बेलभंडारा...

डॉ. सागर देशपांडे
सोमवार, 9 ऑगस्ट 2021

पुस्तक परिचय

येत्या शुक्रवारी (ता. १३), नागपंचमीच्या दिवशी. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तिथीनुसार वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त ‘बेलभंडारा’ या त्यांच्या आठवणींच्या रूपातल्या चरित्राची कथा...

आता या घटनेला दहा वर्षे होतील. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अस्सल ‘महाराष्ट्ररसात’ सादर करून ८० वर्षे जगभर शिवघोषाचा अवघा हलकल्लोळ करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचे मी लिहिलेले ‘बेलभंडारा’ हे चरित्र प्रकाशित झाले. स्वतःलाच दिलेल्या वचनपूर्तीचा हा आनंद होता. 

राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्यापासून आचार्य प्र. के. अत्रे यांच्यापर्यंत आणि पु.ल. देशपांडे यांच्यापासून यशवंतराव चव्हाण- नानासाहेब फाटक अशा अनेकानेक दिग्गजांनी ज्यांच्या कर्तृत्वावर कौतुकाची मोहोर उठवली, अशा बाबासाहेबांचे आठवणींच्या रूपातले हे चरित्र. हा ‘बेलभंडारा' अनेक शिवभक्तांच्या साक्षीनं महाराष्ट्र देशी उधळण्याचे भाग्य माझ्यासारख्या एका सामान्य शिवभक्ताला लाभले याचा आनंद माझ्या मनाच्या छोट्याशा परडीत तेव्हापासून दुधासारखा उतू चालला आहे.

सुमारे चोवीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९७च्या सुमारास मी बाबासाहेबांना विनंती केली होती. ‘‘तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे इतके अद्‌भुत चरित्र साकारलेत. हजारोंच्या संख्येने जगभर शिवचरित्रावर व्याख्याने दिलीत. ‘जाणता राजा’सारखे जगातले दुसऱ्या क्रमांकांचे महानाट्य रंगभूमीवर आणलंत. बदलत्या काळाची साधने तुमच्या प्रतिभेच्या अनेक चॅनल्सनी अवगत केली. आता तुम्ही तुमच्या जीवनचरित्राची माहिती पुढच्या पिढ्यांना द्या. कारण तुमचा जीवनप्रवास हीदेखील प्रेरणेने आणि चैतन्याने रसरसलेल्या एका देशभक्ताच्या आयुष्याची शकावलीच आहे. पुढच्या तीन वर्षात तुम्ही हे काम सुरू करावे, याकामी मला तुमचा साहाय्यक व्हायला आवडेल,’’ असे हक्काने त्यांना सांगितले होते.

कारण बाबासाहेबांचा आणि आमच्या कुटुंबाचा स्नेह सुमारे पन्नास ते साठ वर्षांचा. माझ्या जन्मापूर्वीपासूनचा. माझे वडील सु.रा. देशपांडे आणि बाबासाहेबांचे मैत्र जुळले ते शिवभक्तीमुळेच. तोच भाग्यशाली वारसा मलाही लाभला. म्हणून मी वारंवार बाबासाहेबांना विनवत होतो, ‘‘बाबासाहेब, तुम्ही माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना ज्या ज्या आठवणी सांगता, त्या लिहिल्या गेल्या पाहिजेत. त्याला तुमचीच ऐश्‍वर्यवती लेखणी हवी. तुम्ही तुमच्या आयुष्याची बखर आम्हाला सांगा.’’ पण ते घडले नाही. म्हणून बाबासाहेबांनी त्यांचे चरित्र लिहायला मलाच परवानगी दिली. 

.... तेव्हापासून सुमारे अकरा वर्षे बाबासाहेबांशी बोलताना, त्यांच्याबरोबर गड-कोटांवर जाताना, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रवास करताना, त्यांची व्याख्याने, भाषणे ऐकताना, त्यांच्या सग्यासोयऱ्यांशी बोलताना, त्यांच्याविषयी यापूर्वी जे जे लिहून आले त्यातले निवडक काही वाचताना, विविध नियतकालिकांमधील त्यांच्याविषयीचा मजकूर चाळताना, जे जे समजत गेले - उमगत गेले ते ते कागदावर नोंदवू लागलो. हे काम अवघड आहे याची जाणीव होऊ लागली. पण त्याचवेळी बाबासाहेबांच्याच आशीर्वादाने ते प्रत्यक्ष साकारण्याचाही आत्मविश्‍वास वाटू लागला. एकतर बाबासाहेबांचे पुण्यातले, त्यांच्या निवासी वास्तव्य तसे कमीच. कारण अखंड भ्रमंती. पण ते ज्या ज्या वेळी असतील त्या त्या वेळी पहाटे चार, साडेचार, पाच वाजल्यापासून आमच्या गप्पांच्या प्रातःकालीन रागांच्या मैफिली पुरंदरे वाड्यावर रंगू लागल्या. माझे कान आणखी ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी तहानलेलेच होते. त्यांनीही आपल्या मनीचं गूज, आपल्या व्यथा-वेदना, आपल्या काळज्या, आपला आनंद, आपली कृतज्ञता, आपल्या महत्त्वाकांक्षा, आपले संकल्प हे सारं सारं आपल्याच नातवंडांना सांगावं इतक्‍या जिव्हाळ्याने अन्‌ आपुलकीनं मला सांगितलं. त्यात आडपडदा नव्हताच. आता त्यातून अधिक-उणे पाखडण्याची जबाबदारी माझी होती. तुळजापूरनिवासिनी आई भवानीमाता आणि जेजुरीचे खंडेराव ही बाबासाहेबांची आणि तमाम शिवभक्तांची कुलदैवते. त्यांचे सतत स्मरण करणाऱ्या शिवशाहिरांच्या आठवणींचा हा ‘बेलभंडारा’ ग्रंथस्वरुपात वाचकांसमोर यावा अशी अनेकांची इच्छा होती. त्याप्रमाणे घडले देखील!

