जन, निर्जन आणि अभिजन

जयदेव डोळे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुस्तक परिचय
जन ठायी ठायी तुंबला
 लेखक : विनय हर्डीकर
 प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ
 किंमत : ४०० रुपये  
 पाने : ३४४ 

भारताच्या राजकारणात स्पष्ट, रोखठोक, परखड बोलणे मना आहे. जे राज ठाकरे सारखे स्वतःला असे बोलणारे समजतात ते त्यांच्या भाषणातील व राजकारणातील व्यक्तीसारखेच वागत असतात. फक्त त्यांनी ते जाहीर बोलून संधी साधली असते. म्हणून कित्येकदा भारतीय राजकारण स्थिर तरी आहे किंवा चक्राकार फिरते आहे जाणवत राहते. विषय आणि वक्ता यांच्या जागा बदलतात. द्विपक्षीय राजकारणात असेच होत असते. फिर्यादी-आरोपी बदलत जातात अन्‌ विषय पुन्हा तेच येत राहतात. मग राजकीय भाषा असते कशी? जनतेच्या, मतदारांच्या नावे करावयाचे राजकारण उखाळ्यापाखाळ्या अन्‌ उणीदुणी यात संपून जाते. तर्क, वास्तव, इतिहास, पुरावे, संख्या, उदाहरणे, संकेत वा परंपरा अशा अनेक गोष्टींचा भुगा म्हणजे राजकारणाची व राजकारण करणाऱ्यांची भाषणे. मोदी व शहा यांची भाषणे म्हणजे या भुग्याचा ठिगाराच. विनय हर्डीकर यांची तारीफ स्पष्टवक्ता, परखड बोलणारा व कान पकडून चार गोष्टी सुनावणारा अशी केली जाते. ते लेखनही तसेच करतात. तशा त्यांच्या लिखाणाचे ‘जन ठायी ठायी तुंबला’ या संग्रहातून आपल्याला बऱ्यापैकी ज्ञान होते. फरक असा, की नेत्यांची भाषा कार्यकर्ते व आम जनता यांच्यासाठी असल्याने आणि स्वपक्षाचा प्रचारच तो असल्याने त्यात अतिशयोक्ती, वक्रोक्ती यांचा वावर फार असतो. राजकारण सामान्यांना समजावून सांगू पाहणाऱ्यांना हे अलंकार वगळून भाषा वापरावी लागते. लोकशाहीत प्रक्रिया उघड करून सांगाव्यात लागतात. पत्रकारिता त्यासाठी असते. राजकारणातील घटना, वक्तव्ये, सोबती अन्‌ हितसंबंध यांची संगती लावण्याचे काम पत्रकारांकडे आले असते. त्यातून वाचक, प्रेक्षक आपली राजकीय आवडनिवड पक्की करतात. अथवा बदलून टाकतात. हर्डीकर प्रचारक पत्रकार आहेत. आपण काँग्रेस विरोधक आहोत हे त्यांच्या सुरवातीच्या लेखातच आले आहे. ‘भाजपला मोठी संधी मिळाली आहे. हे सरकार यशस्वी व्हावे अशीच माझी मनापासून इच्छा आहे. हे जर अयशस्वी झाले तर पुन्हा नेहरू-गांधी घराणं देशाच्या बोकांडी बसणार आहे.’ असा कबुलीजबाबही ते देतात. १९८९ पासून भारताचा पंतप्रधान नेहरू घराण्यातील झालेला नाही. म्हणजे गेली २९ वर्षे जे घडलेच नाही त्याचा धाक हर्डीकर का घालतात? गेली २० वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी मात्र हे घराणे आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग होते. तरीही घराणेच म्हणायचे? सत्तासूत्रे कोणाच्या हातात नेमकी असतात हे हर्डीकर लोकशाहीचा अभ्यास करून सांगत नाहीत. अशी अनेक उदाहरणे त्यांचे लेखन देते. तटस्थपणा त्यांच्याकडून अपेक्षित नाही. अभ्यासू निष्कर्ष आणि प्रगल्भ सूचना जरूर त्यांनी द्याव्यात. नाहीतर असे म्हटले पाहिजे की वाचकांच्या मनातील पूर्वग्रह बळकट करणारे लेखक म्हणजे हर्डीकर!

