निराळे आणि समृद्ध भावविश्‍व

आसावरी काकडे
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

पुस्तक परिचय

जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नर यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद ‘साक्षीभावाने बघताना’ या नावाने रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलेले मुखपृष्ठ प्रथमदर्शनी उत्कंठावर्धक वाटते आणि ते किती समर्पक आहे ते आतील कविता आणि त्यांची सर्जनप्रक्रिया वाचल्यावर उमगते. अरुणा ढेरे यांनी उलरिकं यांच्या जर्मन कवितांचा हा अनुवाद नेहमीप्रमाणे इंग्रजीसारख्या माध्यम भाषेतील अनुवादावरून केलेला नाही, तर जयश्री जोशी या दुभाषी मैत्रिणीच्या मदतीने थेट उलरिकं यांच्याशी चर्चा करत, कविता अंतर्बाह्य समजून घेत केलेला आहे. म्हणूनच याला अनुवाद न म्हणता अनुसर्जन असे म्हटले आहे. 

या संग्रहात सुरुवातीला उलरिकं यांचे मनोगत आहे. या मनोगताच्या अनुवादाला दिलेले ‘श्वास, स्पंदन, कक्षा’ हे नाव आणि ‘कविता म्हणजे काय? या प्रश्नाने झालेली मनोगताची सुरुवात हे दोन्ही लक्षवेधी आहे. पुढील मांडणी वेगळी, बारकाईने समजून घेण्यासारखी आहे. एके ठिकाणी म्हटले आहे, ‘ज्ञात विषयाचे केवळ संकलन, चित्रावृत्ती किंवा यथावत चित्रण हे कवितेचे प्रयोजन नाही. तसा दंभ कवितेने मांडू नये. आपलं शांतवन करणं ही कवितेची इतिकर्तव्यता नाही... कवितेचे बलस्थान आहे तिच्या अनेकपदरी संदिग्धतेत..!’ 

संग्रहाच्या प्रस्तावनेत अरुणा ढेरे यांनी या अनुसर्जन प्रक्रियेविषयी विस्ताराने लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, ‘उलरिकं यांच्या उत्कट आणि समरसून केलेल्या कवितावाचनानं या प्रक्रियेची सुरुवात झाली. या वाचनानं तिच्या कवितेच्या एकूण अनुभवाचा स्वरही मी ऐकू शकले. ध्वनी हा तिच्या काव्यानुभवाचा एक जिवंत आणि अविभाज्य भाग आहे.’ जर्मन भाषा कळत नसूनही अरुणाताईंना या कवितांची अंतर्गत लय आणि कवितेचा भाव या वाचनातून उमगला. नंतरच्या टप्प्यावर जर्मन भाषेच्या जाणकार जयश्री जोशी यांनी कवितांचा शब्दशः अनुवाद त्यांच्यासमोर ठेवला.

भावानुवाद करण्याचे स्वातंत्र्य न घेता कवितेच्या आशयाशी आणि शब्दरूपाशीही जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा हा प्रयोग असल्यामुळे अनुसर्जनातील या नंतरचा टप्पा कसरतीचा ठरला. अरुणाताईंनी सहअनुवादक जयश्री जोशी आणि उलरिकं यांच्याशी चर्चा करत, समजुतीच्या एका समान पातळीवर आल्यावर किरकोळ बदलांची तडजोड करत, त्याला तळटिपांची जोड देत उमगलेला आशय मराठीत शब्दबद्ध केला आहे. 

या संदर्भातले जयश्री जोशी यांचे मनोगतही वाचण्यासारखे आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘आपण कविता अनुभवतो, त्या अनुभवाशी स्वतःला जोडून घेतो... त्या अनुभवाची सावली आणि सळसळ कवितेच्या भाषांतरात प्रतिबिंबित करत राहणं हे भाषांतरकाराचं उत्तरदायित्व जास्त व्यापक असतं. विविध पातळ्यांवर चाललेला हा अनुसर्जन सोहळा अंतर्वक्र भिंगासारखा असतो...’ 

ही तीन मनोगते हा या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे. या मनोगतांमधून उलरिकं यांच्या कवितेची वैशिष्ट्ये कळतात. जीवनाचा व्यापक पैस कवेत घेणारी ही कविता माणसा-माणसातील समीकरणे आणि लालसा, त्यांच्या भावनांचे खेळ, आकांक्षांचे ओझे हे जगाच्या पाठीवर सारखेच असते हे दाखवून देणारी आहे. शब्द, आकृतिबंध, लय यांच्याशी खेळ करत ही कविता ध्वनीचे बोट धरून दृश्यप्रतिमांची उकल करते. या कविता बाईपणाच्या विशिष्टतेत अडकलेल्या नाहीत. तिचे अगदी निराळे आणि समृद्ध असे अनुभवविश्व तिच्या कवितांमधून समोर येते. 

एका वेगळ्या प्रक्रियेतून मराठीत अनुसर्जित झालेल्या पस्तीस निवडक कविता मूळ जर्मन कवितांबरोबर या संग्रहात आहेत. तिन्ही मनोगते वाचून उत्सुकतेने या कवितांकडे वळल्यावर सुरुवातीला, ‘कवितेचे बलस्थान आहे तिच्या अनेकपदरी संदिग्धतेत’ याची पुष्टी करणाऱ्‍या या चार ओळी भेटतात.-  

‘मग दगडाला वाचा फुटते 
पण माणसाला 
वाटतं त्यापेक्षा  
जास्त मुका असतो दगड’

 
पुढील कवितांमध्ये ही ‘अनेकपदरी संदिग्धता’ बऱ्‍याचदा दुर्बोध होऊन आपल्या आस्वाद-क्षमतेची कसोटी लागत राहते. आस्वाद-साहाय्यक तळटिपांच्या आधारे आपण हा अनुसर्जन प्रयोग अनुभवण्याचा प्रयत्न करू शकतो. हे अनुभवताना ‘तू स्वतःच  
स्वतःचं जिवलग व्हायला हवंस..’ अशी एखादी समजुतीच्या जवळ येणारी ओळ भेटते. पण एकूण कवितांचा आस्वाद घेऊन उलरिकं या समकालीन कवयित्रीला समजून घेणे ही अनुसर्जनाइतकीच कसरत करायला लावणारी प्रक्रिया ठरते. कवितेच्या आस्वादाचा पुरेसा रियाज असेल त्याला हा अनोखा कवितासंग्रह वेगळे काही वाचल्याचा आनंद देऊ शकेल.

-------------------------------------------------------------------
साक्षीभवाने बघताना : उलरिकं द्रेस्नरच्या निवडक कविता
लेखिका - अरुणा ढेरे आणि जयश्री हरि जोशी
प्रकाशन - रोहन प्रकाशन, पुणे
किंमत - २५० रुपये
पाने - १७५ 

-------------------------------------------------------------------

संबंधित बातम्या