मर्मबंधातली ठेव

नीलांबरी जोशी
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

बुक-क्लब
पुस्तक ः ‘बॉलिवूड साऊंडस’
लेखक ः जेसन जोन्स

भारतातल्या लोकप्रिय संगीतापैकी ८० टक्के संगीत हे सिनेसंगीत असते. सिनेसंगीताची वाटचाल हा विषय अनेकांच्या ‘मर्मबंधातली ठेव’असते. एकूण सिनेसंगीतातल्या गाण्यांचा दर्जा काय याबद्दल वाद असले, तरी ती लोकप्रिय आहेत, यावर वाद असूच शकत नाही. उत्कृष्ट छायाचित्रण, विहंगम दृश्‍यं किंवा भव्य सेट्‌स, रंगीबेरंगी पोशाख आणि नृत्यं/कोरिओग्राफी असलेली गाणी हे चित्रपट यशस्वी होण्याचं अनेकदा कारण असतं. 

या दृष्टिकोनातून पाहाता भारतीय चित्रपटांचे निर्माते/दिग्दर्शक संगीताचं जनमानसातलं स्थान चांगलंच ओळखून होते आणि आहेत. हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर त्यामुळे अनेक पुस्तकं प्रकाशित होत असतात. पण गेल्या ७० वर्षात भारतात घडलेले सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक बदल हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांवर कसा परिणाम घडवत गेले याचा ऊहापोह असणारं ‘बॉलिवूड साऊंडस’ हे एक आगळं पुस्तक आहे. हे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला आवडेल अशा सोप्या भाषेतलं असलं तरीही जेसन जोन्स या लेखकाचा विद्वत्तापूर्ण दृष्टिकोन कुठेच लपत नाही. कॅलिफोर्निया विद्यापीठात संगीताचा प्राध्यापक असणाऱ्या जेसनचा मानववंशशास्त्र हादेखील अभ्यासाचा विषय आहे. 

पुस्तकात एकूण आठ प्रकरणं आहेत. त्यापैकी पहिल्या प्रकरणात पुस्तकाची ओळख आहे. त्यापुढच्या सहा प्रकरणांमध्ये विशिष्ट काळाचं प्रतिनिधित्व करणारं एक गाणं आणि त्या गाण्याचं सांगीतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विश्‍लेषण आहे.  त्या काळाच्या अनुषंगानं येणारे इतर संगीतकार, त्यांचं चरित्र, त्यांच्या संगीतरचना आणि त्यांच्या संगीताचं वैशिष्ट्य प्रत्येक प्रकरणात आवर्जून मांडलं आहे. तसंच गाण्याचं वितरण करणाऱ्या समकालीन तंत्रज्ञानाचाही यात विचार केलेला दिसतो. शेवटच्या प्रकरणात भविष्यातली हिंदी गाणी कशी असतील ते थोडक्‍यात वाचायला मिळतं.

पहिलं प्रकरणात लेखक ‘बंटी और बबली’ हा चित्रपट पाहायला दिल्लीतल्या एका थिएटरमध्ये गेल्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या या वर्णनानं सुरू होतं. या चित्रपटातलं ‘कजरा रे’ हे गाणं अलिशा चिनॉय हिनं गायलं होतं. त्या काळात उदयाला आलेल्या शंकर एहसान लॉय या त्रिकूटानं या गाण्यात अनेकविध वाद्यांनी आणि वैविध्यानं बहार आणली होती. या गाण्याबाबत दोन वैशिष्ट्यं महत्त्वाची आहेत. एक म्हणजे रूढार्थानं आयटम नंबर करणाऱ्या अभिनेत्रीऐवजी चक्क ऐश्वर्या रॉय या मुख्य अभिनेत्रीनं हे गाणं सादर केलं होतं. दुसरं म्हणजे उत्तरप्रदेशातल्या ‘कजरी’ या लोकसंगीतातल्या प्रकाराशी हे गाणं साधर्म्य सांगत. या गाण्यात सुरवातीला ऐकू येणारा हार्मोनिअम, संतूर, तबला, तबल्यावरचे पुरुषाच्या आवाजात ऐकू येणारे बोल, नंतरचा  इलेक्‍ट्रिक बास आणि घुंगरांचा आवाज तसंच गर्दीच्या ऐकू येणाऱ्या शिट्ट्या या सगळ्याचा गाण्यावर मस्त परिणाम होतो. 

