जणू रिॲलिटी शोच!

आशा साठे
गुरुवार, 5 जुलै 2018

पुस्तक परिचय
माझे किहीम 

  •  लेखक ः मीना देवल
  •  प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे 
  •  किंमत ः १६० रुपये
  •  पाने : १२२

प्रत्येक काळात त्या काळाचे रंग घेऊन साहित्याचे वेगवेगळे आकृतिबंध निर्माण होत असतात. कथा, कविता, कादंबरी, आत्मकथन, अनुभव कथन, प्रत्येकाचं वेगळेपण आशयामुळे निर्माण होतं आणि लेखकामुळेही. मीना देवल यांचं ‘माझे किहीम’ हे पुस्तक वाचताना मला आजच्या काळातील ‘रिॲलिटी शो’ या प्रकारची झलक लेखनात जाणवत होती. अनेक घटना, प्रसंग, व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने एपिसोडमध्ये रंग भरत असतात. आणि काही वास्तव समोर येत जातं. ‘माझे किहीम’ या पुस्तकातही किहीम या गावाच्या निमित्ताने असं खूप काही घडलं बिघडलं समोर येतं. 

मुंबईतील देवल पती पत्नींनी अलिबाग जवळील किहीम हे समुद्रकिनारा असलेलं गाव सहज फेरफटका मारताना पाहिलं. डॉ. देवल यांना जाऊ तिथे जमीन खरेदी करावी असं नेहमीच वाटायचं. ते व्यवसायाने केईएममध्ये डॉक्‍टर होतं. डॉक्‍टर असूनही नोकरीच करणार असं लग्नाआधीच सांगितलेले होते. मीना देवल यांची त्याला हरकत नव्हती. त्यातून येणाऱ्या एका सुशिक्षित मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थितीलाही हरकत नव्हती. त्या प्रथम बीएआरसीमध्ये नोकरीत होत्या. मग फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन, स्त्री मुक्ती संघटनेचे प्रकल्प, सोबतच ‘मुलगी झाली हो’ नाटकाचे दोनशे प्रयोग. अशा त्यांच्या आयुष्यात अचानक नोकरी सोडल्यावर आलेल्या प्रॉव्हिडंट फंडातून काहीतरी गुंतवणूक करावी म्हणून त्यांनी किहीमच्या जमिनीची खरेदी केली. डॉक्‍टर पूर्ण हिंदवादी नव्हते, पण मीना देवलांची डाव्या विचारसरणीशी असलेली सलगीही पसंत नव्हती. किहीम येथे जमीन घेऊन घर करायचं, वाडी करायची, पुन्हा सगळं स्वतः जीव ओतून करायचं आणि गावाला आपलंस करायचं हे स्वप्न देवलांचे. तर मीनाताई इथल्या निसर्गाच्या, मुख्यतः तेव्हाच्या म्हणजे १९८६,८७ मधील स्वच्छ समुद्राच्या आणि किनाऱ्याच्या प्रेमात होत्या. आपल्याबरोबर आपल्या परिवारातील माणसांनाही हा आनंद घेता यावा ही त्यांची इच्छा होती. पण त्यासाठी घराची, वाडीची निगराणी हवी. त्याला पैसे हवे. मग येणाऱ्यांनी भाडं म्हणून थोडा आर्थिक भार उचलावा अशी ही किहीमची कहाणी सुरू होते. ‘घर पहावे बांधून’ अशा म्हणण्यात जे अनुभव लहान खेडेवजा गावातून येतात, भाबड्या समजुतींना तडे जातात ते इथेही आहे. गावातील लोक, वंदना आणि उमेशसारखी जोडली गेलेली माणसं, वाडीचं उत्पन्न, म्हैस खरेदी, फोन, विहिरीचा तिढा, पाहुणे, लाँचमधून केलेला प्रवास, त्यात भेटलेल्या व्यक्ती, डॉक्‍टरांचे भजनी मंडळ, असं सगळं पंधरावीस वर्षातील चित्र एखाद्या मालिकेसारखं मीना देवल समोर मांडून ठेवतात.

त्यांच्या शैलीला एक वेगळी खुमारी आलेली आहे. डॉक्‍टर आणि मीनाताई ही दोन अगदी भिन्न व्यक्तिमत्त्व. पण मध्यमवर्गीय विचारपणाने संसार-रथ चालू ठेवणारी. हळूहळू दुरावा निर्माण होणं आणि वाढणं अशा परिस्थितीत अपरिहार्य होतं. पण मीनाताईसारख्या स्त्री-मुक्ती विचारांचा आणि एकूण स्वातंत्र्य कल्पनेचा मूल्य म्हणून जाणीवपूर्वक स्वीकार केलेल्या आधुनिक स्त्रीचं एक चित्र या रिॲलिटी शोच्या वृत्तांतातून उमटत गेलं आहे. एकमेकांचे व्यक्तिमत्त्वाचे स्वतंत्र अवकाश हळूहळू दोघांनी स्वीकारले. त्याचा आदर केला आणि त्यामुळे होणारी चिडचिड, कुरकूर कमी केली. या प्रयत्नात खूप गमती जमती घडल्या. त्याही त्यांनी प्रांजळपणे मांडल्या आहेत. 

डॉक्‍टरांना तर किहीम हे माझे व्हावे किंबहुना किहीमने त्यांना माझे म्हणावे ही ओढ होती. किहीमने आम्हा दोघा नवराबायकोंना मनभेदापासून दूर राहायला अवकाश दिला. आणि व्यक्तिशः आपल्याला समृद्ध केलं हीच मीनाताईंची भावना आहे. तरीही खूप काळ हे सगळं झेपणार नाही हे ओळखून व्यवहारीपणाने पंधरा वीस वर्षांनी डॉक्‍टर अमेरिकेला गेले असताना हे ‘माझे किहीम’ म्हणजे ते घर व वाडी त्यांनी विकून टाकलं व झिराडला एक बंगलीवजा घर घेतलं.  हा सगळा रिॲलिटी शो त्यांनी शब्दात उतरवला. डॉक्‍टरांची मानसिक तयारी झाल्यावर प्रसिद्ध केला. शेवटी पु.ल. देशपांडे यांनी सुनिताबाईंचे लिखाण पास केले. तसेच मी करतो असा विचारही डॉक्‍टरांनी बोलून दाखवला. ‘माझे किहीम’ ही मीना देवल यांची अशी ही आजच्या युगातील वास्तव, सुख, दुःख, आनंदाची साठा उत्तरांची पाचा उत्तरी सांगितलेली खरी खरी कहाणी. 

संबंधित बातम्या