स्वागतशील शहरांचा वस्तुपाठ 

पराग पोतदार 
सोमवार, 17 जून 2019

पुस्तक परिचय
 

आपले शहर उत्तम असावे, ते नुसते राहण्यालायक असावे असे नाही; तर आपण अभिमानाने इतरांना सांगावे असे तिथे राहणाऱ्या प्रत्येकच नागरिकाला मनापासून वाटत असते. शहरात वास्तव्य करताना मात्र शहराला उत्तम म्हणावे तर कशाच्या आधारावर, हा प्रश्‍न पडल्याखेरीज राहात नाही. कारण वास्तवातील अनेकानेक गोष्टी, समस्या चांगल्या शहराच्या कल्पनेला छेद देत असतात. त्यातून शहर स्मार्ट करायचे म्हणजे निव्वळ तंत्रज्ञानाच्या मदतीने सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्या असा एक चुकीचा अर्थ रुजल्याने ‘स्मार्ट शहरे’ या संकल्पनेचेच नीटसे आकलन झाले नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच मग कचऱ्याचा प्रश्‍न असो वा मग शहरातील वाहतूक कोंडीची समस्या असो, नदीपात्रातील स्वच्छता असो किंवा मग सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न असो, सांस्कृतिक ठेवा असो किंवा ऐतिहासिक संचिताची जपणूक असो या सगळ्याच पातळ्यांवर शहरांचा श्‍वास घुसमटताना दिसतो. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर लोकप्रतिनिधींची शहर विकासात असणारी भूमिका, त्यांची बांधिलकी, त्यांचे योगदान आणि त्यांची याप्रती असणारी आत्मीयता हे सारे मुद्देही विचार करायला भाग पाडतात. त्यामुळेच बार्सिलोना हे युद्धात होरपळून निघालेले शहर जेव्हा सर्वोत्तम शहर होण्याचा ध्यास घेते आणि एका उत्तम लोकप्रतिनिधीच्या कृतिशील निर्धाराची त्याला साथ मिळते, तेव्हा शहर सर्वार्थाने बदलते आणि शहर नियोजनाच्या दृष्टीने एक नवा आदर्श वस्तुपाठ प्रस्थापित करते. याच सगळ्याचा वेध ‘तुम्ही बी घडा ना’ या अंतोनी व्हिवस यांनी लिहिलेल्या पुस्तकातून अत्यंत सुंदर पद्धतीने घेण्यात आला आहे. शहरे स्वागतशील करण्याच्या दिशेने पाऊल टाकताना बार्सिलोनाच्या रूपाने ते प्रत्यक्षात साकारण्याचा हा प्रवास आवर्जून वाचावा असा आहे. नगरनियोजन तज्ज्ञ व अभ्यासू लेखिका सुलक्षणा महाजन व लेखिका करुणा गोखले यांच्या सहज व ओघवत्या शैलीतून हा अनुवाद सुरेख उतरला आहे. बार्सिलोना या शहराला सर्वोत्तम शहर करण्याचा ध्यास घेतलेल्या एका राजकारण्याचे, लोकप्रतिनिधीचे हृद्य मनोगत आणि त्याचे शहरनियोजनाविषयीचे चिंतन नकळतपणे आपल्याला आपल्या शहरांशी त्याची तुलना करायला लावते. 

लोकनियुक्त प्रतिनिधी हेच कुठल्याही शहराचे शिल्पकार असतात, हा विचार केंद्रस्थानी ठेवून या पुस्तकातील पान न्‌ पान उलगडत जाते. युद्ध, स्थलांतरितांचे लोंढे, आर्थिक संकटे या साऱ्यात होरपळून निघालेले शहर म्हणजे बार्सिलोना होय. या शहराला असणारे भविष्यातील धोके आणि आव्हाने यांचा वेध घेऊन आपले शहर सर्वार्थाने ‘स्मार्ट’ आणि ‘सर्वोत्तम’ करण्याचा ध्यास घेऊन अंतोनी व्हिवस हा राजकारणी सज्ज झाला. नुसती आश्‍वासने देत न बसता त्याने ते प्रत्यक्षात साकारून दाखवले. हा सारा शहराच्या जडणघडणीचा आणि जपणुकीचा प्रवास अगदी सुरुवातीपासून समजून घेण्यासारखा आणि वाचण्यासारखा आहे. राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे आणि नगर नियोजनाच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरावे असे आहे. लोकप्रतिनिधींची शहराप्रती असणारी कर्तव्ये, भविष्यवेधी आवश्‍यक असणारी दृष्टी आणि तत्पर कृतिशीलतेचा व निर्णयक्षमतेचा जाणवणारा अभाव पाहता भारतामध्ये शहरनियोजनाच्या प्रती असणारा प्रगल्भ नेतृत्वाचा अभाव या निमित्ताने अधोरेखित झाल्याखेरीज राहात नाही. त्याचप्रमाणे एखादे शहर स्मार्ट होत असताना नकळतपणे आपल्याकडील परिस्थितीशी त्याची तुलना केल्याशिवाय राहवत नाही. 