दुसऱ्या प्रकरणात वसाहतवादाच्या अखेरच्या म्हणजे १९३१-१९४७ या काळातल्या प्रचंड गाजलेल्या ‘किस्मत’चित्रपटातल्या बुलबुल सो रहा है..या गाण्याची पार्श्वभूमी सुरवातीला मांडली आहे. या चित्रपटानं जितके पैसे कमावले त्याची किंमत २०१६च्या मोजमापानं  ३०९ कोटी रुपये होते. ‘किस्मत’ हा १९४३ मधील ‘बाँबे टॉकीज’चा चित्रपट  होता. अनिल बिश्वास या महान संगीतदिग्दर्शकानं या चित्रपटाला संगीत दिलं होतं. याच प्रकरणात पुढे नौशाद अली या संगीतकाराच्या ‘आवाज दे कहां है’ आणि ‘जब दिल ही टूट गया’ या दोन गाण्यांचं महत्त्व मांडलं आहे. संगीतकार या प्रकाराला घरच्यांचा विरोध असताना घरातून पळून आलेला नौशाद स्वत: सतार आणि हार्मोनिअम वाजवायचा. ‘आवाज दे कहां है’ हे नूरजहाननं गायलेलं गाणं ‘अनमोल घडी’ या चित्रपटात होतं. अनमोल घडी हा नूरजहानचा पाकिस्तानात जाण्याअगोदरचा शेवटचा चित्रपट होता. त्या काळात अभिनेत्याची निवड तो किती चांगला गातो यावरुन व्हायची. या सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ होता कुंदनलाल सैगल. शाळेतला ड्रॉपआऊट, नंतर रेल्वेतला टाईमकीपर असलेल्या सैगलला बी एन सरकार यांनी ‘न्यू थिएटर्स’ मध्ये आणलं होतं. १९४३ च्या ‘चंडिदास’ चित्रपटानं त्याला स्टार बनवलं. ‘शहाजहान’ चित्रपटातलं ‘जब दिल ही टूट गया..’ हे सैगलचं गाणं आजही असंख्य सिनेरसिकांचं लाडकं गाणं आहे. 

आर सी बोराल या दिग्दर्शकानं १९३५ मध्ये गाणं आधी ध्वनिमुद्रित करून नंतर त्यावर दृश्‍य चित्रित केलं. मग पार्श्वगायनाची परंपरा सुरू झाली. तलत मेहमूद, हेमंत कुमार, गीता दत्त, आशा भोसले असे गायक/गायिका उदयाला आले. या गायकांच्या आवाजाला न्याय देणारे सज्जाद हुसेन, हुस्नलाल भगतराम, खेमचंद प्रकाश, गुलाम हैदर, सी रामचंद्र, एस डी बर्मन, मदन मोहन, सचिनदेव बर्मन, सलिल चौधरी, जयदेव, रोशन, बसंत देसाई असे काळजाला हात घालणारं संगीत देणारे अनेक संगीतकार उदयाला आले. 

