आनंदी दिसणं महत्त्वाचं?

नीलांबरी जोशी
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

बुक-क्लब
नीलांबरी जोशी

 

  •  पुस्तक ः द हॅपिनेस इफेक्‍ट
  •  लेखक ः डोना फ्रेईटास

‘‘प्रवास करायला, नवनवीन ठिकाणं पहायला खूप आवडतं. पण मी झोपताना, उठताक्षणी, जेवताना, बाथरुममध्ये सतत सोशल मिडियावर असायचो. कोणत्याही गोष्टीनं किंवा माणसानं तुमचा असा ताबा घेणं बरोबर नाही. हे लक्षात आल्यावर काही काळ मी फेसबुक वापरणं बंद करायचो. त्याचा एक दोन दिवस ताण जाणवायचा. दिवसातून अनेकदा लॉग इन करावंसं वाटायचं. पण फेसबुकपासून जितका जास्त वेळ दूर राहू तितकं लॉग इन न करणं सोपं जातं. खरं सांगायचं तर फेसबुक वापरणं बंद करतो तेव्हा मी जास्त आनंदात असतो. त्यामुळे ते कायमस्वरुपीच बंद करावं असं आता मला वाटायला लागलं आहे.’’ हे उद्गार अमेरिकेतल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्याचे आहेत. इंटरनेट ॲडिक्‍शन डिसऑर्डरनंतर आता फेसबुक ॲडिक्‍शन डिसऑर्डर, सेल्फी अति काढण्यामुळे सेल्फायटिस, मोबाईलशिवाय चैन न पडणं नोमोफोबिया- नो मोबाईल फोबिया असे मनोविकार तयार झाले आहेत. याचं कारण म्हणजे फेसबुकवर मिळणारे लाईकस आणि शेअर्स यातून मेंदूतली रिवॉर्ड सेंटर्स जागृत होतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. फेसबुकच्या लाईक्‍समुळे प्रत्येकच माणसाच्या मेंदूला छान वाटतं. हे छान वाटण्याचं रिवॉर्ड मिळाल्यानंतर मेंदूला ती गोष्ट परत परत घडावीशी वाटते. मेंदूतली ही रिवॉर्डची यंत्रणा किशोरवयीन मुलांमध्ये जास्त संवेदनाशील असते. सोशल मिडियाचं व्यसन जास्त प्रमाणात किशोरवयीन मुलांनाच का असतं त्यामागे हे कारण आहे. अशा अनेक गोष्टींचा तंत्रशुद्धपणे विचार करुन लिहिलेलं पुस्तक म्हणजे डोना फ्रेईटास हिचं ‘द हॅपिनेस  इफेक्‍ट : हाऊ सोशल मिडिया इज ड्रायव्हिंग अ जनरेशन टू ॲपिअर परफेक्‍ट ॲट एनी कॉस्ट..!’ डोना अमेरिकेतल्या कॉलेजेसमध्ये धर्म, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयांवर व्याख्यानं देते. ‘न्यूयॉर्क टाईम्स’आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ सारख्या वृत्तपत्रांमध्ये लिखाण करणाऱ्या डोनाची अनेक बेस्टसेलर पुस्तकं आहेत. ‘द हॅपिनेस इफेक्‍ट’ हे पुस्तक तिनं अमेरिकेतल्या १३ कॉलेजेसमधल्या १८४ विद्यार्थ्यांशी संवाद साधून आणि ८८४ प्रश्नावल्यांचा उत्तरांचं विश्‍लेषण करुन लिहिलं आहे. हे सगळे विद्यार्थी सोशल मिडिया चिक्कार वापरतात. पण फक्त १९ टक्के मुलांनीच आपण आपल्या खऱ्या भावना आपण सोशल मिडियावर व्यक्त करतो हे मान्य केलं होतं. उरलेले ८३ टक्के विद्यार्थी कितीही त्रासलेले, वैतागलेले, अस्वस्थ, निराश, दु:खी असले तरी सोशल मिडियावर आपण आनंदात असल्याचं भासवत होते. यावरुन या पुस्तकाला ‘द हॅपिनेस इफेक्‍ट’ हे नाव दिलेलं आहे. 