त्यांनी त्यांचा वाचक आपल्या सारखाच विचार करतो हे जाणले असल्याने त्यांचे लेखन चाकोरीबंद व मागणी तसा पुरवठा करणारे होत जाताना दिसते. भाजप व मोदी यांचीही अवस्था साचल्यासारखी झाल्याचे ते स्पष्ट करतात. मग ही टीका सुधारणा अपेक्षिणारी आहे. काँग्रेसवर जसे ते तुटून पडतात तशी नाही. काँग्रेस आणि भाजप असा विभागच या पुस्तकात आहे. ‘पंतप्रधान झोकात...संसद धोक्‍यात...!’ असा या विभागाचा शेवट करणारा लेख म्हणजे त्यांचे एक अप्रतिम भाषण होय. संदर्भ, आकडेवारी, ऐतिहासिक दाखले आणि लोकशाही राजकारणाच्या काही ठोस परंपरा यातून हर्डीकर या संग्रहातील एक उत्कृष्ट विचारप्रवाह आपल्याला बहाल करतात. मुख्य म्हणजे संसदीय राजकारणावर मोदी व भाजप यांनी ओढवलेले संकट असा एक बुलंद पाया त्यांच्या या विचाराला आहे. एरवी त्यांच्या अनेक लेखांना आपल्या संविधानातील मूल्यांचा आधारच नसल्यासारखे वाटते, तसे या लेखाचे वाटत नाही. हर्डीकर सत्तेच्याच राजकारणात खूप रस घेतात. मात्र सत्ता कशासाठी, कोणत्या मूल्यांसाठी, अशी चर्चा त्यांच्याकडून हवी असताना ते फक्त डावपेच, आखाडे, भूमिका एवढ्यापुरतीच चौकट बहुतेक लेखांना देऊन जातात. गडहिंग्लजचा हा त्यांचा वाचिक आविष्कार खरोखर समृद्ध आहे. तो प्रबोधनही करतो आणि सावधही! बाकी संसदीय विरोधक मोडून काढले तर पक्षांतर्गत विरोधक जन्म घेतात असा काँग्रेसचा राजकारणातील अनुभव ते भाजपलाही येईल असे बजावतात. त्यासाठी गुजरातच्या पटेलबाईंच्या मुख्यमंत्रिपदाचे उदाहरण देतात. नुकतीच ९९ जागा जिंकून सत्ता कशीबशी स्वतःपाशी राखण्याची पराकाष्ठा भाजपला गुजरातेत करावी. मात्र ती पक्षांतर्गत नाराजीमुळे की जनता, मतदार, समाज यांच्या दृष्टीतून राजकारण फार थोडे सापडते. त्यांची मते वृत्तपत्रे, टीव्ही या माध्यमांवर बेतलेली असतात. त्यामुळे तिथे उमटलेलेच राजकारण हर्डीकर सांगत बसल्यासारखे वाटते. केवळ अभ्यास, वाचन, तर्क, अंतदृष्टी यावर राजकीय भाष्ये करणे कधीकधी लटके वाटते. ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ अशा भूमिकेमुळे हर्डीकर भाजप, शेतकरी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापाशी ‘थिंक टॅंक’ म्हणून स्थान मिळवू पाहतात आणि तिन्ही ठिकाणी त्यांना होकार मिळत नाही. यामागील कारण जनसामान्यांत नसलेली त्यांची उठबस हेच आहे असे त्यांनी या संग्रहात अप्रत्यक्ष सांगून टाकले आहे. म्हणून ते संसदीय राजकारणात प्रभाग, विधानसभा, संसद असा प्रवास (शाळकरी वयाचे असतानाच) करण्याचे ठरवूनही करू शकले नाहीत, अशी खंतही बोलून दाखवतात.