पुस्तकाचं तिसरं प्रकरण सी रामचंद्र यांच्या ‘आना मेरी जान संडे के संडे’ या १९४७ मधील ‘शहनाई’ चित्रपटातल्या गाण्यावरुन सुरू होतं. सी रामचंद्र ऊर्फ चितळकर, मीना कपूर आणि शमशाद बेगम या तिघांनी हे गाणं गायलं होतं. नर्सरी ऱ्हाईमसारखं भासणारं हे गाणं तुफान गाजलं. ड्रम, बॅंजो, सॅक्‍सोफोन, गिटार, क्‍लॅरिनेट आणि हार्मोनिका अशी पाश्‍चात्त्य वाद्यं या गाण्यात वापरली होती. सी रामचंद्र यांचे सहाय्यक जॉन गोम्स यांनी जॅझ प्रकारातलं या गाण्याचं संगीत ॲरेंज केलं होतं. याच प्रकरणात ‘दुनिया में हम आये है तो जीनाही पडेगा’ या मदर इंडियामधल्या गाण्याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पुढची ४० वर्षं ज्या दोघांनी अधिराज्य गाजवलं ते दोघं म्हणजे मोहम्मद रफी आणि हे गाणं जिनं गायलं होतं ती लता मंगेशकर..! या सुमारास चित्रपटसंगीताच्या प्रक्षेपणावर १९५० मध्ये बंदी असल्यानं रेडिओ सिलोनवरची ‘बिनाका’ खूप लोकप्रिय झाली. 

शंकर जयकिशन यांच्या ‘आवारा हूँ’ आणि ‘जूता हे जपानी’ या दोन गाण्यांचा देशाच्या उभारणीत किती महत्त्वाचा वाटा होता तेही याच प्रकरणात लिहिलं आहे. शंकर-जयकिशनचं ऑर्केस्ट्रेशन हा भन्नाट प्रकार होता. या जोडीनं सुमारे १२० चित्रपटांना संगीत दिलं. पंजाबी कुटुंबात जन्माला आलेला शंकर स्वत: पियानो, ॲकॉर्डियन, सतार, हार्मोनिअम आणि अनेक तालवाद्यं वाजवायचा. त्याला कथ्थक प्रकारातलं नृत्यही येत होतं. जयकिशन गुजराती होता. तो हार्मोनिअम आणि तबला वाजवायचा. चौथ्या प्रकरणात ‘हम आपकी आंखो में’ या सचिनदेव बर्मन यांनी ‘प्यासा’ चित्रपटासाठी संगीत दिलेल्या गाण्याचा परामर्श आहे. या काळात गोवा मुक्तिसंग्राम होऊन तो पोर्तुगीजांपासून मुक्त झाला. गोव्यातले अनेक संयोजक हिंदी चित्रपटसृष्टीला लाभले. त्या सगळ्यांना पाश्‍चात्त्य वाद्यं आणि हार्मनी माहिती होती. जॅझ आणि रॉक प्रकारातलं संगीत ठाऊक होतं. त्यांच्यापैकी ए बी अल्बुकर्की आणि पीटर डोराडो हे दोघं सी रामचंद्र यांचे सहाय्यक होते. अँथनी गोनसाल्व्हिस यांनी अनेक गाण्यांचं संगीत संयोजन केलं. ते बराच काळ लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे होते. तसंच सेबॅस्टियन डिसूझा शंकर जयकिशन यांच्याकडे होते. या प्रकरणाच्या शेवटी ‘रुप तेरा मस्ताना’ या गाण्यावरुन किशोरकुमार या लाटेचा कसा उदय झाला त्याबद्दल लिहिलं आहे. पाचवं प्रकरण सुरू होतं ते आशा भोसलेनं गाजवलेल्या ‘पिया तू अब तो आजा’ या कॅबेरे प्रकारातल्या गाण्यानं. या काळातला तंत्रज्ञानातला महत्त्वाचा बदल म्हणजे रेकॉर्डिंगची गुणवत्ता..! याचा सर्वात प्रभावी वापर राहुलदेव बर्मन यानं केला. ब्लूज, जॅझपासून अनेक प्रकार त्यानं संगीतात वापरले. पाश्‍चात्त्य वाद्यांचा वापर राहुलदेव बर्मननं प्रचलित केला. त्याचवेळी ‘परदा है परदा’ हा लोकसंगीतातला कव्वालीचा प्रकारही ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटातून लोकप्रिय होत होताच. या गाण्याच्या निमित्तानं लेखकानं कव्वाली या संगीतप्रकाराबद्दल खूप नेमकी माहिती दिली आहे. १९८० ते १९९० च्या काळात चित्रपट निर्माण करताना लागणाऱ्या पैशांचा अभाव, वाढत्या कामगार संघटना यांच्यामुळे काही हिंदी चित्रपट आणि संगीत मद्रासमधून तयार व्हायला लागलं. त्यामुळे ए आर रेहमान आणि एस पी बालसुब्रम्हण्यम अशा संगीतकार/गायक यांचा हिंदी चित्रपटांमध्ये प्रवेश झाला. 

