तीन पिढ्यांच्या पदार्थांचा ठेवा

आशिष तागडे 
सोमवार, 4 मार्च 2019

पुस्तक परिचय
 

सकाळी उठल्यावर घरातील बहुतांशी गृहिणींना ‘आज काय स्वयंपाक करायचा?’ हा मोठा प्रश्‍न असतो. कारण घरातील प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेऊन स्वयंपाक करणे भागच असते. त्याचबरोबर घरातील सदस्यांची हमखास एक फर्माइश असते, ती म्हणजे, ‘आज जरा वेगळं काही तरी कर.’ आता वेगळं म्हणजे काय हे सांगणार नाही. त्यामुळे गृहिणींनी खरी कसरत असते. याला मात्र हक्काचे उत्तर म्हणजे ‘मेजवानी व्हेजवानी’ हे ठरू शकते. अनुराधा तांबोळकर यांनी आजी आणि आईकडून वारशाने मिळालेला पारंपरिक खाद्य खजिना सर्वांसाठी खुला केला आहे. त्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्याकडे आजी, आईने सांगितलेल्या बहुतांश रेसिपी त्यांच्याकडे लिखित स्वरूपात आहेत. अशा एकूण ‘निवडक’ पाच हजार रेसिपींचा त्यांचा अभ्यास आहे. त्यावर त्यांनी दैनिकातून वर्षभर सदरही चालविली आहेत. त्यापैकी साडेतीन हजार रेसिपींचे दालन त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून खुले केले आहे. अर्थात रेसिपींची ही संख्या पाहता त्या एका खंडात बसणे केवळ अशक्‍यच. त्यासाठी त्यांनी ‘मेजवानी व्हेजवानी’चे दोन खंड केले आहेत. पहिल्या भागात फळे, फळभाज्या, सुकामेवा, मसाले, मुखशुद्धी, विडे यांची माहिती दिली आहे. तर दुसऱ्या भागात धान्य, कडधान्य, डाळी, पालेभाज्या, पाने, फुले, देठे त्याचप्रमाणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या रेसिपी दिल्या आहेत. 

रेसिपीचे पुस्तक म्हटल्यावर आपल्याला त्याचा ठराविक ढाचा समोर येतो. त्याला छेद देत यामध्ये एखादी  भाजी, फळ घेऊन त्यापासून किती आणि कोणत्या प्रकारच्या रेसिपी करता येईल, याची विभागणी केली आहे. उदाहरणार्थ कांदा घेतला तर त्यापासूनची भाज्यांसाठी ग्रेव्ही कशी करायची?, ओनियन सूप, चटणी-कोशिंबीर, याशिवाय कांद्यापासून वेगवेगळे स्नॅक्‍स म्हणजे कांद्याची करंजी, कांद्याचे वडे, ओनियन रिंग्ज्‌, कांद्यापासून होणाऱ्या विविध भाज्या, पराठा, वाळवण आदी विविध अंगांनी तपशीलवार लेखन केले आहे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. हल्ली अनेक घरातून स्वयंपाकासाठी लागणारा मदतीचा किंवा अनुभवी हात कमी होताना दिसत आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय नवदांपत्याचा तर ही खूप मोठी अडचण आहे. अशावेळी पदार्थ करत असताना त्याचे अचूक प्रमाण हे जमेची बाजू असते. या पुस्तकात ती खुबीने सांगितली आहे. त्यामुळे अगदी नवशिक्‍या व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष त्याला कोणताही पदार्थ हमखास जमणार अशी कृती आणि प्रमाण दिले आहे. घरातील अनेक जिन्नस म्हणजे धणे, नागकेशर, तमालपत्र, दगडफूल, कसुरीमेथी, जायफळ नवीन पिढीला माहीत नसतात. या जिन्नसांची केवळ ओळख नव्हे तर त्याचा वापर का आवश्‍यक आहे, याची परिपूर्ण माहिती दिली आहे. आपल्या जुन्या पारंपरिक गोष्टींच्या माहितीबरोबर टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप, बूस्टर सॉस, ग्रीन रेड करी, ब्रेडक्रम्स आदी आधुनिक गोष्टींची माहिती दिली आहे. आपले पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या पदार्थांना आधुनिकतेची फोडणी दिली आहे. त्यामुळे पुस्तकातील पदार्थ अधिक ताजे वाटतात.

 रेसिपी सहज वाचत राहिलो तरी, ‘अरे, हा पदार्थ एवढा सोपा आहे,’ हे भाव वाचणाऱ्याच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. पिझ्झा, बर्गरच्या दुनियेत आपले अनेक पदार्थ विस्मृतीत गेले आहेत, त्यांची आठवण या पुस्तकातून होत आहे. फक्त आठवणच होत नाही, तर ते पदार्थ करून पाहण्याचाही मोह होतो. अगदी पुरुषवर्गालाही हे पुस्तक वाचून एखादी रेसिपी भन्नाट जमेल. कुटुंबातील सदस्यांना खूष करण्यासाठी पुरुषांनी या पुस्तकातील रेसिपी ‘ट्राय’ करायला हरकत नाही. एखादा पदार्थ अधिक रुचकर होण्यासाठी काय करता येईल, याच्या अनुभवी ‘टिप्स’ही या पुस्तकातून दिल्या आहेत. त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. फक्त खाद्यपदार्थ कसे करायचे हे सांगणारेच हे पुस्तक नसून त्यातून आपल्या माणसाला खूष कसे करावे, याचे धडेही दिले आहेत. एखाद्या पदार्थ करताना आपण किती निगुतीने करतो, यावर त्याची चव अवलंबून असते. याचा वस्तुपाठ पुस्तकात आहे. 

संबंधित बातम्या