शिक्षणाची ‘मॅरेथॉन’

अनुजा जगताप
शुक्रवार, 15 जून 2018

शिक्षण विशेष

शर्यत शिक्षणाची 
लेखक : व्ही. रघुनाथन,
अनुवाद : कुंडेटकर
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे
किंमत : १६० रुपये
पाने : १७६
 

मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे शिक्षण. आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीचं स्वरूप पाहिलं, की असं वाटतं तीन वर्षांचं पोर झालं, की ’जुंपा त्याला शिक्षणाच्या रगाड्यात’. थोडक्‍यात काय, अगदी लहान वयापासून आपण पोरांना एका वेगवान शर्यतीचा घोडाच बनवून टाकतो. मुलांचं व्यक्तिमत्त्व, कौशल्य विकसित करणं, त्याला उत्तम माणूस म्हणून घडवणं हे राहिलं दूरच, आपण पालक मात्र मुलांना युद्धावर किंवा पैसे कमावण्याच्या मोहिमेवर पाठवण्यासाठी सज्ज करतोय की काय असाच प्रश्न निर्माण झाला आहे.

 पण परिस्थिती तितकीही चिंताजनक नाही. मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत, त्यावर वेगवेगळ्या चर्चाही होत आहेत. अशाच काही प्रयत्नांपैकी एक पुस्तक म्हणजे व्ही. रघुनाथन लिखित ’शर्यत शिक्षणाची’. पूर्णिमा कुंडेटकर यांनी या पुस्तकाचा उत्तम अनुवाद केला आहे. पुस्तकातील पहिलंच प्रकरण तुम्हाला पुस्तकाचा हेतू समजावून देतं. या प्रकरणात तुम्ही पालक म्हणून  प्रश्नांची एक प्रश्नपत्रिकाच सोडवायची आहे. दिलेल्या उत्तरांमुळे जीवनाकडे, आपल्या पाल्यांकडे, त्याच्या शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा तुम्हालाच स्पष्ट होतो. लेखक म्हणतो, ’जीवन ही एक शर्यत आहे असं गृहीत धरुयात आणि मग पुढे जाऊयात. मात्र ही शर्यत वेगाने धावण्याची न करता मॅरेथॉन कशी करता येईल याचा विचार करायला हवा?’ पूर्ण पुस्तकभर लेखकाने शिक्षणाची शर्यत वेगवान केल्यास काय फायदे-तोटे होतील आणि मॅरेथॉन केल्यास काय फायदे-तोटे असतील याची चर्चा केली आहे. हे समजवून देताना त्यांनी काही प्रसिद्ध आणि आयुष्य पुरेपूर जगणाऱ्या’मॅरेथॉनपटूं’ची उदाहरणं दिली आहेत. एन.आर. नारायणमूर्ती, डॉ. कलाम, अंजीरेड्डी, अश्विनी नचप्पा आणि ईला भट्ट या त्या व्यक्ती. 

 शिक्षणाची शर्यत ही वेगाने धावण्याची असेल तर तुम्ही कायम दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाणं हेच ध्येय ठेवता. सतत पुढे जायची, जिंकण्याचीच इर्षा मनात ठेवता. चांगली सुरवात करणं या शर्यतीत अत्यंत महत्त्वाचं असतं. याउलट आता शिक्षण हे जर मॅरेथॉन शर्यतीसारखं असेल तर काय काय होतं हे पाहूयात. मॅरेथॉनमध्ये तुमची शर्यत तुमच्या स्वत:सोबतच असते. ज्यामध्ये तुम्ही स्वत:च तुमचं ध्येय आखायचं असतं. जिंकणं इथे महत्त्वाचं नसतंच तर पूर्ण शर्यत छानपैकी एंजॉय करायची असते. म्हणजेच शर्यत पूर्ण करणं महत्त्वाचं असतंच पण ती खिलाडूवृत्तीने आणि आनंद घेत पूर्ण करावी. व्ही. रघुनाथ यांनी शिक्षणासाठी वापरलेली ही दोन्ही रूपकं  अतिशय बोलकी आहेत.

शिक्षणाच्या अनुषंगाने लेखकाने इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला आहे. उदाहरणार्थ, पालकत्वाची सर्वसाधारण कल्पना काय असते? आदर्श पालक म्हणजे नेमकं काय? मुलांना कितव्या वर्षी शाळेत घालावं? बौद्धिक वाढेकडे लक्ष देता देता त्यांची कल्पनाशक्ती कशी जपावी? मुलांना शिस्त कशी लावावी? मुलांमध्ये नीतिमत्ता कशी रुजवता येईल? मुलांना केवळ स्पर्धेसाठी तयार न करता त्यांच्यातील छंद, वाचनाची आवड कशी जोपासता येईल? स्पर्धेत येणारं अपयश पचवण्यास कसं शिकवावं?

असे अनेक कळीचे मुद्दे लेखकाने चर्चिले आहेत. या पुस्तकाद्वारे पालकांना जीवनाकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहायला ते प्रवृत्त करतात. तुम्ही तुमच्या मुलाला आयुष्याच्या शर्यतीत वेगाने भरधाव पळायला शिकवणार, की जीवनाचा  आनंद घेत एक समृद्ध शर्यत पूर्ण करायला मदत करणार असा महत्त्वाचा प्रश्न ते पालकांना विचारतात.

संबंधित बातम्या