आहे. तुमची एक कृती काय घडवू शकते? उदाहरणार्थ, मी टू ही चळवळ. मिलानो या अमेरिकन महिलेलं १५ ऑक्‍टोबर २०१७  रोजी मी टू हा हॅशटॅग वापरून ट्विट केलं.  दिवसभरात २ लाख महिलांनी तो हॅशटॅग ट्विटवर वापरला. त्याच विषयावर फेसबुकवर २४ तासात ४.७ मिलियन लोकांनी १२ मिलियन पोस्टस केल्या होत्या. जगभरातल्या कोट्यावधी स्त्रियांनी यानंतर कामाच्या ठिकाणी आपल्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली. 

जगाबद्दलच्या अज्ञानाचं हरारीनं मांडलेलं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ‘नॉलेज इल्युजन’. एका प्रयोगात पेन कसं चालतं ते एका ग्रुपमध्ये विचारल्यावर जवळपास सगळ्यांना आपण ते सांगू शकू याबद्दल आत्मविश्वास होता. पण त्या प्रक्रियेबद्दल सविस्तर सांगा असं म्हटल्यावर अनेकजणांना ते माहिती नव्हतं असं लक्षात आलं. यावरून स्टीव्हन स्लोमन आणि फिलिप फर्नबाक या दोन कॉग्निटिव्ह संशोधकांनी या प्रकाराला ‘‘द नॉलेज इल्यूजन’’ असं नाव दिलं आहे.

हे कसं निर्माण होतं ? तर एखादी इमारत बांधणं, अणुबाँब बनवणं किंवा विमान बनवणं या गोष्टी एकाच माणसाला माहिती असू शकत नाहीत. थोडक्‍यात एकएकट्याचा विचार केला तर आपल्याला खूप कमी माहिती असते. मग असणाऱ्या माहितीचे तुकडे एकमेकांशी जोडायला गेलं तर त्यांची संगती लावणं अशक्‍य वाटतं. जगात सभोवताली काय चाललं आहे त्याबद्दलचं हे आपलं अपुरेपण किंवा अज्ञान कोणी मान्य करत नाही. इतर सर्वजणांकडचं ज्ञान आपलंच आहे असं आपण मानतो. त्यामुळे निर्माण होणारं ‘नॉलेज इल्यूजन’ खूप त्रासदायक ठरतं. हे ‘नॉलेज इल्युजन’ कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या विषयांची ओळख हरारीनं या पुस्तकात करुन दिली आहे.

पुस्तकाच्या पहिल्या ‘तंत्रज्ञानाबाबतची आव्हानं’ या भागात भ्रमनिरास, काम, स्वातंत्र्य, समानता; दुसऱ्या ‘राजकारणविषयक’ भागात समूह, सिव्हिलायझेशन, राष्ट्रवाद, धर्म, स्थलांतरित; तिसऱ्या ‘नाऊमेदी आणि आशा’ या भागात दहशतवाद, युद्ध, विनम्रता, देव, सहिष्णुता; चौथ्या ‘सत्य’ या भागात अज्ञान, न्याय, पोस्ट ट्रथ, सायन्स फिक्‍शन आणि पाचव्या ‘लवचिकता’ या भागात शिक्षण, अस्तित्वाचा अर्थ आणि ध्यानधारणा अशी एकूण २१ प्रकरणं आहेत. या प्रकरणांच्या अनुषंगानं डोनाल्ड ट्रंपचा उदय काय सांगतो? फेक न्यूजचं फुटलेलं पेव काय प्रतीत करतंय, लिबरल डेमॉक्रसीचं अस्तित्व संपत चाललं आहे का? परत एक महायुद्ध येऊ घातलं आहे का? युरोपनं निर्वासितांना आश्रय द्यावा का? पर्यावरण आणि असमानतेच्या समस्या राष्ट्रवाद सोडवू शकतो का? दहशतवादाचं काय करायला हवं? अणुयुद्ध, आर्थिक भूकंप आणि तंत्रज्ञानाच्या महास्फोटापासून स्वत:ला कसं वाचवता येईल? आपल्या मुलांना नक्की काय शिकवायचं? असे अनेक प्रश्न  या प्रकरणांमध्ये हाताळले आहेत. यावर शक्‍य तितके उपाय मांडण्याचाही प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, ‘‘दहशतवादावर माध्यमांनी दहशतवादाची सतत आणि भयंकर प्रदर्शनं करू नयेत; नागरिकांनी प्रत्येक झाडामागे एक दहशतवादी लपला आहे असं अवडंबर माजवू नये’’ असे उपाय मांडले आहेत.

या पुस्तकातले सगळेच विषय महत्त्वाचे आहेत. पण कृत्रिम बुद्धिमत्ता- आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणारी बेरोजगारी हा विषय अनेकांच्या जिव्हाळ्याचा आहे. यंत्रांना कृत्रिमपणे हुशार बनवायच्या प्रयत्नांना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)’ असं म्हणलं जातं. माणूस ज्याप्रकारे शिकतो, जसा विचार करतो आणि जशी आपली बुद्धिमत्ता वापरतो तसंच कॉम्प्युटरचा वापर करून त्याला माणसासारखा विचार करायला लावणं हे एआयचं तत्त्व आहे. यंत्रमानवाची (रोबोट) संकल्पना एआयवर आधारलेली आहे. यंत्रमानवाला संगणकीय भाषेत सूचना दिल्यानंतर तो त्या सूचना पार पाळतो.

