प्रतिभावंत सासूचा मनोहारी वेध 

डॉ. माधवी वैद्य 
सोमवार, 16 मार्च 2020

पुस्तक परिचय
 

वीणा संत यांनी लिहिलेले ‘आक्का मी आणि...’ हे पुस्तक हाती आले आणि ते संपूर्ण वाचल्याशिवाय बाजूला ठेवताच आले नाही. याचे कारण या पुस्तकाचा विषयच जरा अनोखा आहे. अनोखा अशा दृष्टीने, की हे पुस्तक आपल्याला लेखिकेबद्दल तर सांगतेच, पण या लेखिकेच्या जिव्हाळ्याच्या एका व्यक्तीविषयी आणि त्या अनुषंगाने - अनेक विषयांबद्दलही बरेच काही सांगून जाते. ही जिव्हाळ्याची व्यक्ती आहे, एक अतिशय मान्यता पावलेली मराठीतील एक प्रतिभावंत, मनस्वी, संवेदनशील कवयित्री - इंदिरा संत! मग अर्थातच या कवयित्रीविषयी लिहिणारी लेखिका वीणा संत यांचे सासू-सुनेचे नातेही आपल्याला पुस्तकाचे वाचन करण्यासाठी अधिक खुणावत राहते. सासू आणि सून हे भारतीय कुटुंबव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचे, संमिश्र सूचन करणारे एक गुंतागुंतीचे नाते आहे. या नात्याविषयी खूप काही सांगणारे विविधांगी लेखन मराठीत झालेले आहे. आता या प्रतिभावंत सासूविषयी त्यांच्या सूनबाई म्हणजे वीणा संत काय सांगतात, याविषयी आपल्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण होते आणि आपण पुस्तक उघडतो. 

देवापुढे एखादी निरांजनाची वात शांतपणे तेवत राहावी आणि तिच्या प्रसन्न, स्निग्ध, प्रेमळ भासणाऱ्या प्रकाशात सर्व घर नांदते राहावे असेच संतांचे घर होते, ही या पुस्तकातील पानापानावर आपल्या मनावर गोंदून जाणारी गोष्ट आहे. ही कवयित्री मनाने जितकी प्रांजळ तितकीच या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारी लेखिकाही प्रांजळ. दोघींनीही एकमेकींना, एकमेकींच्या भावभावनांना समजून घेत आपल्या जीवनाची वाटचाल कशी कृतार्थतेने केली, याचा सुंदर आलेख या पुस्तकात वाचायला मिळतो. एकदा आक्कांना एका मुलाखतीत एक प्रश्‍न विचारला गेला होता, ‘कवितेने तुम्हाला पैसा, प्रसिद्धी, मानमरातब... सारे काही दिले, तुम्ही कवितेला काय दिले?’ आणि इंदिरा संतांनी म्हणजे आक्कांनी उत्तर दिले होते, ‘कवितेला मी माझे आयुष्य दिले.’ तसेच जर वीणाला कुणी विचारले, ‘सासू-सुनेचे हे नाते जपण्यासाठी तू काय काय दिलेस?’ तर कदाचित तिच्याकडून उत्तर येईल, ‘हे नाते अधिक सुंदर करण्यासाठी मी माझे सुंदर, प्रामाणिक मन संतांच्या घराच्या उंबरठ्यावर ठेवले.’ एका प्रतिभावंत सासूची इतकी आच ठेवून तिने आयुष्यभर देखभाल केली, त्यांना प्रत्येक पावलावर मायेने साथ दिली. याचे उत्तर आक्कांनीही तिला फार अनोख्या पद्धतीने दिले. त्या स्वतः अबोल होत्या, फार बोलत नसत, पण आपल्या साहित्याचे सर्व हक्क त्यांनी वीणाच्या हाती बहाल केले. हे मला वाटते मराठी साहित्यविश्‍वातील एक अतिशय विरळा उदाहरण असावे. म्हणजे सुनेशी या सासूबाईंची प्रेमाची वीण, नाते किती घट्ट आणि ऋण असावे, याचे दिग्दर्शनच आक्का या आपल्या कृतीतून करतात असे वाटते. 

अगदी लहान वयातच वीणाताईंनी संतांच्या घरात प्रवेश केला. ते घरही बेळगावात. पुण्याच्या संस्कृतीत वाढलेली एक मुलगी बेळगावला इतक्‍या दूर आणि वेगळ्या सांस्कृतिक वातावरणात जाते आणि त्या घराला आपले सर्वस्व देते. त्या घरातील जगण्या-वागण्याची, बसण्या-उठण्याची रीत सांभाळते आणि तिथलीच होऊन जाते, ते दोन कारणांनी त्यांना शक्‍य झाले. एक म्हणजे आपल्या सासूचे निर्व्याज प्रेम आणि नवऱ्याची अबोल साथ. रवी संत हे अबोल, पण अत्यंत संवेदनशील. आक्काही तशाच अबोल पण संवेदनशील आणि शिवाय एक मान्यवर कवयित्री म्हणून समाजात दबदबा असणाऱ्या. वागण्या-बोलण्यात साधेपण जपणाऱ्या, तरीही मनाने आणि आचरणाने कणखर व सुस्पष्ट असणाऱ्या, वलयांकित असूनही ते आपले वलयांकित असणे फारसे न जपणाऱ्या, अशा या व्यक्तिमत्त्वाला आधी समजून घेणे कठीण. मग त्यांना साथ देणेही तसे अवघडच आणि त्यांचे प्रेम काळजात अत्तरासारखे जपून ठेवणे आणि त्याविषयी कृतज्ञ राहणे ही तर सर्वात अवघड गोष्ट. पण वीणा संत या सर्व पायऱ्या ओलांडून त्यांच्या सासूच्या मनाच्या फार जवळ गेलेल्या दिसतात. म्हणूनच अनेक गोष्टी समजून घेताना न बोलताच एकमेकींच्या मनात येण्याची अनोखी किमया त्यांनी साधलेली, हे या पुस्तकात अनेक उदाहरणांवरून दिसून येते. 

