पडद्यामागच्या यशोगाथा

नीलांबरी जोशी
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

बुक-क्लब
 

कॅलिफोर्नियातल्या ‘सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट’ला ‘नासा’कडून मिळालेली देणगी डग्लस एंगेलबार्ट या इंजिनिअरला एकाच विशिष्ट प्रोजेक्‍टसाठी वापरायची होती. मग माणसांना कॉम्प्युटरवर सहज काम करता येईल, असे काहीतरी शोधायचे त्याने ठरवले. ‘कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरची एखादी गोष्ट सहज सिलेक्‍ट कशी करता येईल’ यावर त्याचा सहकाऱ्यांबरोबर विचार सुरू झाला. नंतर प्रयोगांमध्ये लाइट पेन्स, जॉयस्टिक्‍स, ट्रॅकबॉल्स, ट्रॅकपॅड्स अशी उपकरणे वापरून पाहण्यात आली. एंगेलबार्ट आणि त्याचा सहकारी बिल इंग्लिश यांनी प्रत्येक उपकरणाद्वारे युजरला स्क्रीनवरच्या गोष्टीपर्यंत पोचायला किती वेळ लागतो ते मोजले. लागणाऱ्या वेळाबरोबरच या प्रत्येक उपकरणाचे फायदे आणि त्यातल्या उणिवाही त्यांनी लिहून काढल्या. १९६१ मध्ये एके दिवशी सकाळी, शाळेत त्याला भुरळ पाडत असलेला ‘प्लेनीमीटर’ आठवला. त्या उपकरणाला काटकोनातली दोन चाके होती आणि ते सगळ्या दिशांना सरपटू शकत होते. एकदा त्या चाकांची कल्पना समोर आल्यावर बाकीचे सगळे सोपे होते. मग त्याने एक रेखाचित्र काढले. ते उपकरण डेस्कटॉपच्या स्क्रीनवर फिरेल आणि त्या व्हील्समधून घातलेली एक वायर कर्सर वर खाली किंवा पुढे मागे फिरवेल अशी त्या रेखाचित्रात कल्पना केली होती. या रेखाचित्रावरून बिल इंग्लिश याने लाकडापासून एक मॉडेल तयार केले. सुरुवातीला वायर पुढच्या बाजूला होती. पण ती शेपटीसारखी मागे असायला हवी असे त्यांच्या लगेचच लक्षात आले. मग त्यांनी त्या उपकरणाला नाव दिले - माऊस! 

कॉम्प्युटर आणि इंटरनेट हे गेल्या शतकातल्या सर्वांत महान शोधांपैकी एक आहेत. पण यातल्या अनेक गोष्टींचा शोध कसा लागला, तो कोणी लावला याबद्दल सर्वसामान्य जनतेला फारशी माहिती नसते. महत्त्वाचे म्हणजे एडिसन किंवा अलेक्‍झांडर ग्रॅहॅम बेल यांच्यासारखे त्यांनी एका ठिकाणी बसून एकट्याने ते शोध लावले नव्हते. टीमवर्कमुळे अनेकजणांच्या क्षमता बहरल्या आणि नावीन्यपूर्ण शोध जन्माला आले. आजच्या डिजिटल तंत्रज्ञानात अशा अनेक पडद्यामागच्या कहाण्या आहेत. ‘द इनोव्हेटर्स ः हाऊ अ ग्रुप ऑफ हॅकर्स, जिनियसेस अँड गीक्‍स क्रिएटेड द डिजिटल रिव्होल्यूशन’ या पुस्तकात वॉल्टर इसाकसन याने याच कहाण्या मांडल्या आहेत. नवनवीन शोध लावायला कोणती सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती कारण ठरली हेही या पुस्तकाच्या ओघात येते. तंत्रज्ञान आणि ते निर्माण करणारी माणसे अशा दोन्ही गोष्टी या पुस्तकात हातात हात घालून जातात. उदाहरणार्थ, पहिले ॲनालिटिकल इंजिन, नंतरचे ट्रान्झिस्टर्स, माऊस, मायक्रोचिप, पर्सनल कॉम्प्युटर्स, इंटरनेट असे तंत्रज्ञान आणि त्याचा शोध लावणारी चार्ल्स बॅबेज, ॲडा लव्हलेस, व्हॅनेव्हार बुश, ॲलन ट्युरिंग, बिल गेटस, पॉल ॲलन, स्टीव्ह वॉझ्नियॉक, स्टीव्ह जॉब्ज, टिम बर्नर्स ली, लॅरी पेज यांच्यासारख्या साठपेक्षा अधिक लोकांची चरित्रे या पुस्तकाच्या ओघात येतात. तंत्रज्ञानासारखा किचकट विषय आशयसंपन्नपणे लोकांसमोर रसाळपणे मांडण्याची कला फार कमी लेखकांमध्ये असते. इसाकसनला ते चांगलेच जमले आहे. 