आयबीएमच्या ‘डीप ब्लू कम्प्युटर’नं १९९७ मध्ये गॅरी कास्पारोव्ह या जगज्जेत्या बुद्धिबळपटूचा पराभव केला. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाण्याचं ते उत्कृष्ट उदाहरण होतं. ‘वॉटसन’या डीप ब्लूच्या वारसदार कम्प्युटरनं ‘जिओपार्डी’ हा टीव्ही शो जिंकून २०१० मध्ये १० लाख डॉलर्स मिळवले. ‘डीप ब्लू’चं काम बुद्धिबळासारख्या शिस्तबद्ध खेळापुरतं मर्यादित होतं. पण ‘जिओपार्डी’ मध्ये विनोद आणि उपरोधिक वाक्‍यं कळण्याचीही गरज होती आणि ती कृत्रिम बुद्धिमत्तेनं पार पाडली हे लक्षात घ्यायला हवं. एकूणच एआय आता वैद्यक, पत्रकारिता, वैज्ञानिक संशोधन, वकीली अशा सर्व क्षेत्रात पोचलं आहे. त्यामुळे वैमानिक असो, विक्रेता असो, वकील असो वा आर्थिक सल्लागार असो बेरोजगारीची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्‍यावर आहे. सिटी बॅंकेनं ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या मदतीनं यंत्रमानवांमुळे कोणाकोणाचे रोजगार जाऊ शकतील यावर तयार केलेल्या अहवालानुसार, इंग्लंडमधले ३५ टक्के रोजगार मानवाकडून यंत्रमानव हिसकावून घेतील. अमेरिकेमध्ये हे प्रमाण ४७ टक्के असू शकतं. दक्षिण आफ्रिकेतले ६६ टक्के रोजगार यंत्रमानवाच्या हाती जातील. थायलंड या देशात ७२ टक्के नोकऱ्या या पुढच्या काळात यंत्रमानव करू शकतील. तसंच भारतातल्या ६९ टक्के इतक्‍या नोकऱ्यांवर यंत्रमानवांमुळे गदा येईल.

हरारीनं कोणत्या स्वरूपाच्या नोकऱ्या वाढतील त्याचाही उहापोह केला आहे. उदाहरणार्थ, डॉक्‍टर्सच्या नोकऱ्या किंवा व्यवसाय संपेल हे खरं असलं तरी नवीन औषधं शोधणं आणि शस्त्रक्रियेच्या पद्धती शोधणं ही संशोधनाची कामं खूप वाढतील. पण या नवीन नोकऱ्यांमध्ये विशिष्ट कौशल्यं आणि नैपुण्याची गरज असेल. स्वयंचलिततेच्या आधीच्या लाटेत आहे त्या कामापेक्षा नवीन काम शिकणं खूप अवघड नव्हतं. १९२० मध्ये शेतीत यंत्रयुग आल्यावर शेतकरी ट्रॅक्‍टर बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये जाऊन कामं करायला लागले. १९८० मध्ये कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळल्यावर त्यांना सुपरमार्केटमध्ये कॅशियरचं काम शिकणं खूप त्रासदायक गेलं नाही. पण २०५० असा कॅशिअर किंवा एखादा गिरणी कामगार अचानक कॅन्सरवर संशोधन सुरु करू शकणार नाही किंवा बॅंकेत एआय बरोबर काम करू शकणार नाही. यातून कौशल्यं हवी असलेल्या ठिकाणी कामगार नाहीत आणि असलेल्या कामगारांना नोकऱ्या नाहीत अशी परिस्थिती उद्‌भवू  शकेल. तसंच  एखाद्यानं कॅन्सरवरचं संशोधन शिकून घेतलंच  तरी दहा वर्षात तेही काम एआय करायला लागेल. यामुळे तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या वाढत रहातील.

२०५० मध्ये आयुष्यभर एकच नोकरी किंवा एकच व्यवसाय हा प्रकार आदिमानवासारखा पुरातन वाटेल.  कामाच्या बाबतीतल्या अशा बदलांना प्रत्येक माणसाला भावनिक / मानसिक पातळीवर तोंड देणं त्रासदायक ठरेल. एकविसाव्या शतकात कामाचा ताण ही समस्या भयावह ठरेल. यावर उपाय म्हणून माणूस-एआय यांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं ठरेल. औषधांपासून ते ध्यानध्यारणेपर्यंत अनेक तंत्र तो ताण कमी करण्यासाठी वापरावी लागतील.

मानवाचं भवितव्य काय असेल यावर वाद घालणं सोपं असलं तरी त्याबाबत स्पष्टपणा असणं ही खरी गरज आहे. त्यासाठी हरारीच्या पुस्तकातही झटपट तयार उत्तरं नाहीत. पण आजच्या समस्यांवर पुरेसा डेटा आणि विश्‍लेषण मांडून ते पुढच्या विचारांसाठी वाचकाला प्रवृत्त करतं. चांगल्या पुस्तकानं हेच करायला हवं. नाही का?    

  •  पुस्तक ः 21 लेसन्स फॉर  21st सेंच्युरी
  •  लेखक ः युवाल नोहा हरारी

संबंधित बातम्या