समकालीन राजकारणाचा अन्वयार्थ

डॉ. रणधीर शिंदे
शुक्रवार, 18 मे 2018

पुस्तक परिचय
धुमाळी करंट - अंडरकरंट, 
लेखक : श्रीराम पवार
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे. 
किंमत : ३३० रुपये.
पाने : ३२० 

दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीतून ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीराम पवार यांनी लिहिलेल्या करंट - अडरकरंट या सदराचे ग्रंथरूप म्हणजे ‘धुमाळी करंट - अंडरकरंट’ हा ग्रंथ. भारतभूमीवर पराकोटीची सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता नांदत आहे. जीवनशैलींपासून अनेक बाबतीत ही विविधता आपल्याला दिसते. त्यातील राजकारण हा तर कळीचा मुद्दा आहे. समकालीन राजकारणाची वळणे आणि तीमधून प्रवाहित झालेल्या विचारधारांचे अन्वयार्थप्रधान विवेचन पवार यांच्या या ग्रंथात आहे. राजकीय विचारधारांच्या दृश्‍य-अदृश्‍य मितींचे स्वरूप या ग्रंथातून उलगडून दाखविले आहे. वर्तमान राजकारणाची पृष्ठभूमी हा या ग्रंथाचा केंद्रवर्ती विषय आहे. या काळातील काँग्रेस, भाजप, तसेच प्रादेशिक राजकीय पक्षांची वाटचाल, हस्तक्षेप यांची परखड मीमांसा आहे. प्रकाश पवार यांनी राजकारणाचे व्याकरण सांगणारा ग्रंथ म्हणून याचा उल्लेख केला आहे.

भारतीय राजकारण आणि समाजकारणाचा पोत २०१४ च्या निवडणुकीने आरपार बदलला. या ध्रुवीकरण काळातील राजकीय, सामाजिक धाग्यांची उकल पवार यांनी केली आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या तीन भागात हा ग्रंथ विभागला आहे. राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची चर्चा या ग्रंथात आहे. महाराष्ट्रातील आदर्श भ्रष्टाचार प्रकरणापासून युती व शेतकरी आंदोलनाबाबतचे विश्‍लेषण प्रारंभिक भागात आहे. समकालीन राजकारणाचे विहंगदर्शन घडवीत असताना या काळातील सत्ता परिवर्तनाची सखोल मीमांसा पवार यांच्या लेखनात आहे. ही चर्चा केवळ घटना, प्रसंग तपशिलांची नाही तर त्यामागे असणाऱ्या विस्तृत समाज - राजकारणाची दिशा आहे. भाजपची एकछत्री सत्तास्थापनेमागील व्यूहनीती, कमकुवत झालेला विरोध पक्ष आणि प्रादेशिक पक्षांची अस्मिता शोधाची धडपड या दृष्टीने समकालीन भारतीय राजकारणाचा परिप्रेक्ष्यात समजून घेण्यासाठी हे लेखन महत्त्वाचे आहे. या राजकीय परिप्रेक्ष्यात भारतीय समाजमनाच्या अनेक वाटांचे दिग्दर्शन केले आहे.

सकृतदर्शनी भारतीय राजकारणातील दृश्‍य स्वरूप हा केवळ हिमनगाचा भाग आहे. या हिमनगाखाली दडलेल्या असंख्य तत्त्वांचा शोध पवार यांनी घेतला आहे. समकालीन राजकारणाचा इथ्यर्थ शोधत असताना भारतीय लोकशाहीने या काळात घेतलेली वळणं, निवडणुकांचे समाजशास्त्र, सर्व तऱ्हेच्या तडजोडी, व्यक्तिकेंद्री घराणेशाही, राजकारणाची मध्यस्थी आणि नवहिंदुत्ववादी राजकारणाने व्यापलेले मंडल या संबंधी त्यांनी केलेले विवेचन फार महत्त्वाचे आहे. पवार एका मुद्याकडे वारंवार लक्ष वेधू इच्छितात. तो म्हणजे ‘प्रतिमारचित’ हे या काळाचे वैशिष्ट्य आहे. राजकीय पक्षांनी या काळात एकल नेत्यांची प्रस्थापना केली. छोट्या पडद्यापासून जाहिराती ते मुद्रित माध्यमांमधून या प्रतिमापटांचे अव्याहत झरे वाहतात. प्रतिमाचिन्हांचे गडद असे सावट समाजमनावर आहे. गोष्ट फुगवून सांगणं आणि ब्रेकअप न होणाऱ्या चित्रप्रतिमांचा वावर वाढला आहे. त्याचा फायदा राजकीय पक्षांनी घेतला. मुखवट्यांच्या या खेळात निवडणूकरूपी मॉलमध्ये सामान्यांच्या स्वप्नांची दुनिया हरवून गेली. या संदर्भात पवार यांनी केलेली परखड चिकित्सा महत्त्वाची ठरते.