शहरे ही सर्जनशीलतेस ऊर्जा पुरवणारी केंद्रे असतात, हे लक्षात घेऊन शहरांकडे पाहण्याची एक सजग दृष्टी देण्याचे काम हे पुस्तक निश्‍चितपणे करते. स्पेन हा त्या अर्थाने अतिप्रगत किंवा श्रीमंत देश नाही अगर बार्सिलोना हे विलासी शहर नाही. असे असतानाही सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक वैशिष्ट्यांसह शहर नियोजन कसे करायचे असते याची एक विलक्षण दृष्टी या पुस्तकाच्या रूपाने शहरविकासाचा प्रवास पाहताना मिळत जाते. अगदी छोटे उदाहरण सांगायचे झाले, तर बार्सिलोनातील झोपडपट्ट्यांमधून लोकांना स्थलांतरित करून त्यांचे पुनर्वसन करताना त्या ठिकाणी सजग दृष्टी कशी असते याचे प्रत्यंतर नियोजनकर्त्यांनी दाखवून दिले आहे. जगभरातील देशांमध्ये स्थलांतरित लोक झोपडपट्ट्यांतून कसे जगतात आणि त्यांचे जीवन कसे असते हे लक्षात राहावे म्हणून त्याचे एक आगळेवेगळे संग्रहालय साकारण्यात आले आहे. 

या साऱ्याचा केंद्रबिंदू असणारा लेखक अंतोनी हा नागरिक, स्थानिक प्रशासन, शहरे आणि सामाजिक रचना यांचा एक जागतिक तज्ज्ञ आहे. भारताशी, तिथल्या शहरांशी त्याचे जिव्हाळ्याचे नाते आहे. बार्सिलोना साकारताना त्याचा परिसस्पर्श उपमहापौराच्या भूमिकेतून त्याने दिलेला आहे. एकविसाव्या शतकात शहरांचा विकास करायचा असेल, तर तो कोणत्या दिशेने आणि कसा असावा याचा वस्तुपाठ अंतोनीने बार्सिलोनाच्या रूपाने घालून दिला आहे. तसेच शब्दरुपात तो मांडून त्याने हा सारा प्रवास जगासमोर आणला आहे. त्याने शहराचे दहा सिद्धांत मांडून शहरनियोजनात त्याचा वापर करण्याविषयी सुचवले आहे. 

बार्सिलोना - एक रोमन शहर ते स्मार्ट शहर हा प्रवास इतका सुंदर आहे, की आपण वाचताना त्या प्रवासाचे साक्षीदार असल्यासारखे वाटत राहते. बार्सिलोनाचे नियोजन, ग्लोरियास प्लाझाचा कायापालट, नवनिर्मिती आणि उत्पादक संघ, स्मार्ट सिटी कशी उभारावी, लोकसहभाग, प्रयोग, शहरे आणि वेडे पीर, ऊर्जा-इंधन स्वातंत्र्य, उद्यमशील शहर, तंत्रज्ञान म्हणजे काय हे सारे विस्ताराने लिहिलेले भाग म्हणजे शहरनियोजनाचा राजमार्गच आहे. एका शहराच्या कायापालटाचा प्रवास, शहरनियोजनाची नवी दृष्टी देऊन जातो. अंतोनी हे स्मार्ट सिटीचे सल्लागार म्हणून काम पाहात असल्याने शेवटचे एक प्रकरण ‘एक दृष्टिक्षेप पुण्यावर’ असेही देण्यात आले आहे. पुण्यातील नियोजनाचाही वेध त्यातून अभ्यासपूर्ण पद्धतीने घेण्यात आला आहे.     

संबंधित बातम्या