सर्पविश्वात रमलेला अवलिया

पराग पोतदार
सोमवार, 24 मे 2021

पुस्तक परिचय

चाळीसगावात राहणारे राजू देसले यांचा जीवनपट उभा करीत असताना गरिबीने उभी केलेली खडतर परिस्थिती, आर्थिक विपन्नतेशी करावा लागणारा झगडा आणि एकीकडे वन्यजीव आणि सापांविषयी वाढत असलेली ओढ आणि त्या सर्वांतून त्यांनी केलेली समाजजागृती या सगळ्यांचा पट ‘रंगुनी रानात साऱ्या’ या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतो.

अनेकदा माणसे धोपटमार्गाने जगत राहतात आणि वेगळ्या वाटा धुंडाळण्याचे धाडस करीत नाहीत. काही माणसांचा मात्र रक्तगटच वेगळा असतो. त्यांच्या जीवनाचे ध्येयच जणू काही वेगळे असते आणि त्यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य वाहून घेतलेले असते. अनेक प्रतिकूलतांवर मात करीत आणि प्रसंगी जिवावर बेतले तरी त्या विषयातील त्यांची ओढ जराही कमी होत नाही. याचे मूर्तीमंत असे उदाहरण म्हणजे राजू देसले नावाचा सर्पप्रेमी अवलिया. लेखिका मृणालिनी चितळे यांनी त्यांचे आगळेवेगळे आणि धाडसी आयुष्य अतिशय समर्पक शब्दांतून उभे केले आहे. 

अगदी बालपणापासून वन्यजीवांविषयी असणारे कमालीचे कुतूहल पुढे जाऊन जीवनध्यास होईल अशी कल्पना खुद्द राजू देसले यांनीही कधी केली नसेल. पण कुतूहल लहानपणी स्वस्थ बसू देत नव्हते. प्रत्येक वन्यजीव जवळून पाहावा, समजून घ्यावा असे वाटायचे. घरातील सर्वांच्या नकळत हे प्राणीप्रेम विकसित होत होते. अपवाद होता तो फक्त आजीचा. आजीला सगळे माहीत होते तरीही आजीने आपल्या नातवाच्या या आगळ्या वेगळ्या आवडीला कधीही मुरड घातली नाही आणि त्यातून देसले यांचे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व साकारत गेले.

प्राणीविश्‍वाची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने प्राणीविश्व जवळून अनुभवावे असे त्यांना वाटले. वन्य प्राण्यांची शिकार आदिवासी कसे करतात आणि कसे 

राहतात हे समजून घेण्यासाठी राजू चक्क त्यांच्यात जाऊन राहिले. त्यांच्यातले वाटावे म्हणून त्यांच्यासारखे कपडे परिधान करून जगू लागले. इतकेच काय उंदराची, डुकरांची शिकार करायला शिकले आणि हळूहळू खायलासुद्धा शिकले! आदिवासी समाजातील अनेक प्रथा परंपरा त्यांना या निमित्ताने समजल्या. आदिवासी समाजातील काही 

लोक उत्पन्नाचे साधन म्हणून घुबड पाळतात. त्या घुबडांना रात्रीच्या वेळी टी आकाराची काठी करून त्यावर बसवतात. हे घुबड रात्रीच्या वेळी शेतात घुसणारे उंदिर मारून खातात. त्यांनी उंदिर खाल्यानंतर केलेली उलटी किंवा उंदरांच्या तुटलेल्या शेपट्या यावरून किती उंदिर मारले हे ठरते व त्यानुसार आदिवासींना त्याचा मोबदला मिळत जातो अशी विलक्षण माहिती या निमित्ताने राजू यांना समजत गेली.