शिवशाहिरांच्या आठवणींचा हा बेलभंडारा साकारताना त्यांच्याच भूमिकेच्या सावलीत मी वावरू लागलो. हा ‘बेलभंडारा’, हे चरित्र साकारताना मी अनेक मान्यवरांशी चर्चा करून हीच भूमिका ठरवली, की बाबासाहेबांच्या आयुष्याची प्रेरणादायी गाथा आजच्या पिढीसमोर, विशेषतः तरुणांसमोर यावी. याच कल्पनेनं हा ‘बेलभंडारा’ साकारण्याचा प्रयत्न केला. स्वतः बाबासाहेबांनी तो पाहिला आहे. आवश्‍यक तिथे दुरुस्त्याही केल्या आहेत. 

‘राजा शिवछत्रपती’ हा महाग्रंथ, ‘जाणता राजा’ हे महानाट्य आणि अन्य ग्रंथसंपदा, तमाम शिवभक्तांना राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून देणारी त्यांची प्रेरणादायी व्याख्याने ... या साऱ्या खटाटोपातून त्यांनी समाजात शिवप्रेमाचे एक बीज रुजवले. अनेक व्यक्‍ती, संस्था, प्रकल्पांच्या उभारणीमुळे हे बीज आज वटवृक्षाच्या स्वरूपात विस्तारल्याचे दिसते.  स्वतः बाबासाहेबांना जगभरातील दिग्गजांचा आत्मीय सहवास लाभला. बाबासाहेबांच्या अलौकिक प्रतिभेचा आणि वज्रलेपी शिवभक्तीचा आविष्कार तर जात, धर्म, भाषा, प्रांत, देश ओलांडून गेला आहे. प्रख्यात दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांना बाबासाहेबांचा परिचय करून देताना पं. हृदयनाथ मंगेशकर, अगदी निःसंकोचपणे लतादीदींसमोरच म्हणाले होते, ‘हे वक्तृत्वातील ‘लता मंगेशकर’ आहेत.’

अलीकडच्याच काही वर्षांपूर्वीची गोष्ट. 

उर्दू साहित्य परिषदेच्यावतीने सय्यद आसिफ नावाचे गृहस्थ बाबासाहेबांना भेटायला आले. त्यांनी ‘जाणता राजा’ हे महानाट्य उर्दू भाषेतून साकारण्याची इच्छा व्यक्त केली. बाबासाहेबांनी आनंदानं विनाअट ती देऊन टाकली. त्याचवेळी त्यांनी बाबासाहेबांना उर्दू साहित्य परिषदेचे मानद सदस्यत्वही बहाल केलं. बाबासाहेबांनी स्वतःहून स्वीकारलेल्या शिवकार्यासाठी घेतलेले अफाट कष्ट पाहिले, की हे सारे एका जन्मात कसे शक्‍य होईल, असाच प्रश्न पडतो. एकदा ते नाशिकच्या वाटेवर सायकलने प्रवास करत होते. एकटेच. मध्यरात्र झाली. शीणभार वाटल्याने शेतातच एका झाडाला सायकल बांधली अन्‌ इतिहासाचार्य राजवाड्यांची परंपरा सांभाळणारा हा संशोधक चक्क नांगरलेल्या शेतातील माती अंगावर ओढून निद्राधीन झाला. मातीशी नाते सांगणाऱ्या, महाराष्ट्ररसात शिवचरित्र सांगणाऱ्या बाबासाहेबांना आपल्या मातीची ऊब अधिक जवळची वाटली. आजही वाटते. 

बाबासाहेबांच्या अशा अनेक आठवणी, ज्या मी प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकल्या, अनुभवल्या त्या बाबासाहेबांच्या तपश्‍चर्येला साजेल अशा पद्धतीने वाचकांपर्यंत याव्यात, अशी माझी आणि तमाम शिवभक्तांची आग्रही इच्छा, बऱ्याच अंशी ‘बेलभंडारा’ या चरित्र ग्रंथामुळे पूर्ण झाल्याचं समाधान आणि आनंद फार मोठा आहे. ‘तुमच्या या बेलभंडाराशिवाय माझ्या आयुष्यात दुसरे आहे तरी काय?’ असे खुद्द बाबासाहेबांनीच मला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, मी भरून पावलो आहे.

बेलभंडारा

  • लेखक : डॉ. सागर देशपांडे
  • प्रकाशक : सह्याद्री प्रकाशन, पुणे
  • किंमत ः ₹   ६९९/-
  • पाने ः ३६६

संबंधित बातम्या