‘शरद पवार आणि त्यांचे राजकारण’ असा चार लेखांचा एक विभागही या संग्रहात आहे. जगन फडणीस यांनी लिहिलेले नि गायब झालेले पवारांवरील पुस्तक कुठे अन्‌ हे चार लेख कुठे! हर्डीकर व्यक्तींवर लिहिणारे एक अव्वल व्यक्तिचित्रणकार आहेत. तसा एक ‘व्यक्ती आणि विचार’ असा विभागही येथे आहे. पण पवारांच्या धोरणमीमांसेविना वा आर्थिक हितसंबंधांविना त्यांचे राजकारण विशद करता येत नाही. या चारही लेखात तसे काही नाही. मुख्य म्हणजे जातींचा संदर्भ हर्डीकरांच्या लिखाणाला वर्ज्य आहे की काय? त्यांना सामाजिक मुद्यांत मुळीच राजकारण आढळत नाही की काय? त्यामुळे होते असे, की हर्डीकर प्रसंगी कठोर परीक्षण करतात, राजकीय कोलांटउड्याची व्यवस्थित निंदा करतात; परंतु ती केवळ नैतिक, नैष्ठिक पायावरुन! सत्तेच्याच राजकारणाचे चिंतन करताना त्याला नीतिमानतेने जोखणे म्हणजे व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षा न ओळखणे. सत्तेच्या राजकारणाकडे स्वयंसेवकाच्या नजरेतून पाहणे हा एक भाबडेपणाच. नाही तरी आज अनेक स्वयंसेवक सत्तास्थाने भूषवीत असताना भ्रष्टाचार, अन्याय, नागरिकांच्या समस्या, स्त्रियांवरील अत्याचार घटताना जसे अनुभवास येत नाही तसे त्याविरुद्ध कडक कारवायाही होताना दिसत नाही. योगी मुख्यमंत्र्यांच्या कारभाराची उत्तर प्रदेशात गुंडांनी, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पुरती वाट लावली आहे. नैतिकांचे राज्य झुंडशाहीला कसे काय स्फूर्ती देऊ शकते बरे? जॉर्ज फर्नांडिस यांची व्यक्तिनिष्ठ मीमांसा करता करता हर्डीकर समाजवादी पक्ष व चळवळ यांचीही करतात; पण जात-धर्म-लिंग वगळून (हर्डीकरांची अवघी समीक्षा पुरुषी वाटते. या पुस्तकात राजकीय स्त्री, राजकारणातील स्त्रिया याबद्दल एकही लेख नाही.) जातीची गणिते मांडून समाजवाद्यांनी समाजवादाचा खूनच पाडला असे हर्डीकर लिहितात. आज भाजप तेच करत सुटला आहे. छोट्या व दुर्बल जाती संघटित करून त्यांना सत्तेजवळ आणणे हे राजकारण नाही की काय? उच्चवर्णीयांची सत्ता हिसकावणे हा सामाजिक कार्यक्रम नसतो की काय? 

भांडवलशाही, जमीनदारी, मक्तेदारी, नवभांडवलशाही हे भेद हर्डीकरांच्या विवेचनात अजिबात नसतात. लोकशाही समाजवाद जसा ते एका लेखात मोडीत काढतात तसे भांडवली अर्थव्यवस्था आणि त्यावर उभे असलेले राजकारण त्यांना मुळीच बोचत नाही. म्हणून शेतकरी संघटनेने उधार घेतलेला जुना स्वतंत्र पक्ष त्यांना ‘स्वतंत्र भारत पक्ष’ या नात्याने प्रिय आहे. पण तोही मातीत मिसळल्याचे त्यांच्या ध्यानात नसावे. हर्डीकरांचा सारा रोख भारताचे संविधान ज्या मूल्यांवर उभे आहे ते मानणाऱ्या राजकारणावर असतो. त्या पक्षांवर असतो. हर्डीकर समाजवाद धिक्कारणाऱ्या शेतकरी संघटनेत बरीच वर्षे होते. संविधानातून तो शब्द घालवण्याचे शरद जोशी यांचे जाहीर आवाहन असे. समाजवादाला सोबत म्हणून येणारे मग लोकशाही, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष, सामाजिक न्याय, विशेष संधी, एकात्मता, यांच्याविषयी चीड असण्याची काय गरज? जोशी यांचे एकारलेले नेतृत्व व एकांडे राजकारण हेच शेतकरी संघटनेचे विश्‍लेषण असायला हवे होते. पण ४ लेखांच्या ‘शेती आणि समाज’ या विभागात त्यांनी त्यावर थोडक्‍यातच लिहिले आहे. शेती प्रश्‍नांचा त्यांचा अभ्यास व तोडगे उत्तमच आहेत. पण परत तोच मुद्दा. ते सारे मनावर कोण घेणार? जे राजकारण आणि राजकीय नेते व पक्ष गाडी रुळावर आणू शकतात ते तर सारे काँग्रेस वळणाच्या विचारांचे वाहक आहेत. शेती समस्यांकडे शहरी सुशिक्षित मध्यमवर्ग दुर्लक्ष करतो म्हणून हर्डीकर त्याला रागावतात खरे, मात्र त्याच वर्गाच्या जाणीवांमधून राजकारणाकडे स्वतः बघत राहतात. हा विरोधाभास झाला. ‘मी शेतकऱ्यांचे जीवघेणे वैफल्य दूर व्हावे म्हणून पुन्हा देशांतर्गत आणीबाणी जाहीर करा म्हणतो आहे. कारण या आणीबाणीमुळे योग्य पावले उचलली जातील व देश वाचेल, असा माझा ठाम विश्‍वास आहे’ हे वाक्‍य म्हणजे त्या मध्यमवर्गीय जाणिवेचा कळस. आणीबाणी या घटनादत्त उपायांचा इंदिरा गांधींनी दुरुपयोग केला हे पक्के माहीत असताना ‘संकटकालीन सुटकेचा मार्ग’ म्हणून तो निरुपद्रवी असेलच याची हमी कोण देणार? बरीचशी सत्ता शेतकऱ्यांच्या लेकरांच्याच हाती असूनदेखील... बाकी हर्डीकर शरद जोशींचे थोडे दोषही दाखवून देतात हे प्रशंसनीय आहे. 

