तुमसे अच्छा कौन है...
पुस्तक परिचय
शम्मी कपूर ः तुमसा नहीं देखा
लेखक ः रौफ अहमद
अनुवाद ः मुकेश माचकर
प्रकाशक : इंद्रायणी प्रकाशन, पुणे
किंमत ः ३२५
पाने : ३०४
कपूर घराण्याचा वारसा सांगणारा चेहरा व व्यक्तिमत्त्व लाभलेला, मात्र अभिनय आणि नृत्याचा वेगळाच बाज घेऊन आलेला शम्मी कपूर सत्तरच्या दशकात तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला होता. याचं कारण होतं त्याची अभिनय, विनोद व नृत्याची एकमेवाद्वितीय शैली. प्रत्येक गाण्यामध्ये नृत्याच्या वेगळ्या स्टेप सादर करणारा, हॉलिवूडच्या नायकासारखा दिसणारा, नृत्याबरोबर चित्रपटातील संगीत आणि विनोदावरही काम करणाऱ्या या कलाकाराचा रंजक प्रवास लेखक रौफ अहमद यांनी नेटक्या शब्दांत मांडला आहे.
शम्मीचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांची नाट्य व सिनेसृष्टीतील कारकीर्द सुरू झाली होती. वडिलांची नाटके पाहण्यात, त्यांच्याबरोबर दौरे करण्यात शम्मीचं बालपण गेलं. वडीलबंधू राज कपूर यांनी मात्र सिनेमाचा मार्ग पत्करला होता. शम्मीला नाटकांमध्येच रस होता. तारुण्यात प्रवेश केलेल्या शम्मीच इमेज गुलछबू, पार्टी करण्यात मश्गूल असलेल्या व अनेक मुलींशी नाव जोडलं गेलेला अशी झाली होती. दिग्दर्शक महेश कौल यांनी (राज कपूरचा भाऊ असल्यानंच) शम्मीला पहिला चित्रपट दिला. मात्र, त्याआधी पी. एन. अरोरा दिग्दर्शित व नायिकेच्या भूमिकेत मधुबाला असलेला ‘रेल का डिब्बा’ या चित्रपट १९५३मध्ये प्रदर्शित झाला, तर त्याच वर्षी कौल यांचा ‘जीवन ज्योती’ही प्रदर्शित झाला. मात्र, हे दोन्ही चित्रपट अपयशी ठरले. या चित्रपटांत काम करून मिळालेल्या पैशातून शम्मीनं आपली पहिली गाडी खरेदी केली व त्याची ‘गुलछबू’ प्रतिमा अधिकच गडद होऊ लागली. तो मधुबालाच्या प्रेमात पागल झाला होता. शम्मी मधुबालाबद्दल म्हणतो, ‘ती श्वास रोखायला लावण्याइतकी सुंदर होती. वो जब पानी पीती थी तो ऐसा लगता था जैसे गले के नस से पानी नीचे जा रहा है..’ (मधुबाला मात्र दिलीपकुमारच्या प्रेमात होती आणि शम्मीनं तिला थेट मागणी घातल्यावर तिनं ती खट्याळपणे फेटाळली होती.) शम्मीला या काळात चित्रपट मिळत होते, मात्र त्या काळात यशाच्या शिखरावर असलेल्या राज कपूर यांच्याशी त्याची तुलना होत होती व याच कारणामुळे त्याचे चित्रपट तिकीट बारीवर अयशस्वी ठरत होते. ‘लैला मजनू’, ‘खोज’, ‘गुल सनोबर’, ‘मेहबूबा’, ‘टांगेवाली’, ‘मेम साहिब’ असे त्याचे तब्बल सतरा चित्रपट साफ कोसळले होते. शम्मीची कारकीर्द संपल्यातच जमा होती.
याच काळात त्याच्यापेक्षा वयानं मोठी असलेली, परिपक्व नायिका गीता बाली शम्मीच्या आयुष्यात आली. शम्मीनं तिला अनेकदा लग्नाची मागणी घातली, मात्र ती नकारच देत होती. २३ ऑगस्ट १९५५च्या संध्याकाळी ती शम्मीकडं आली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या आत लग्न करणार असल्यास मी तयार असल्याचं त्याला सांगितलं. दोघं विवाहबद्ध झाले आणि शम्मीचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. ‘‘काळ बदलतोय आणि नव्या पिढीला नवा, अधिक आधुनिक, अधिक आक्रमक नायक पाहायला आवडेल,’’ असा सल्ला देत गीतानं शम्मीला अभिनयाचा बाज बदलायला सांगितलं, सुदैवानं प्रसिद्ध दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी देवआनंदसाठी पटकथा लिहिलेल्या ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटात काम करण्यास त्यानं काही कारणानं नकार दिला. ही भूमिका आता शम्मीकडं चालून आली. १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं कमाल केली. मग शम्मीनं मागं वळून पाहिलंच नाही. ‘दिल देके देखो’, ‘कॉलेज गर्ल’, ‘जंगली’, ‘बॉयफ्रेंड’, ‘दिल तेरा दिवाना’, ‘चायना टाऊन,’ ‘प्रोफेसर’, ‘ब्लफ मास्टर’पासून ‘प्यार किया तो डरना क्या‘ ‘जानवर’, ‘तिसरी मंझिल’ असे अनेक सुपरहिट चित्रपट शम्मीनं दिले. मधल्या काळात पत्नी गीताचं निधन झाल्यानं शम्मीला नैराश्यानं ग्रासलं, मात्र त्यातून सावरत तो नीलादेवी यांच्याशी विवाहबद्ध झाला. त्यानंतरही त्यानं काही हीट चित्रपट दिले.
लेखकानं शम्मीचा जीवनपट मनोरंजक शैलीत मांडण्यासाठी प्रत्येक प्रसंगासाठी काही आठवणी व इतर कलाकारांच्या शम्मीबद्दलच्या आठवणींचा मागोवा घेतला आहे. हे करताना काही ठिकाणी मूळ प्रसंगातून लक्ष विचलित होतं व वाचनात व्यत्ययही येतो. ‘जंगली’तील ‘याहू’ गाण्याच्या चित्रीकरणाचा प्रसंग, नवख्या नायिकांची शम्मीबद्दलची मतं किंवा शम्मीला असलेलं संगीताचं ज्ञान याबद्दलचे किस्से वाचनीय झाले आहेत. मुकेश माचकर यांचं प्रवाही भाषांतर आणि काही ठिकाणी नोंदविलेली आपली मतं पुस्तकाला अधिक वाचनीय बनवतात.