नको व्यक्तिस्तुती, हवी वस्तुस्थिती 

अनंत गाडगीळ
सोमवार, 17 मे 2021

पुस्तक परिचय

आजोबा-पणजोबांच्या जमान्यात लग्नानंतर स्त्रीला ‘अष्टपुत्रा हो’ असा आशीर्वाद दिला जायचा. मात्र, ‘अष्टपुरस्कार विजेता हो’ असा आशीर्वाद जर कुणाला दिला गेला असेल, तर तो म्हणजे अमेरिकेतील फॉक्स न्यूज या प्रसिद्ध टीव्ही चॅनेलवरील चर्चासत्र मालिकांचे सादरकर्ते, प्रसिद्ध पत्रकार मार्क लेविन यांना. कारण, न्यूयॉर्क टाइम्सच्या ‘बेस्ट सेलिंग ऑर्थर’ (सर्वाधिक खपाचा लेखक) यादीवर तब्बल आठ वेळा पहिल्या क्रमांकावर राहण्याचा मान मार्क लेविन यांना मिळाला आहे.  

व्यक्ती, विचार व लेखनस्वातंत्र्य म्हणजे काय? आज ते आहे का? ‘बातमी’ म्हणजे नेमके काय? माहिती व जनप्रबोधनासाठी केलेली की टेबलावर बसून रेखाटलेली. पत्रकार म्हणजे काय? दबलेल्यांचा आवाज उठवत गैरकृत्याकरिता प्रशासनाला जाब विचारणारा की आपल्या पेपरच्या मालकाची भूमिका बातमी म्हणून मांडणारा? या सर्व प्रश्नांचा यथायोग्य ऊहापोह कधी मार्मिक, तर कधी गंभीर व स्पष्टपणे मार्क लेविन यांनी त्यांच्या सध्या गाजत असलेल्या ‘अनफ्रिडम ऑफ दि प्रेस’ या पुस्तकात केला आहे. लेविन यांचे लिखाण जरी सद्यपरिस्थितीवर असले तरीही त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी लेखनाची सुरुवात अनेक ऐतिहासिक दाखले देत केली आहे.  

विविध राजकीय पक्ष प्रसारमाध्यमांकडे कसे पाहतात यावरही लेविन यांनी प्रकाश टाकला आहे. उदाहरणार्थ, एका सर्वेक्षणातील गमतीशीर भाग म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाच्या ५४ टक्के सदस्यांनी प्रसारमाध्यमे निःपक्ष असल्याचे, तर ६८ टक्के रिपब्लिकन सदस्यांनी ती निःपक्ष नसल्याचे मत व्यक्त केले आहे. इंडियाना विद्यापीठाच्या लार्स विलनाट व डेव्हिड व्हिवर यांनी २०१४ साली केलेल्या १०८० अमेरिकी पत्रकाराच्या सर्वेक्षणानुसार २८ टक्के पत्रकार डेमोक्रॅटिक पक्षाचे, तर ७ टक्के रिपब्लिकन पक्षाचे नोंदणीकृत सदस्य निघाले. 

कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक जॉर्ज मेसन यांच्या संशोधनाप्रमाणे विशिष्ट राजकीय विचारसरणीचे बातमीदार सामान्य अमेरिकी वाचकाच्या मताचा आपल्या लिखाणातून विपर्यास करतात. तर प्रसिद्ध  पत्रकार बिल कोव्हाच व टॉम रोझनस्टील यांच्या मते १९व्या शतकातील ‘खऱ्या पत्रकारिते’ची व्याख्या म्हणजे पत्रकाराने फक्त वास्तव शोधून एकत्र करायचे, बातमीचे स्वरूप आपोआप निर्माण होईल असे होते. मात्र भविष्यात सत्यापेक्षा अफवांवर व व्यावसायिक हितसंबंधांवर आधारित अशा बातम्यांचे प्रमाण वाढणार आहे असे गंभीर विधान लेखक करतात. 

