रवींद्रनाथांचा उमेदी प्रवास

दीपा देशमुख
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

पुस्तक परिचय
 

सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आशा साठे लिखित ‘शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ’ या पुस्तकाचं रवींद्रनाथ टागोर यांची गंभीर भावमुद्रा असलेलं संदीप देशपांडे यांचं मुखपृष्ठ वाचकाचं लक्ष वेधून घेणारं आहे. जागतिकीकरण, त्याचे दुष्परिणाम, बदललेली मानसिकता, आजूबाजूचं अस्वस्थ करणारं वातावरण, स्वार्थानं बदलत चाललेलं आणि ‘मी’च्या पुढं न सरकणारं जग; अशा वेळी माणसाजवळ शुभबुद्धी असेल, तर या अस्वस्थ विचारांमधून, उदासीमधून बाहेर काढायला रवींद्रनाथ टागोरांचे विचार मदत करतात. खरं तर शुभबुद्धी हा शब्द रवींद्रनाथ टागोरांचाच! या पुस्तकात रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मापासूनचा प्रवास अतिशय नेमक्या आणि नेटक्या शब्दांत लेखिकेनं रंगवला आहे, पण तो नेहमीच्या पठडीतला नाही. ललित अंगानं जाणारा हा प्रवास रवींद्रनाथांच्या विचारांना स्पर्श करत करत पुढं जातो आणि अस्वस्थ वाचकाच्या जगण्याची उमेद वाढवतो.

रवींद्रनाथ टागोरांच्या सुसंस्कृत घरातलं मोकळं वातावरण वाचकाला दिसतं. घरातला प्रत्येकजणच, कोणी तत्त्वज्ञ, तर कोणी गणिती, कोणी संगीतकार, तर कोणी आयसीएस अधिकारी असलेला बघायला मिळतो! तसंच त्यांच्या कुटुंबातल्या सर्वच व्यक्ती बुद्धिमत्तेबरोबरच गुणसंपन्न आणि अनेक कलांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्याही दिसतात. टागोरांना चौकटीतलं शिक्षण कधीच मानवलं नाही आणि त्यांनी अखेर शाळा सोडून दिली. त्यांच्या वडिलांनीही त्यांना त्याबद्दल कधीही फटकारलं नाही. आपल्या अनुभवांतून, निरीक्षणातून, वाचनातून त्यांनी स्वतःची अभ्यासपद्धती विकसित केली. केल्यानं देशाटन असं रामदासांनी म्हटल्यानुसार वडिलांबरोबर केलेला प्रवास आपल्याला किती समृद्ध करून गेला आणि त्यामुळं आपलं जग किती विस्तारलं याबद्दल टागोर वाचकांना सांगतात. 

लहान मुलांसाठी रवींद्रनाथांनी केलेलं लेखन आपल्या मनातलंही औत्सुक्य वाढवतं, पण त्याचबरोबर मुलांचं संवेदनशील मन, त्यांच्यातलं कुतूहल यावर प्रकाश टाकतं. त्यांच्या कथा आणि कविता यातून ते पालकांना त्यांनी मुलांच्या अंतरंगात डोकावून बघितलं पाहिजे, असं तळमळीनं सांगतात. मुलाचं शिक्षण मातृभाषेतच झालं पाहिजे याबद्दल ते आग्रही दिसतात. मातृभाषेवरून मुलाला जीवनाची खरी ओळख होते आणि त्याला चांगल्या तऱ्हेनं व्यक्त होता येतं असं ते म्हणत. मुलांच्या खोड्यांकडं बघताना आपण त्यांना मोठ्यांचं मोजमाप लावून का बघतो हा प्रश्‍न टागोर विचारतात. निसर्गाच्या सान्निध्यात राहून हसतखेळत वाढणारं मूल अनेक गोष्टी शिकत जातं, तसंच सहजगत्या त्याच्यात आलेल्या दोषांचाही निचरा या प्रवासात होत जातो, असंही रवींद्रनाथ म्हणतात. 