या पुस्तकाचा गाभा म्हणून आक्का मध्यवर्ती ठेवत त्यांच्या विविध आठवणींनी आणि प्रसंगातून एक भावपूर्ण गोफ विणण्याचा प्रयत्न वीणा संत करतात. पतीनिधनाने जीवघेणे दुःख सोसताना त्यांची कागदावर उमटलेली अक्षरे जपण्याकडे जसा त्यांचा कल आहे, तसेच पतीनिधनानंतर आपली लहान मुले सांभाळताना असणारी एक दक्ष, प्रसंगी कर्तव्यकठोर मातेचेही दर्शन त्यांना झालेले आहेत. त्यांची विलक्षण साधेपणाने जगण्यात ते सौंदर्य टिपण्याची रीतही लेखिका इथे रंगवते. त्यांचे प्राण्यांवर असणारे प्रेम, नोकरी करतानाचा प्रामाणिकपणा, कौटुंबिक नातेसंबंध जपणारे मन, मुलांविषयी वाटणारा मनाचा हळवा कोपरा आणि नातवंडांविषयी वाटणारा एका आजीचा जिव्हाळा सारे सारे वीणाताईंनी बारीक-सारिक प्रसंगांतून आपल्या समोर साक्षात उभे केले आहे. आक्काचे गंधवेडे मन जसे या पुस्तकात आपल्या समोर येते, तसेच त्यांची संशोधक वृत्ती, घरात आलेल्या पाहुण्या-रावळ्यांच्या आवडी-निवडी जोपासणे, अनेक प्रतिभावंत व्यक्तींचा त्या घरात असणारा मेळावा, त्यांची योग्य अशी विचारपूस घेणारे त्यांचे गृहकृत्यदक्ष मन साऱ्या साऱ्याची ओळख आपल्याला करून देण्यात वीणा संत खूप यशस्वी झाल्या आहेत. प्रथितयश लेखक ना. सी. फडके त्यांच्या पत्नी कमलताई आणि त्यांचा परिवार यांचे नाजूक नातेसंबंधही त्यांनी फार मनोज्ञ भावाने रेखाटलेले आहेत. आपले लेखन व्यवहार सांभाळताना, पत्रव्यवहार सांभाळताना, त्यांची एक कवयित्री म्हणून काय पद्धत होती या विषयीही वीणाताई बरेच सांगून जातात. 

वीणाताई एके ठिकाणी लिहितात, ‘आक्कांनी भावी सून म्हणून मला पाठवलेल्या पहिल्या पत्रात सायलीचा झुबका पाठवला होता. त्या फुलांना मी सुकू दिलं नाही (असंही म्हणावंसं वाटतं मला. त्या नात्यालाही वीणाताईंनी सुकू दिलं नाही.) फुलं वाळली, तरी बकुळीच्या फुलांसारखा निदान त्याचा सुगंध तरी टिकावा असं मी पाहिलं... म्हटलं तर नाजूक, म्हटलं तर टिकाऊ असं हे नात्याचं फूल!’ 

असे खरेच झालेले दिसून येते. आक्कांच्या शेवट शेवटच्या काळात वीणाताईंनी त्यांना फार जपले. साऱ्या घरादारानेच फार जपले. तो आक्कांच्या आयुष्यातला कसोटीचा प्रवास त्यांच्यासकट साऱ्यांनाच जीवघेणा होता. ते सर्व वर्णन वाचताना आपलेही मन गलबलून आल्याखेरीज राहत नाही. पण अशी अवस्था कधीना कधी येणारच म्हणून तेव्हाही मन आवरणे आवश्‍यकच असते. 

आयुष्यातल्या चांगल्या काळाचे स्मरण ठेवून त्या लिहून जातात. ‘खऱ्या अर्थाने ते (सुरुवातीचे दिवस) माझ्यासाठी मंतरलेले होते, भारलेले होते आणि मी त्या मंत्रमुग्ध अवस्थेतून बाहेर आले नाही. त्या दिवसांची मोहिनी अजूनही माझ्या तनमनावर आहे. मला मुळी त्यातून बाहेर यायचंच नाही.’ 

खरोखर असे हृद्य नाते जपणाऱ्या, सांभाळणाऱ्या त्या दोघींना मनःपूर्वक अभिवादन आणि आमच्या हाती या भावना मोकळेपणी व्यक्त केल्याबद्दल अभिनंदन!

संबंधित बातम्या