ब्रिटिश पत्रकार क्लाउड काकबर्न यांच्या मते खऱ्या पत्रकाराने वस्तुस्थिती प्रथम मांडली पाहिजे आणि नंतर ती परिणत केली पाहिजे. मात्र त्यांच्या मते अगदी याउलट घडते आहे. हल्ली बातम्यांमध्ये पत्रकाराचा दृष्टिकोन प्रथम मांडला जातो आणि त्या अनुषंगाने नंतर वस्तुस्थिती तयार केली जाते. अशा विविध तज्ज्ञांच्या उदाहरणांतून लेविन यांनी पत्रकारितेचे एक वेगळेच स्वरूप पुस्तकात मांडले आहे.      

‘सेन्टर फॉर पब्लिक इंटिग्रिटी’ या प्रसिद्ध अमेरिकी संस्थेने २०१६च्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक निधीबाबत एक धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. ‘वर्किंग जर्नलिस्ट’ यांनी हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी सुमारे चार लाख डॉलर्स (२८० लाख रुपये) जमवले आणि त्यातील ९६ टक्के निधी हा एकट्या क्लिंटन यांच्याकडे वळविला हेदेखील लेविन यांनी नमूद केले आहे. 

 सध्याच्या प्रसारमाध्यम दुनियेत बातमी देण्याची जबाबदारी ज्या पत्रकारांवर आहे, तेच कसे अंतर्गतरीत्या वृत्तपत्र स्वातंत्र्य नष्ट करीत आहेत, विशिष्ट राजकीय पक्षांची विचारसरणी, बातमी म्हणून कशी लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे, ठरावीक व्यक्ती वा विचाराविरुद्धच्या बातम्यांत महत्त्वाचा भागच वर्तमानपत्रांकडूनच कसा गाळला जात आहे, पत्रकारच सत्ताधाऱ्यांचे प्रचारक कसे होत आहेत, या सर्व बाबींचा परामर्श मार्क लेविन यांनी या पुस्तकात घेतला आहे.   

 राजकारणी व्यक्तींवर माध्यमांनी विनाकारण राग धरल्याने उलट परिणाम काय होतात हे दाखविण्यासाठी लेविन ट्रम्प यांचे उदाहरण देतात. ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या वादग्रस्त स्वभावानुसार अमेरिकेतील सातपैकी ‘सीबीएस’, ‘सीएनएन’, ‘एनबीसी’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ व वॉशिग्टन पोस्ट’ या सहा प्रमुख माध्यम संस्थांना जाहीरपणे अनेकदा फटकारले होते. ट्रम्प यांनी एकदा तर पत्रकारांना जनतेचे शत्रू - फेक न्यूजकार असे संबोधताच संतापाची प्रचंड लाट उठली. ‘बोस्टन ग्लोब’ने पुढाकार घेत संपादकीय प्रतिसादाची इतकी आघाडी उघडली की ३०० वर्तमानपत्रांनी १५ ऑगस्ट २०१८ या एकाच दिवशी चौथ्या स्तंभाची बाजू मांडणारे अग्रलेख लिहून एकजुटीचे प्रदर्शन केले. ट्रम्प यांची अशी बाजू जरी लेविन यांनी पुस्तकात मांडली असली तरीही लेविन यांचा लिखाणाचा कल मात्र बहुतांश ट्रम्प यांच्याकडे झुकलेला आहे. किंबहुना काही ठिकाणी ते ओढून ताणून ट्रम्प यांची बाजू घेताना दिसतात. अमेरिकेतील वृत्तपत्रांचा उगम यापासून ते सध्याची पत्रकारिता याचा सामान्य वाचकाला जर शोध घ्यायचा असेल तर त्या दृष्टीनेही हे पुस्तक वाचनीय आहे.

Unfreedom of the Press
Writer : Mark Levin
Publisher : 
Threshold  Editions
Price : ₹  1324  (Paper back)
Pages : 272

संबंधित बातम्या