साने गुरुजींचे अनोखे कार्य

आशिष तागडे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुस्तक परिचय
 

आपणा सर्वांना साने गुरुजी माहीत आहेतच. त्यांचे कार्य, सामाजिक काम याबद्दल अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. साने गुरुजींच्या कार्याचा अनोखा धांडोळा हेरंब कुलकर्णी यांनी ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ या पुस्तकातून घेतला आहे. साने गुरुजींचे नाव उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर सहाजिकच ‘श्‍यामची आई’ हे पुस्तक किंवा चित्रपट येतो. परंतु साने गुरुजींनी ‘श्‍यामची आई’ व्यतिरिक्त एकूण ११३ पुस्तके लिहिली आहेत. आपल्या हे गावीही नसते. या पुस्तकातून साने गुरुजींच्या भावविश्‍वात आपल्याला जाता येते. हे पुस्तक साने गुरुजींचे चरित्र नसून त्यांच्या कार्याची एका शिक्षकाने घेतलेली दखल आहे. यासाठी हेरंब कुलकर्णी यांनी साने गुरुजींच्या जन्मठिकाणासह; त्यांनी जिथे-जिथे शिक्षक म्हणून काम केले, त्या शाळांना भेटी दिल्या. साने गुरुजींच्या जन्मगावी पालघरला वारंवार जाऊन त्यांनी साने गुरुजींचा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न पुस्तकातून दिसतो. आजही राज्यभरात साने गुरुजींबद्दल आकर्षण आहेच. यासाठी त्यांच्या ठायी असलेली निरागसता, त्यांनी स्वतः:मध्ये जपलेले लहान मूल हे जास्त कारण आहे. साने गुरुजींनी ५१ व्या वर्षीही ती निरागसता, कोमलता, संवेदना जपली. खरंतर साने गुरुजींना त्यामुळेच आजही मानले जाते. गुरुजींचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतानाची हेरंब कुलकर्णी यांनी सांगितलेली आठवण पुस्तकाविषयीच्या भावना व्यक्त करते. ते पु. ग. वैद्यांना भेटले आणि ‘मला राज्यभरातील शाळा पाहायच्या आहेत, तर मी काय बघू?’ असा प्रश्‍न केला. त्यावर वैद्य म्हणाले, ‘तिथल्या शिक्षकांना विचार, ढसाढसा रडलात, या घटनेला किती वर्षे होऊन गेली?’ हा प्रश्‍न खूप मोलाचा आहे. यामध्ये शिक्षकांमध्ये असलेली संवेदनशीलता अधोरेखित होते. साने गुरुजी मुलांसाठी रोज भित्तिपत्रके लिहीत. आजही परिस्थिती राहिलेली नाही. साने गुरुजींसारखी तळमळ शिक्षकांत आणायची कुठून या प्रश्‍नाने व्यतीत होऊन त्या अनुषंगाने साने गुरुजींचा शोध घेतला गेला आहे.

पुस्तकाची मांडणी दोन भागात केली आहे. पहिल्या भागात साने गुरुजी शिक्षक म्हणून कसे होते, त्यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कसा पुढाकार घेतला याचा वेध या पुस्तकातून चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. मुलांनी काय करावे, यासाठी गुरुजींची अपेक्षा वेधक शब्दात मांडली आहे. विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने योग्य काय याचा आढावा वेगवेगळ्या प्रकरणांतून घेतला आहे. 

दुसरा भाग अर्थातच शिक्षकांसाठी आहे. आजच्या काळात साने गुरुजींचे महत्त्व वेगवेगळ्या प्रकरणांतून अधोरेखित केले आहे. साने गुरुजी आणि संवेदनशीलता हे समीकरणच आहे. हा धागा पकडून गुरुजींच्या जीवनातील काही प्रसंगातून संवेदनशीलता कशी असावी, याचे मार्मिक भाष्य केले आहे. गुरुजींच्या काळातील आणि आजच्या काळातील संवेदनशीलता याची सांगड घालताना वस्तुस्थितीवर सडेतोड भाष्य केले आहे. गुरुजींची संवेदनशीलता किती उच्च दर्जाची हे सांगत असताना आताची परिस्थिती किती बिघडली आहे, याची जाणीवही करून दिली आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढले असताना समाजाची नैतिकता का घसरली? समाजातील संवेदनशीलता रसातळाला का जाते? याचे विवेचन केले आहे. शिक्षणाने साक्षरतेचे प्रमाण वाढले परंतु संवेदनशीलतचे काय? हा प्रश्‍न खूप काही सांगून जातो. सद्यःस्थितीत अनेक प्रश्‍न केवळ संवेदनशीलतेच्या अभावी निर्माण होत आहेत. संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी शाळांतून विविध प्रयोग केले पाहिजेत, याची मीमांसाही पुस्तकातून केली आहे. 

साने गुरुजी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जेवढे योग्य आहेत, तितकेच पालकांच्या दृष्टीनेही आहेत. आजचे पालकच दूरदर्शन, मोबाईल, संगणक गेम यामध्ये रममाण झाले आहेत. ते मुलांना काय सांगणार. मुलांवर संस्कार करण्यासाठी स्वतः: त्याप्रमाणे वागणे अपेक्षित असते. ‘श्‍यामची आई’ हे पुस्तक त्यामुळेच मुलांइतकेच पालकांसाठीही महत्त्वाचे आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तीनही घटकांवर एकत्रित सुसंस्कार करण्यासाठी ‘साने गुरुजी’ ही एकमेव योग्य मात्रा आहे. 
गुरुजींचे केवळ स्मरण करून उपयोग नाही, त्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. केवळ चर्चा करून उपयोग नाही, ती निष्फळ ठरू शकते, त्यासाठी प्रत्यक्ष आचरण करणे गरजेचे आहे. गंभीर सामाजिक परिस्थितीत शिक्षकांच्या माध्यमातून समाजात बदल घडून येऊ शकतात. समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुजींचे त्यांच्या मृत्यूनंतर ६५ वर्षांनी स्मरण समाजातील संवेदना जागृत करण्यासाठी उपयुक्त आहे.

संबंधित बातम्या