संघर्ष भेदणाऱ्या लहानग्यांची कथा

अभिजित सोनावणे
सोमवार, 24 जून 2019

पुस्तक परिचय
 

मानवी मन मोठं विलक्षण आहे. या मनावर जसे संस्कार होतात, तसं ते घडत जातं. लहानपणी आपल्या आजूबाजूचा भवताल टिपत टिपत त्याचं प्रतिबिंब जगण्यात उमटत जातं आणि पुढं आपलं जगणंही थोडंबहुत त्याच परिघात सुरू राहतं. थोडक्‍यात काय, तर माणसाच्या एकूण जगण्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा काळ कोणता असेल, तर तो बालपणाचाच! मुलांचं बालपण आनंदी, खेळकर व्हावं, यासाठी आई-वडील धडपडत असतात. त्यांना हवं ते मिळावं, यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. पण लहान मुलांचं असंही एक मोठं जग आहे, की जिथं त्यांचं बालपण हे वेगवेगळ्या कारणांनी अभावाचं बनलेलं असतं. जन्मापासूनच विविध पातळ्यांवर त्यांना संघर्षाला सामोरं जावं लागतं. हे अभावाचं जगणं, समोर आलेला संघर्ष यांच्याशी दोन हात करत त्यांना आपल्या वाट्याला आलेलं जगणं जगण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नसतो. या मुलांचं भावविश्‍व समजून घेऊन त्यांच्या भवितव्याला आकार देण्याच्या प्रयत्नातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे रेणू गावस्कर! गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ त्या परिघाबाहेरच्या वंचित मुलांसाठी काम करत आहेत. हे सारं काम करत असताना त्यांच्यासमोर जी-जी मुलं आली, त्या प्रत्येकाची एक स्वतंत्र कहाणी होती. त्या प्रत्येकाचं वेगळं जग होतं. ते जग अडचणींचं होतं, दुःखाचं होतं आणि वेदनेनंही भरलेलं होतं. प्रत्येकाच्या या कहाणीला आकार द्यायचं रेणू गावस्करांनी ठरवलं. त्यांच्यात स्वप्न पेरली. त्यांच्याशी भावबंध जोडून त्यांना खऱ्या अर्थानं वाटेवर आणलं. अशा असंख्य बदलाच्या कहाण्यांच्या रेणू गावस्कर साक्षीदार राहिल्या आहेत. त्यातल्या काही प्रातिनिधीक कहाण्यांचं पुस्तक म्हणजे ‘स्वप्नांचे शिलेदार’!

वडिलांचं काम सुटल्यावर शिकायचं नाही असं ठरवत आईसोबत घरकाम करू लागलेली सुनीता अभ्यासात रमते, नृत्यात पारंगत होते.

‘वाया गेलेला’ असा शिक्का बसलेल्या श्रीकांतमध्ये ‘पुंगीवाला’ या नाटकात मिळालेल्या नायकाच्या भूमिकेमुळं बदलाला सुरुवात झाली. तो स्वतः तर बदललाच पण सोबतच उद्‌ध्वस्त होत असलेल्या अनेक मुलांनाही त्यानं बदलायला भाग पाडलं. वडील गेल्याची बातमी आपल्यापासून लपवली, या घटनेचा खोल परिणाम होऊन शांत असलेला तपन प्रचंड आक्रमक झाला. रवींद्रनाथांच्या पिता-पुत्रांच्या गोष्टी हे त्याच्या आक्रमकतेवरचं औषध बनलं आणि तो आनंदी, प्रसन्न बनला. ‘तुमची संस्था गरीब पोराला शिकवते, असं ऐकलं म्हणून आमी आलोय,’ असं खणखणीतपणे सांगणारी सुहानी शिकली आणि तिनं कुटुंबालाच दिशा दिली.

... अशा जवळपास तीसेक जिवंत कहाण्या या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात.

या कहाण्या वाचल्यावर आपल्याला काय मिळतं? त्या आपल्याला काय देऊन जातात? असा विचार केल्यास लक्षात येतं, की या कहाण्या आपल्याला दुःखं देऊन जातात. कमालीचं अस्वस्थ करतात. पुस्तक वाचताना अस्वस्थतेबरोबर उत्सुकताही वाटत राहते. या प्रत्येक मुलाच्या आयुष्यात काय काय बदल घडला, त्यानं स्वतःला कसं बदलवलं, रेणूताईंनी नकळतपणे त्यांच्यात कोणत्या गोष्टी पेरल्या, याबाबतची ही उत्सुकता असते. या पुस्तकाचं जिवंतपण या मुलांच्या कहाण्यांमध्ये, रेणूताईंनी लिहिलेल्या शब्दांमध्ये शोधता येत नाही किंवा तसा प्रयत्न केल्यास तो कायमच अपूर्ण राहील, असं वाटतं. रेणूताईंनी ज्या पद्धतीनं मुलांच्या भावविश्‍वाला जराही धक्का न लावता त्यांच्यात हवे ते बदल त्यांच्याही नकळतपणे त्यांच्याकडूनच करवून घेतले, या त्यांच्या कृतीत या पुस्तकाचं जिवंतपण शोधावं लागतं. कथांच्या पलीकडं त्यांच्यात वावरणारी ही प्रामाणिक कृती हेच या पुस्तकाचं वेगळेपण बनली आहे. त्यामुळंच त्यांची ही कृती शब्दबद्ध होताना त्यात एक सहजता आली आहे. कधी एखाद्या प्रसंगानं, कधी एखाद्या वाक्‍यानं, कधी थेट संबंधित मुला-मुलीची ओळख करून देत रेणूताई या कहाणीची सुरुवात करतात. त्यामुळं पहिल्या परिच्छेदातच आपण वाचक म्हणून त्या कहाणीशी जोडलं जातो. वाचता वाचता कहाणीत रमतो. पानापानातून ही कहाणी आपल्याला जागं करते, हे करता करताच या कहाण्या आपल्या अवतीभवती असणाऱ्या अशा मुलांची आठवणही करून देतात आणि त्यांचं न दिसलेलं जगणं आपल्यासमोर आणून ठेवतात. त्यामुळंच या बदलत्या बालविश्‍वाचा वाचक म्हणून साक्षीदार होताना आपणही हळूहळू आतल्या आत बदलत जातो. वंचित, उपेक्षित आणि अभावाचं जगणं जगत असणाऱ्या मुलांबद्दल मनात एक सहानुभूती तयार करण्याचं काम हे पुस्तक दमदारपणे करतं. या कहाण्या अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहिल्या गेल्या आहेत. पण त्या कहाणीला चांगलं म्हणता येत नाही, हा अभिप्राय वाचल्यानंतर मनात तयार होणं, हेच या संघर्ष भेदणाऱ्या लहानग्यांच्या कथा आशयाचं यश म्हणावं लागेल.     

संबंधित बातम्या