   सोशल मिडियाचे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतात. त्यापैकी सकारात्मक परिणाम म्हणजे डिजिटल युगात टिकून रहाण्यासाठी आवश्‍यक असलेली सामाजिक कौशल्यं मुलं पटापट शिकतात. त्यांना आपल्या आवडत्या विषयात रस असलेले वेगवेगळ्या प्रकारचे जगभरातले मित्रमैत्रिणी भेटतात. सोशल मिडियावरच्या अभ्यासगटातून अनेक गोष्टी झटपट  शेअर करता येतात. तसंच जगातले ताणतणाव, दु:खं आणि नैसर्गिक आपत्ती त्यांना सोशल मिडियामुळे माहिती होतात. त्यातून ते जास्त समजूतदार होऊ शकतात. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी निधी गोळा करण्यासारख्या गोष्टी या सोशल मिडियामधूनच घडतात; पण सोशल मिडियाचे नकारात्मक परिणामही अर्थातच कमी नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मिडियाचं व्यसन लागतं. त्यातून अभ्यास, खेळ इतर छंद सगळं मागे पडायला लागतं. सोशल मिडियावर नवीन काय आहे ते पहायला शाळेतली मुलं दिवसातून १०० वेळा  तरी लॉग इन करतात असं सर्वेक्षण सांगतं. याचा परिणाम म्हणजे माणसांशी प्रत्यक्षात भेटणं/बोलणं होत नाही. मग देहबोलीचा अभ्यास, समोरच्या व्यक्तीच्या उत्तरांच्या स्वरावरुन त्याला जाणणं ही कौशल्यं विकसित होऊच शकत नाहीत. मुलं सहवेदना अनुभवायला कमी पडत जातात. त्यांचं संवादकौशल्यं खुंटतं. लहान मुलं जसं गडद रंगांकडे किंवा चमकदार वस्तूंकडे आकर्षित होतात तसं किशोरवयीन  मुलांचं फेसबुकबाबत होतं. विचारक्षमता कमी होते. कोणत्याच गोष्टीचा सखोल विचार करण्याची क्षमताच ते गमावून बसतात. 

दिवसातून ३ तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मिडियावर काढणाऱ्या मुलांचं मानसिक आरोग्य बिघडलेलं असतं. फेसबुकवर जितका जास्त वेळ घालवू तितकं आयुष्यात असमाधान वाढतं. नैराश्‍य, अस्वस्थता, मूडमधले तीव्र चढउतार हे प्रकार सुरु होतात. सेल्फीमुळे नार्सिसिझम तर वाढतोच. पण उंच इमारती, धबधबे, मागे पळणारी रेल्वे अशा गोष्टींबरोबर फोटो काढण्याच्या हव्यासामुळे मृत्यूचा धोका संभवतो. 

