अर्थशास्त्राचे विचारमंथन

गणेश राऊत
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुस्तक परिचय
शाश्‍वत विकासाचे पंचघटक
 लेखक : डॉ. कैलास नरहरी बवले
 प्रकाशक : उषा-अनिल प्रकाशन, पुणे
 किंमत : २४० रुपये  
 पाने : २०८ 

श्‍वत विकासाचे पंचघटक हे डॉ. कैलास बवले यांचे पुस्तक वैश्‍विक ज्ञान, शासन, प्रशासन, उद्योगविश्‍व आणि ग्राम संघटन यावर आधारित आहे. या पाच विभागांमधून लेखकाने माणसांसमोरील आव्हानांचा आढावा घेतला आहे. या आढाव्याला ग्रामीण, महाराष्ट्रीय आणि भारत अशा मर्यादा घालण्याची गरज नाही. कारण वरील समस्या कमी-अधिक प्रमाणात सर्वच मानव जातीच्या समस्या आहेत.

बळीराजांचा बळी, ग्रामव्यवस्था दुबळी या पहिल्याच भागात लेखकाने ग्रामीण भागाचे वास्तव चित्र रेखाटले आहे. ग्रामस्वराज्य, ग्रामविकास, ग्रामोन्नती, अन्नसमस्या, स्मार्ट सिटी आणि ग्रामजयंती ते गांधी जयंती असा भाग चर्चिला आहे. शहरात राहणारांना कधी-कधी कल्पनाच नसते, की आपल्याभोवती किती समस्या आ वासून उभ्या आहेत. सध्या सगळ्या भारताला ग्रासणारा प्रश्‍न म्हणजे विषयुक्त अन्न हा आहे. यावर लेखक उपाय सांगताना शाश्‍वत, हरितक्रांतीचा आग्रह धरतो.

अर्थ उद्योगाचे समाजभान या भागात अर्थसाक्षरता, गावगाड्याचा अर्थसंकल्प याचा ऊहापोह करून लेखकाने उद्योगांच्या समाजभानाकडे लक्ष वेधले आहे. समाजकल्याणाकडून शाश्‍वत समाजाकडे या विषयावर टिप्पणी करताना लेखकाने केळकर समितीचा दाखला दिला आहे. जागतिकीकरण, सहकार व अर्थकारण हा भाग सध्याच्या काळातील अगदी महत्त्वाचा विषय आहे. काळा पैसा आणि अर्थक्रांती या विषयाला लेखकाने या भागात चर्चेला घेतले आहे. शाश्‍वत विकास तत्त्वविचार यात खेडे विकासाचा रचनात्मक कार्यक्रम सांगून महात्मा गांधीजींचे अर्थशास्त्र यावर भाष्य केले आहे. पुस्तकाच्या परिशिष्टात संदर्भ सूची दिली आहे. ती संदर्भासाठी अगदी योग्य आहे परंतु ती अधिक शास्त्रशुद्ध अगदी योग्य परंतु ती अधिक शास्त्रशुद्ध पायावर तयार करता आली असती. या योगे अभ्यासकांची सोय होते.

सर्वसामान्य वाचक आणि विद्यार्थी वर्ग डोळ्यासमोर ठेवून लेखकाने पुस्तकाची रचना केली आहे. कोणत्याही लेखमालेचे पुस्तकात रूपांतर करताना काही काळजी घ्यावी लागते. कुशल संपादकांचा हात त्यावरून फिरणे आवश्‍यक असते. अन्यथा वृत्तपत्रातील सुटे आणि तात्कालिक संदर्भ असणारे लेख पुस्तकरुपात वाचायला घेतले, की रसभंग होतो. पुस्तकात सलगतेची वा एकमेकांना जोडणाऱ्या दुव्यांची गरज असते. यातच अर्थशास्त्र विषय असेल तर अधिकच काळजी घ्यावी लागते. गेली पन्नास वर्षे प्रश्‍न अधिकच जटिल होत चालले आहेत. उत्तरे शोधण्याची गरज अधिकाधिक वेगाने निर्माण होत आहे. अर्थशास्त्र हे अन्य सर्वच शास्त्रांचा पाया आहे. तेव्हा त्यावर अधिक विचारमंथन होणे आवश्‍यक आहे.

संबंधित बातम्या