‘श्‍याम’चे आत्मकथन

आशा साठे
गुरुवार, 24 मे 2018

पुस्तक परिचय
‘श्‍यामची आई’, आचार्य अत्रे आणि मी, 
लेखक :
माधव वझे
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत : १८० रुपये.
पाने : १४०

सानेगुरुजींचं श्‍यामची आई हे पुस्तक आणि त्यावर आचार्य अत्रे यांनी काढलेला चित्रपट, ज्याला १९५४ या वर्षी पहिलं राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालं. या मराठी मनात कायम एक हळवा कोपरा व्यापून असलेली घटना आहे. त्या घटनांना आणखी एक नाव जोडलं गेलं ते म्हणजे त्या चित्रपटात श्‍यामचे काम करणारा शाळकरी मुलगा माधव वझे !

या घटनेलाही साठ वर्षे होऊन गेली. माधव वझे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्तही झाले. अभिनेता, दिग्दर्शक, नाट्यशिक्षक, नाट्यसमीक्षक म्हणूनही त्यांची कारकीर्द, जागर - पुणे ही त्यांची समांतर नाट्यसंस्था, रंगमुद्रासारखं त्याचं पुस्तक अशी एक प्रगल्भ वाटचाल सर्वांसमोर आहे, तरीही श्‍यामची आईमधील श्‍याम-माधव वझे ही आचार्य अत्रे यांनी दिलेली ओळख पुसली गेली नाहीये. याची खूप चांगली जाण त्यांना स्वतःलाही आहे. याची खूण या पुस्तकाच्या पहिल्या भागात पटते.

एका विलक्षण निवेदनशैलीत पुस्तकाच्या सुरवातीच्या अर्ध्या भागात आपलं घर, त्यातलं बालपण, आचार्य अत्रे यांचे श्‍यामच्या शोधासाठी घरी येणे, निवड, मग वर्षभर चाललेली चित्रपटाची निर्मिती, त्यावेळी चित्रपटात आणि भोवती असलेली माणसं आणि मुख्य म्हणजे आचार्य अत्रे यांच्यासारख्या प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाचे घडलेलं लोभस दर्शन याच्या पार हृद्य आठवणींचे ठसे लहान माधव वझे या मुलाच्या मनावर उमटत होते. ते तसेच एखादी पटकथा लिहिलेली असावी, तसे पुस्तकात शब्दबद्ध झालेले आहेत. क्वचित कुठे सहजपणे आजचे माधव वझे काही म्हणतातही, पण त्यातही एक कलात्मक पातळी कुठेही सुटत नाही. विशेषतः व्यक्ती, घटना, प्रसंग यांच्याबद्दल आजचा माधव वझे शेरेबाजी करत नाही. लहानग्या श्‍यामचे तेव्हाचे समजून घेणे हेच कुठे कुठे अधोरेखित होते.

लोकांच्या मनात अजूनही माधव वझे म्हणजे आचार्य अत्रे यांच्या चित्रपटातला श्‍याम हे चित्र आहे. त्यातून घडणाऱ्या गंमती, मानसन्मानाचे प्रसंग, आ. अत्रे, वनमालाबाई यांचं नंतरच्या आयुष्यातलं स्थान याबद्दलची कृतज्ञता, आपलेपणा पुढच्या लेखात प्रसंगा-प्रसंगात व्यक्त झाला आहे.

साने गुरुजींनी श्‍यामची आई हे पुस्तक १९३३ मध्ये नाशिकच्या तुरुंगात पाच दिवसात लिहिले. या पुस्तकातल्या ४२ रात्रींमध्ये (प्रकरणे) लहानपणाच्या घटना, प्रसंग सानेगुरुजी सांगतात, पण तेवढेच नाही. त्या निमित्ताने त्यांनी काही भाष्य केलेले आहे. ते अत्यंत परिणामकारक आहे. सानेगुरुजींची भाषा आणि विचार अत्यंत परिणामकारक आहेत. ते केवळ रडायला लावणारे नाहीत. चित्रपट पाहूनही खूप लोकांना आपण किती रडलो हे सांगावेसे वाटते. या सगळ्याकडे माधव वझे वेगळ्या दृष्टीने पाहतात आणि अनेक प्रश्‍न वाचकांपुढे ठेवतात. हे पुस्तक मुलांसाठीचे आहे का? का मोठ्यांसाठी आहे? 

आचार्य अत्रे यांचा चित्रपट पूर्वार्धात सानेगुरुजींवर जे संस्कार भोवतालच्या सामाजिक, राजकीय घडामोडींचे होत होते त्याची दखल घेतो, पण उत्तरार्धात मेलोड्रॅमटिक होत जातो का? आईच्या मृत्यूनंतर सानेगुरुजी ज्या विस्तारित मातृत्व कल्पनेबद्दल जाणीव झाल्याची नोंद करतात त्यासाठी हा भोवताल आणि त्याचे संस्कार किती महत्त्वाचे आहेत? माधव वझे या शाळकरी बालकलाकाराला हे काम सहज जमले हा अपघात नसून त्यांची जडणघडण ज्या घरात, वातावरणात झाली तेही तितकेच महत्त्वाचे आहे.

त्यांच्या आईपेक्षा वडिलांकडून जे संस्कार झाले त्याचे महत्त्व खूप आहे. पालकांच्या आचार-विचारातली विसंगती मुलांना कळते. सानेगुरुजींच्या विचार-आचारात गांधीजींप्रमाणे अद्वैत होतं म्हणून सानेगुरुजी आधुनिक महाराष्ट्रातले एक मिथक ठरले. परंतु हे पुस्तक मुलांसाठीचे म्हणून त्यांना देऊन टाकून पालक दूर राहतील तर ती फसवणूक ठरेल. मुलांना वाचून ते कळणारही नाही. काही प्रसंगात रडायला येणे, डोळे भरून येणे हा संस्कार पुरेसा नाही. हे पुस्तक आधी मुलांच्या आई-वडिलांनी आत्मसात करायला हवे हाच माधव वझे यांच्यातील मोठ्या झालेल्या श्‍यामचा सांगावा आहे.

माधव वझे यांच्या संग्रहातील छायाचित्रांचा वापर करून रविमुकुल यांनी पुस्तकाची मांडणी केली आहे.

संबंधित बातम्या