या पुस्तकाच्या तीन महत्त्वाच्या मध्यवर्ती संकल्पना जाणवतात. एक म्हणजे सृजनशीलता एकत्रितपणे बहरते. उदाहरणार्थ, स्टीव्ह जॉब्जच्या यशात वॉझ्नियॉक या त्याच्या सहकाऱ्याचा मोठा वाटा होता. दुसरे म्हणजे आधीच्या पिढ्यांनी मांडलेल्या कल्पनांवर आधारित नवीन तंत्रज्ञान निर्माण होत जाते. इसाकसन याने मांडलेली तिसरी संकल्पना म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र येणे जास्त उत्पादनक्षम ठरते. उदाहरणार्थ, ‘बेल लॅब्ज’मध्ये ट्रान्झिस्टर्सपासून ते युनिक्‍ससारख्या ऑपरेटिंग सिस्टीम्सपर्यंत असंख्य महत्त्वाचे शोध लागले आहेत. तिथे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर इंजिनिअर्सपासून ते मानसशास्त्रज्ञांपर्यंत वेगवेगळ्या शाखांमधले लोक एकत्रितपणे काम करत होते. 

या पुस्तकात एकूण १२ प्रकरणे आहेत. त्यापैकी पहिल्या ‘ॲडा ः काऊंटेस ऑफ लव्हलेस’ या प्रकरणात ॲडा लव्हलेस या लॉर्ड बायरन या इंग्रजी कवीच्या मुलीने कॉम्प्युटरची कल्पना मांडली त्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. नवनवीन तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या लोकांना ल्यूडाईटस म्हटले जाते. लॉर्ड बायरन हा चक्क अशा ल्यूडाईटच्या बाजूचा होता. त्याचे एकमेव औरस अपत्य म्हणजे ॲडा. ॲडा गणितज्ञ होती. ‘फादर ऑफ द कॉम्प्युटर’ मानल्या जाणाऱ्या चार्ल्स बॅबेजच्या ‘ॲनालिटिकल इंजिन’चा उपयोग केवळ गणिती आकडेमोडीपलीकडेही आहे असे प्रथम १९४२ मध्ये ॲडाच्या लक्षात आले. तिनेच या यंत्रासाठी पहिला अल्गॉरिदम लिहिला. सिंबॉल्स, लॉजिक, शब्द आणि संगीत अशा सर्व गोष्टी हे यंत्र साठवून मॅनिप्युलेट करू शकेल असे ॲडाचे मत होते. १८५० च्या दशकात कॉम्प्युटर स्वतः विचार करू शकतील का? असा विचार तिने करणे हे अत्यंत विस्मयकारक आहे. 

पुस्तकातल्या दुसऱ्या ‘द कॉम्प्युटर’ या प्रकरणात कॉम्प्युटरचा उदय राजकीय गरजांमधून होत गेला त्याबद्दल सविस्तर माहिती आहे. १९३० मध्ये ‘एमआयटी’मध्ये व्हॅनेवर बुश या शास्त्रज्ञाने पहिल्या महायुद्धात तोफा उडवताना करायच्या आकडेमोडीसाठी ‘डिफरंशिअल ॲनालयझर’चा वापर केला. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर १९४३ मध्ये ॲलन ट्युरिंगच्या ‘कलोसस’ या यंत्राने जर्मन गुप्त संदेश डिसायफर केले. 