  या सगळ्या गोष्टी डोनानं पुस्तकातून १२ प्रकरणांमधून मांडल्या आहेतच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे यावर मात करण्यासाठी कोणत्या गुणांची जोपासना करायला हवी हेही शेवटच्या एका प्रकरणात लिहिलं आहे. ते पालक आणि शिक्षक यांच्यासाठी  खूप उपयोगाचं आहे. ‘स्टर्स ऑफ हॅपिनेस’ या प्रकरणात ‘आपण आनंदात असणं महत्त्वाचं का तसं दिसणं महत्वाचं’ या मूलभूत प्रश्नाचा वेध घेतला आहे. सर्वात जास्त कोण आनंदी आहे हे दाखवण्याची स्पर्धा असल्यासारखं लोक फेसबुक स्टेटस टाकत असतात. खरं तर तुम्ही खरोखर आनंदात असाल तर दाखवायची गरज नसते. ‘इज एव्हरीबडी हॅंगिंग आऊट विदाऊट मी?’ या प्रकरणात सोशल मिडियावर इतरजण माझ्यापेक्षा वरचढ ठरतील या भीतीनं सतत समाधानी असल्याची प्रतिमा निर्माण करण्याबद्दल उहापोह केलेला आहे. उदाहरणार्थ, फेसबुकवर मी चांगल्या विचारांचा, चांगल्या नोकरीत,  चांगली अभ्यासू मुलं असलेला, सुंदर जोडीदार असलेला, उत्तमोत्तम कपडे घालणारा, उत्तमोत्तम हॉटेल्समध्ये जाणारा, सतत विमानानं प्रवास करणारा, उत्तमोत्तम ठिकाणी बायकोमुलांना ट्रीपला घेऊन जाणारा, ब्रॅंडेड आणि महागडे कपडे/घड्याळं/ पादत्राणं/ मोबाईल/ गाडी/ लॅपटॉप बाळगणारा, अलिशान घरात दर्जेदार फर्निचर घेऊन रहाणारा, कलासक्त मन असलेला आहे, असं दाखवण्याची सगळ्यांची अहमहमिका लागलेली असते. त्यामागे आपण लोकांच्या नजरेतून मागे पडू नये अशीच इच्छा असते. ‘द प्रोफेशनलायझेशन ऑफ फेसबुक’ या प्रकरणात अनेक कंपन्या आपल्याकडे नोकरभरती करताना सोशल नेटवर्किंग साईटसचा वापर करतात. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांनी फेसबुकवर आपले कोणते फोटो टाकावेत, पोस्ट टाकाव्यात याबद्दल जागरुक रहायला हवं हा अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘परफॉर्मिंग फॉर गॉड- रिलिजन ऑन अँड ऑफ सोशल मिडिया’आणि ‘व्हर्च्युअल प्लेग्राऊंडस’ या दोन प्रकरणात अनुक्रमे धर्म, पुरोगामी विचारसरणी आणि वंश किंवा वर्णभेद सोशल मिडियावर कसा एकांगी आणि घातक ठरू शकतो त्याबद्दल माहिती आहे. काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांचे फोटो किंवा पोस्टस यावरुन त्यांना दहशत दाखवणं किवा ग्रुपमध्ये नाचक्की करणं यातून मानसिक समस्या किती प्रमाणात वाढतात त्याबद्दल उदाहरणांसकट लिहिलं आहे. तसंच सेक्‍सविषयक मेसेजेस, नग्न फोटो एकमेकांना पाठवणं (सेक्‍स्टिंग) या महत्त्वाच्या विषयालाही लेखिकेनं तोंड फोडलं आहे.

‘स्मार्ट फोन अँड मी’ या प्रकरणात 

‘‘माझा फोन घरी विसरलो आणि मला अंगावर कपडेच नसल्यासारखं वाटतंय’’ इतक्‍या टोकाच्या भावना असलेल्या व्यक्तींबद्दल वाचायला मिळतं. 