भारताला स्वातंत्र्य मिळाले ते ब्रिटिशांची राज्य करण्याची राजकीय-आर्थिक-प्रशासकीय ताकद उरली नाही म्हणून; स्वातंत्र्य चळवळीच्या दबावामुळे नव्हे, असे ठाम मत हर्डीकरांचे आहे. जे घडले ते ‘सत्तांतर’ होते, सत्ताहरण नव्हते, असे त्यांना वाटते. असेच मत गोळवलकर गुरुजी यांचेही आहे. त्यामुळेच की काय सत्तेच्या राजकारणात लोक, जनता, पब्लिक यांचा मोठा सहभाग असतो यावर ‘एलिटस्ट’ हर्डीकरांचा कमी विश्‍वास दिसतो. म्हणूनच स्वातंत्र्य चळवळीशी निगडित काँग्रेस व नेहरू परिवार यांचे ते प्रशंसक नाहीत. त्यांचा ‘जनता विकासाला महत्त्व देते, आयडिऑलॉजीला नाही हे विधान बालिश आहे’ हा लेख बिगर काँग्रेसवादाचा सविस्तर आढावा घेणारा आहे. त्यातून विचारसरणीचा त्यांचा आग्रह व्यक्त झाला आहे व तो बरोबरच आहे. तत्पूर्वी नेने व संन्याल यांच्यावरील लेखातही ते याचा ऊहापोह करतात. तरुणांनी हे दोन्ही लेख अवश्‍य वाचावेत. त्यातून त्यांच्या राजकीय जाणिवा नक्कीच विकसित होतील. 

‘जोडोनिया धन। चतुर वेव्हारे’ हा लेख शैली, अभ्यास व निष्कर्ष यामुळे छान झाला आहे. व्यापार, उद्योगधंदे, व्यवसाय यांचा गुजरातपासून हर्डीकरांनी घेतलेला वेध अर्थशास्त्राच्या प्राध्यापकालाही लिहिणे जमले नसते इतका उत्तम आहे. पुस्तकाच्या शेवटी हर्डीकरांचे स्वतःबद्दल ‘बहुत पाया, कुछ खोया’ असे चिंतन छापले आहे. साहित्य, संगीत, राजकारण, अध्यापन, शेती, उदोयग, सेवाकारण, क्रीडा आदींत अभ्यासू व जाणकार म्हणून वावरणारे हर्डीकर येथे नेहमीच्या रोखठोक भाषेत व्यक्त होतात. विचारक तसा एकांतप्रिय असतो. गोतावळ्यात तो फार रमू शकत नाही. अभ्यासकाला तर गर्दीत गुदमरते. तरीही शेतकरी संघटनेस त्यांनी अनेक वर्षे दिली. अभ्यासक, विचारक, चिंतक यांची आंदोलने  व चळवळी यांना गरज असते. पण अखेरीस असा बुद्धिमान माणूस व लोकनेता यांच्यात स्पर्धा सुरू होते व चिंतक-तत्त्वज्ञ मागे पडतो हे राजकीय वास्तव हर्डीकर नेमके मांडतात. त्यात स्वतःलाही ते जोडून घेतात. आपले काही चुकल्याचे सांगतात. इतर कसे चुकले हे सांगता सांगता स्वतःचे कबुलीजबाबही द्यायचे असे विरळ उदाहरण म्हणजे हे लिखाण होय. ते आवर्जून वाचावे असेच आहे. राम जगताप यांनी त्याची मांडणी व प्रस्तावना, लेखन केले असून त्यातील हर्डीकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा ऊहापोह मांडणी व प्रस्तावना लेखन वाचकाला अजून प्रगल्भ करतो.

संबंधित बातम्या