दुसऱ्या महायुद्धात क्षेपणास्त्रांचा मार्ग मोजण्यासाठी काही इंजिनिअर्सनी यंत्रे तयार केली. त्यापैकी एकजण जॉन मॉकली होता. १९४१ च्या जूनमध्ये तो आमेस आयोवा या ठिकाणी गेला. तिथे जॉन ॲटनसॉफ या इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरने एक इलेक्‍ट्रॉनिक कॅल्क्‍युलेटर तयार केला होता. मॉकलेने काही दिवसांतच ‘इएनआयएसी - एनिॲक’ या २७ टनी यंत्रामध्ये ॲटनसॉफच्या कल्पना १७४६८ व्हॅक्‍यूम ट्यूब्स वापरून प्रत्यक्षात उतरवल्या. यानंतर पहिल्या कॉम्प्युटरच्या पेटंटवरून झालेल्या मॉकली आणि ॲटनसॉफ यांच्या मारामाऱ्या १९७३ पर्यंत चालल्या. त्यात अखेरीस ॲटनसॉफ जिंकला. 

पुस्तकातले तिसरे प्रकरण ‘प्रोग्रॅमिंग’चे आहे. ग्रेस हॉपर ही नाविक दलात ॲडमिरल असलेली कॉम्प्युटर संशोधिका पहिली प्रोग्रॅमर मानली जाते. कोबॉल, फोरट्रॉन या कॉम्प्युटर लॅंग्वेजेस तिने शोधल्या. इसाकसनने या क्षेत्रातल्या महिलांचे योगदान जागोजागी नमूद केले आहे, ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. चौथे प्रकरण ‘ट्रान्झिस्टर’ हे आहे. जॉन बारडीन हा शांत स्वभावाचा भौतिकशास्त्रज्ञ, वॉल्टर ब्रॅट्टेन हा प्रयोगशील संशोधक, विल्यम शॉकली हा सगळे श्रेय स्वतःकडे घेणारा बॉस या तिघांनी मिळून ‘बेल लॅब’मध्ये १९४७ मध्ये ट्रान्झिस्टरचा शोध लावला. आयबीएमच्या थॉमस वॉटसनने हे ट्रान्झिस्टर्स कॉम्प्युटर्समध्ये वापरले. ‘बेल लॅब्ज’च्या शॉकलीने या काळात स्वतःची कंपनी सुरू करायचे ठरवले. आपल्या वृद्ध आईला सहज भेटता यावे यासाठी त्याने ‘पालो अल्टो’ या ठिकाणी कंपनी सुरू केली. यानंतर इलेक्‍ट्रॉनिक्‍समधले तंत्रज्ञान जिथे बहराला आले, त्या ‘सिलिकॉन व्हॅली’चा जन्म झाला. पुस्तकाच्या पाचव्या ‘द मायक्रोचिप’ या प्रकरणात आज अग्रेसर असलेल्या ‘इंटेल’चा जन्म कसा झाला याबद्दल वाचायला मिळते. शॉकलीच्या ‘सेमीकंडक्‍टर लॅबोरेटरीज’मधल्या अधिकारशाहीला कंटाळून गॉडॉन मूरसकट आठजण बाहेर पडले. अँडी ग्रोव्ह या तरुण हंगेरियन इंजिनिअरबरोबर आणि आर्थर रॉकच्या आर्थिक गुंतवणुकीच्या जोरावर या सर्वांनी इंटेल कंपनी सुरू केली. पुस्तकाच्या सहाव्या ‘व्हिडिओ गेम्स’ या प्रकरणात स्टीव्ह रसेलने तयार केलेला ‘स्पेसवॉर’ हा पहिला ओपन सोर्स कॉम्प्युटर गेम होता; नोलान बुशनेलने ‘अतारी’ ही प्रसिद्ध कंपनी सुरू केली अशा गोष्टी वाचायला मिळतात. पुस्तकाच्या सातव्या ‘द इंटरनेट’ या प्रकरणात ‘ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्‍ट एजन्सी - अर्पानेट’च्या बॉब टेलर या धडाडीच्या आणि बुद्धिमान संचालकाने लॅरी रॉबर्टसला आपल्याकडे आणले. पॉल बरानच्या पॅकेट स्विचिंगच्या कल्पनेवर आधारित असलेले नेटवर्क लॅरी रॉबर्टसनने लष्करी उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात वापरले. मग १९६९ मध्ये इंटरनेटचे जाळे फैलावले. 