आशा साठेंनी ‘शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ’ या पुस्तकात रवींद्रनाथ यांच्या कविता आणि कथा यांचा विस्तृत आढावा घेतला आहे. त्यांची नाटकं, कथा, कविता, चित्रं, रवींद्र संगीत कसं कालातीत आहे हेही सांगितलं आहे. यातून मानवता, सत्याचा शोध घेण्याची त्यांची वृत्ती, स्त्री-सन्मानाची भावना अनेकदा व्यक्त होताना दिसते. याच पुस्तकात रवींद्रनाथांना साहित्याबद्दल मिळालेला (भारताला पहिल्यांदा मिळालेला) नोबेल पुरस्कार याबद्दलही आपल्याला वाचायला मिळतं. टागोरांनी उभारलेलं शांतिनिकेतन म्हणजे त्यांच्या सृजनशील विचारांची, त्यांच्या कल्पक कृतीची एक प्रयोगशाळाच होती. शांतिनिकेतनमध्ये जाणारा मुलगा साहित्य, कला, संस्कृती, कृती या साऱ्‍यांतून समृद्ध व्यक्तिमत्त्व घेऊनच बाहेर पडला पाहिजे असं टागोरांना वाटे.  

विद्यापीठ म्हणजे इथं लोकांना आपल्या बुद्धीची, विचारांची देवघेव करता आली पाहिजे आणि त्यातून मानवी स्वभावाच्या विविध छटा जाणता आल्या पाहिजेत. टागोरांचा विद्यार्थ्यांना स्वयंसिद्ध, समर्थ करण्यावर जास्त भर होता. बुद्धीनं विचार करण्याचा आळस करणं म्हणजे त्यांना ते एकप्रकारे पापच वाटे. शब्दभाषेबरोबर चित्रकला, रंगकला, संगीत आणि नृत्य यांचं महत्त्व ते जाणून होते आणि म्हणूनच आपल्या विश्‍वभारतीत त्यांनी कलाअभ्यासाला महत्त्वाचं स्थान दिलं होतं. टागोरांना राष्ट्रवादापेक्षाही मानवतावाद जास्त प्यारा होता. म्हणूनच त्यांनी केलेली विश्‍वभारतीची निर्मिती आपल्याला संपूर्ण विश्‍व हे एक कुटुंब आहे ही जाणीव करून देते.

याच पुस्तकातून रवींद्रनाथ जमीनदार असले, तरी त्यांचं सर्वसामान्य माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं बघायला मिळतं. तसंच रवींद्रनाथ टागोर यांचं आइन्स्टाईन, गांधीजी, सुभाषचंद्र बोस, जगदीशचंद्र बोस, शरदचंद्र चटर्जी, पं. नेहरू यांच्याबरोबरचं अकृत्रिम स्नेहाचं नातं याच पुस्तकातून आपल्यासमोर येतं. 

समानतेचा हक्क भीक मागून मिळत नसतो, तर तो स्वपराक्रमानं आणि स्वतःच्या प्रभावानंच मिळवायचा असतो, असं रवींद्रनाथ टागोरांनी परखडपणे सांगितलं होतं. माणसाचं मन आणि बुद्धी, स्वतंत्र आणि निर्भय असली पाहिजे याचा ते सतत आग्रह धरत. जात, धर्म, लिंग, गरीब-श्रीमंत, देश या सगळ्यांच्या पलीकडं गेलेला हा माणूस होता. आपण त्यांनी लिहिलेलं जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं. टागोरांच्या देशप्रेमाला दिलेली ही दाद आहे असं लेखिका म्हणते. कट्टर देशभक्त असणं, जमिनीच्या एका तुकड्यापुरतं संकुचित राहणं, यापेक्षा `विश्‍वचि माझे घर` ही संकल्पना त्यांचं आयुष्य कसं बदलून गेली हेही आपल्याला या पुस्तकातून अनुभवायला मिळतं.

रवींद्रनाथांची चित्रं, त्यांचं राजकारण आणि राष्ट्राविषयीचे विचार, त्यांची व्याख्यानं, त्यांच्या कथा आणि त्यांच्या कविता, त्यांची चित्रं, त्यांचं संगीत हे सगळं या पुस्तकात आशा साठे यांनी इतकं परिपक्वतेनं मांडलं आहे, की रवींद्रनाथांवरचा एखादा एक हजार पानी ग्रंथ वाचायचा, की १२८ पानं असलेलं रवींद्रनाथांच्या जगण्याचं सार असलेलं हे पुस्तक वाचायचं हा प्रश्‍न वाचकाला पडला, तर त्याचं उत्तर निर्विवादपणे ‘शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ’ असंच असेल. 

संबंधित बातम्या