या काळातील बिहार, उत्तर प्रदेश, तमिळनाडू व महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक पक्षांची रणनीती आणि त्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारातल्या अंतर्विरोधाची चर्चा आहे. तसेच या बहुविध देशातील छोट्या छोट्या राज्यांच्या समस्या तसेच काही प्रश्‍नही राष्ट्रीय राजकारणात कसे कळबिंदू ठरत आहेत त्याविषयी विवेचन आहे. ‘सब का साथ’ म्हणणाऱ्या पक्षाची ‘मन की बात’ काही वेगळीच आहे. मौनाच्या प्रदेशातील राजकीय इतिहासाचे गुंतलेल्या धाग्यादोऱ्याची उकल या ग्रंथात आहे. ‘आम्हाला मत देईल तो राष्ट्रभक्त’ अशी राष्ट्रवादाची व्याख्या या काळात घडत आहे. सद्यःस्थितीत प्रतिमानिर्मिती व प्रतिपक्षाचे प्रतिमाभंजन या दुविधेत अडकलेल्या भारतीय राजकारणाचा ओनामा पवार यांनी मांडला आहे. ग्रंथाच्या शेवटच्या भागात आंतरराष्ट्रीय विषयावरील लेखांचा समावेश आहे. विशेषतः मुस्लीम राष्ट्रातील दहशतवादासारखा विषय आणि सीमा प्रश्‍नांनी आकाराला आलेले आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयीचे लेख आहेत. राजकीय घडामोडीतील अनेक बारकावे पवार यांनी नोंदविले आहेत. या लेखनाचा आणखी एक विशेष म्हणजे प्रादेशिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या कार्यपद्धतीविषयी महत्त्वाची निरीक्षणे मांडली आहेत. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, नीतिशकुमार, लालूप्रसाद यादव, राजू शेट्टी व अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल मांडलेली निरीक्षणे महत्त्वाची ठरतात. बहुविधता विचारांतला आणि धोरणातला संघर्ष यात लोकशाहीचे मोठेपण आहे. मात्र ज्यावेळी त्याचा संकोच होतो त्यावेळी निर्माण होणारी आणीबाणीची लघुरुपे घातक ठरतात. असे या काळाचे त्यांनी केलेले वर्णन रास्तच ठरते. या प्रकारच्या मीमांसेमुळे या ग्रंथाला वेगळे महत्त्व प्राप्त होते. राजकारण व सत्ताकेंद्राने समाजकारणाला पोचविलेल्या परिणाम प्रभावामुळे जे बदल घडतात त्याच्या अनेक छटा या लेखनातून ध्वनीत झाल्या आहेत.

एकंदरीतच राजकीय पटलामागे असणाऱ्या जात, धर्म, घराणेशाही, सत्ताकांक्षा प्रत्यक्ष व्यवहार, व्यक्तिपूजा, प्रदेश अस्मिता या अंडर-करंटनी या काळातील राजकारण आकाराला आले याचा अन्वयार्थ पवार यांनी या ग्रंथाद्वारे मांडला आहे. भविष्यातील या काळातील राजकारणविषयक अभ्यासाची साधने या ग्रंथाने उपलब्ध करून दिली आहेत. आजच्या या भविष्याच्या राजकारणाच्या रंगपटाचे अंडरकरंटस सांगणारे हे विश्‍लेषक स्वरूपाचे लेखन आहे. भविष्यातील राजकारणाची पृष्ठभूमी ज्या काळाने नांगरली त्या काळाची पवार यांनी केलेली राजकारण मीमांसा महत्त्वाची आहे. त्यामुळे समकालीन राजकारणावर प्रकाशझोत टाकणारा हा मौलिक ग्रंथ ठरतो.

संबंधित बातम्या