आठव्या प्रकरणात मोठमोठ्या कॉम्प्युटर्सच्या जंजाळातून सुटून आज आपण वापरतो तो पर्सनल कॉम्प्युटर कसा विकसित झाला ते कळते. झेरॉक्‍सच्या ‘पीएआरसी संशोधन संस्थे’ने ‘डायनाबुक’ हा पहिला नोटबुक कॉम्प्युटर बाजारात आणला. यानंतर काही इंजिनिअर्सनी ‘ग्राफिक युजर इंटरफेस - जीयुआय’ ही सिस्टिम विकसित केली. इंटेलने आपली गाजलेली ‘८०८० चिप’ बाजारात आणली. 

याच काळात ‘एमआयटी’चा ‘अल्टेअर ८८००’ हा कॉम्प्युटर आला. बिल गेट्‌स आणि पॉल ॲलन या दोघांनी कॉम्प्युटर्स स्वस्त होतील हे ओळखून सॉफ्टवेअरचा उद्योग यशस्वी होईल हे हेरले. यातून ‘बेसिक’ या कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजचा जन्म झाला. बिल गेट्‌स हा रात्रंदिवस काम करणारा, अधिकाराला न जुमानणारा होता. दिवसाला तो १६ कोक प्यायचा. गेट्‌स आणि ॲपलचा सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्ज यांच्यातली ‘ग्राफिक युजर इंटरफेस’वरून झालेली मारामारी याच प्रकरणात वाचायला मिळते. ‘ऑन लाइन’ या पुस्तकाच्या दहाव्या प्रकरणात इंटरनेट सर्वसामान्य माणसापर्यंत कसे पोचले ते कळते. अल गोर या अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी मार्च १९९९ मध्ये सीएनएनच्या मुलाखतीत ‘इंटरनेट तयार करण्यात मी पुढाकार घेतला’ असे विधान केले होते. त्यावरून बरीच खळबळ माजली होती. पण प्रत्यक्षात त्याला पूरक असे कायदे आणण्यात अल गोर यांचा खरेच पुढाकार होता. त्यामुळे इंटरनेट सर्वसामान्य जनतेपर्यंत सहज उपलब्ध व्हायला मदत झाली. 

‘द वेब’ या अकराव्या प्रकरणात आज सर्वत्र दिसणाऱ्या वेब पेजेसचा, त्यासाठी लागणाऱ्या हायपरटेक्‍स्टचा, युआरएल आणि एचटीटीपी प्रोटोकॉलचा शोध कसा लागला ते दिसते. आज वेबवर महत्त्वाचा ठरलेला विकिपिडिया वॉर्ड कनिंगहॅम आणि जिमी वेल्स यांनी सुरू केला. याच प्रकरणात लॅरी पेज आणि सर्जेई ब्रिन यांची ‘गुगल स्टोरी’ वाचताना चित्तथरारक कादंबरी वाचल्याचा भास होतो. 

पुस्तकातले शेवटचे बारावे प्रकरण ‘ॲडा फॉरएव्हर’ हे आहे. ॲडा लव्हलेसने ‘कॉम्प्युटर स्वतः विचार करू शकणार नाहीत आणि माणूस आणि कॉम्प्युटर यांचे साहचर्यच मानवजातीला उपकारक ठरेल,’ असे मत मांडले होते. आज ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या जोरावर कॉम्प्युटर्स मानवावर राज्य गाजवतील का? अशी भीती व्यक्त केली जाते. हा विचार ॲडाने १८६० मध्येच मांडला होता, हे इसाकसन वाचकांच्या लक्षात आणून देतो. 

केवळ माहिती असणे पुरेसे नाही, ती वापरून पाहायला हवी. काहीतरी करण्याची इच्छा पुरेशी नाही, करूनच पाहायला हवे, असे लिओनार्डो दा विंची म्हणतो. ‘इनोव्हेटर्स’ हे पुस्तक याची साक्षच पटवते.   
(समाप्त)

संबंधित बातम्या