सहावं प्रकरण ए आर रहमान याच्या ‘कहना ही क्‍या’ या बाँबे चित्रपटातल्या गाण्याबद्दलच सुरू होतं. ए आर रेहमाननं इलेक्‍ट्रिक गिटारबरोबर ॲकॉस्टिक गिटार, व्हायोलिन, हार्प, पियानो, ड्रम, बेंजो सॅक्‍सोफोन, कीबोर्ड,  पॅन फ्लूट या पाश्‍चिमात्य वाद्यांचा चित्रपटसंगीतात वापर केला. २००० पर्यंत परदेशात राहाणारे आणि भारतीय नीतिमूल्य जपणारे भारतीय (परदेस / डीडीएलजे / केजी) चित्रपटात सर्रास दिसायला लागले. हे सर्वजण आपल्याकडच्या कौटुंबिक मूल्यांची भलावण करताना, ॲरेंज्ड मॅरेजेसचा आणि एकत्र कुटुंबपद्धतीवरचा पुरस्कार करताना चित्रपटांमध्ये दिसायला लागले. ‘तुझे देखा तो यह जाना सनम’ या ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ चित्रपटातल्या गाण्यामधून लेखकानं हे उत्तमपणे मांडलं आहे.

पुस्तकाच्या सातव्या प्रकरणात  २००१ ते २०१३ हा काळ आहे. गाणं गायल्यानंतर संगीतमेळ त्यावर बसवणं (पोस्ट ऑर्केस्ट्रा) असे रेकॉर्डिंगचे नवीन प्रकार या सुमारास सुरू झाला. शंकर महादेवन, अभिजीत, सोनू निगम, श्रेया घोषालपासून अरिजित सिंगपर्यंत अनेक गायक गायिकांचा उदय झाला. शंकर एहसान लॉय या त्रिकूटानं ‘दिल चाहता है’ मधल्या संगीतात धमाल उडवून दिली. त्यांनीच ‘रंग दे बसंती’मध्ये पंजाबी भांगडा हा प्रकार ‘थोडीसी धूप’ या गाण्यात रिमिक्‍स करून वापरला. 

आठव्या प्रकरणात हिंदी चित्रपटसंगीताच्या भवितव्याबद्दल लेखकानं विचार मांडले आहेत. त्यापैकी संगीतकारांचं वर्चस्व कमी होत जाईल, हा एक मुद्दा लक्षणीय आहे. गाणी नसलेले चित्रपट तयार करायला दिग्दर्शकांना आवडतील आणि प्रेक्षकही ते स्वीकारतील. त्यामुळे एका चित्रपटात भरपूर गाणी हा प्रकार कमी होत जाईल. गुणवत्ता असलेली मोजकी गाणी काळाच्या ओघात चित्रपटात सादर होतील, असं लेखकाचं मत आहे. तसंच ‘लाइफ इन अ मेट्रो’ मध्ये वापरला होता तसा संगीताचा प्रकार वापरला जाईल. प्रसंगानुसार एखादा ग्रुप गाणं सादर करेल. अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला गायक/गायिकेनं आवाज देणं हा प्रकार कमी होत जाईल. हा लेखकाचा मुद्दाही विचारात घेण्यासारखा आहे. पण जे बोलून व्यक्त करता येत नाही आणि ज्याच्याबद्दल न बोलणंही अशक्‍य असतं असं काहीतरी फक्त संगीतातून व्यक्त होतं असं व्हिक्‍टर ह्युगो म्हणतो. मानवी भावना आहेत तोपर्यंत गाणं असणारच आहे..!   

संबंधित बातम्या