   या सगळ्यावर मात कशी करावी हे मांडताना डोनानं ‘निकोमॅचिअन एथिक्‍स’ या ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्यानं लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेतला आहे. आपल्या पुस्तकात ॲरिस्टॉटलनं माणसानं उत्तमरीत्या जगण्यासाठी कोणत्या गुणांची जोपासना करावी त्याबद्दल लिहिलं आहे. या पुस्तकात त्यातले आठ गुण डोनानं निवडले आहेत. त्यापैकी पहिला गुण आहे तो म्हणजे ‘व्हल्नरेबिलिटी-असुरक्षितता.’ आपले विचार आणि मानसिकता असं सगळं सोशल मिडियावर उघडं पडेल, अशी असुरक्षितता वाटते. त्यापेक्षा तो आनंदाचा बुरखा पांघरणं पत्करतो. ही असुरक्षितता काढून टाकावी. दुसरा गुण आहे ‘ऑथेंटिसिटी-अस्सलपणा.’ आपलं हृदगत काय सांगतं आहे याचा विचार न करता प्रसिद्धीच्या मोहात केवळ खूप लाईक्‍स मिळावेत यासाठी सोशल मिडियावर व्यक्त होणं थांबवा असा यात डोनानं सल्ला दिला आहे. तिसरा गुण आहे ‘टॉलरन्स-सहनशक्ती.’ आपलं म्हणणं दुसऱ्याला पटलं नाही तरी त्याच्या मतांचा आदर करणं फेसबुकसारख्या माध्यमांमध्ये अजिबात घडत नाही. सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा सर्व पातळ्यांवर दुसऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची सहनशक्ती जोपासायलाच हवी. चौथा गुण आहे ‘विसरणं’ आपण सतत जुने फोटो, व्हिडिओज पाहून जुन्या आठवणी काढतो. भूतकाळातल्या सुखाला कुरवाळतो. त्याच्याशी वर्तमानकाळाची तुलना करतो. तसंच  त्यावेळी जर कोणी आपल्याशी चुकीचं वागलं असेल तर ते आठवत रहातो. पण हे सगळं विसरुन वर्तमानकाळात जगणं हे महत्त्वाचं आहे.  पाचवा गुण आहे ‘नाऊ-आत्ता.’ आपण कोणत्याही ठिकाणी गेल्यावर तिथले फोटो काढतो. आपण जे काही करतो त्याचा आस्वाद हा प्राधान्यक्रम न रहाता किती फोटो काढले याचं मोजमाप (क्वांटिटी) महत्त्वाचं ठरायला लागतं. ते टाळावं. सहावा गुण आहे तो म्हणजे ‘प्ले-खेळ.’ समुद्रकिनारी वाळूचे किल्ले बांधण्यापासून अनेक खेळ आपल्यापैकी अनेकजण लहानपणी खेळत होतो. पण आजच्या मुलांनी कधी, कोणता

खेळ खेळावा हे पालक ठरवतात. जास्त वेळ मुलं इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांना देतात. हे थांबवायला हवं.

सातवा गुण आहे ‘अनप्लगिंग- बाह्य जगाशी नातं काही क्षणांपुरतं तोडून आपल्या मनाचा आवाज ऐकता येणं.’ धावपळीच्या आयुष्यात आपण शांत, स्थिर बसणं आणि काहीच न करणं हेच हरवून बसलो आहोत. आनंद, शांतता, समाधान, रिलॅक्‍स होणं हे शब्दही दूरस्थ भासतात. ते जमवता यायला हवं. शेवटचा आठवा गुण आहे ‘क्विटिंग-सोडून देणं.’ खरं तर एखादी गोष्ट जमेपर्यंत आपण सतत प्रयत्न करत रहायला हवं, असा संदेश दिला जातो. पण सोशल मिडिया आणि स्मार्टफोन वापरताना मात्र हा संदेश चुकीचा ठरतो. काही काळासाठी तरी त्यातून बाहेर पडावं हे या दोन गोष्टींबाबतीत जमायलाच हवं. आपण असतो कसे त्यापेक्षा आपण दिसतो कसे याला गेल्या पन्नास वर्षांच्या काळात खूप महत्त्व आलं. गेल्या दहा वर्षांमध्ये मात्र आपण कसेही दिसत असलो तरी प्रोफाईलवर दाखवतो कसे याला महत्त्व आलंय. त्यामुळे आपण आनंदी आहोत हे दाखवण्यापेक्षा आनंदी असणं गरजेचं आहे, हे जाणावायला हवं हा महत्त्वाचा संदेश हे पुस्तक देतं.

संबंधित बातम्या