पुढे पुढे सापांविषयीची ओढ वाढत गेली. सापांविषयी भीती म्हणून कधी नव्हतीच. पण हळूहळू त्या विषयात अभ्यास होत गेला. विषारी साप, बिनविषारी साप असे प्रकार लक्षात येत गेले. लोकांच्या मनात सापाविषयी किती भीती असते आणि किती प्रकारचे गैरसमज जोपासलेले असतात हेही त्यांच्या लक्षात येत गेले. अगदी सुरुवातीला लहानपणी अनेक साप घरात आणून बरण्यांमध्ये ठेवायचे.  सापांविषयीच्या ओढीने तर त्यांना सापांकडे इतके आकर्षित केले, की कुठेही साप सापडला की राजू देसले यांना बोलावले जायचे. त्यामुळे सर्पमित्र ही त्यांची ओळख निर्माण झाली. आसपासच्या गावांतून लोक मदतीला बोलावू लागले. रुग्णालयांमध्ये सर्पदंश झालेले रुग्ण यायचे तेव्हा अज्ञानातून किंवा गैरसमजुतीतून कितीदा लोकांच्या प्राणावर बेतते याची कल्पना राजू यांना येत गेली. त्यातून समाजात याविषयी जागरुकता किती आवश्यक आहे याची जाणीव होत गेली.

सापांच्या सहवासात राहत असताना एकदा नागाच्या दंशाने अगदी मरणाच्या दारातून हा माणूस परत आला. त्याची संपूर्ण कहाणी वाचताना आपल्याही अंगावर शहारा येतो. त्याही परिस्थितीत जेव्हा शुद्धीवर आले आणि जिवात जीव आला तेव्हा त्या नागाचे काय झाले, तो सुरक्षित आहे का हा पहिला प्रश्न त्यांनी विचारला होता. यावरून राजू देसले यांच्या सर्पप्रेमाची आणि प्राणीविश्वाविषयीच्या तळमळीची कल्पना येते.

या सगळ्या सर्पप्रेमातूनच पुढे जीवनदिशा सापडत गेली. सापांविषयी लोकांच्या मनात असणारी अंधश्रद्धा, त्यातून पाळल्या जाणाऱ्या चुकीच्या प्रथा, सापांविषयीच्या भीतीतून त्यांना मारण्याचे होणारे प्रकार, अनेक ठिकाणी गावागावांत पसरलेल्या अंधश्रद्धा या सगळ्यांतून एक सामाजिक जाणीव विकसित होत गेली आणि त्यांनी या विषयात स्वतःला वाहून घेतले. या सगळ्यातून एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व

आकाराला आले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि नरेंद्र दाभोळकरांच्या संपर्कात आल्यानंतर तर जीवनाला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला. सर्पांच्या माध्यमातून आणि इतर अनेक कारणांनी ज्या अंधश्रद्धा पसरवल्या जातात. त्या अंधश्रद्धांतून ग्रामीण भागात किती नुकसान होते याविषयीची माहिती त्यांना मिळत गेली. असे अनेक भोंदू बाबा आणि त्यांच्या करामतींमधील फोलपणा उघड करून लोकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम त्यांनी सुरू केले. लोकांमध्ये मिसळून त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करून त्यांना अधिक डोळस करणे आणि गैरसमजांना खतपाणी न देणे यावर विशेषत्वाने काम सुरू केले.

कौटुंबिक पातळीवर पैसा कधीही फारसा नव्हता. त्यामुळे परिस्थिती हालाखीचीच होती. काडी काडी जमवून त्यांनी घर साकारले. मात्र या प्रवासात त्यांच्या पत्नीने त्यांना अतिशय सुरेख साथ दिली आणि जिद्दीने त्यांच्या पाठीशी कायम उभी राहिली. त्यामुळे त्यांच्या सहजीवनातील एक हळवा कोपराही या निमित्ताने उलगडत जातो.

राजू देसले या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. वाचताना आपण त्यात रंगून जातो. त्यात अनेक प्रसंग गंमतीशीरसुद्धा आहेत. नवीन माहिती देणारे आहेत. त्यामुळे सर्पमित्राच्या पुस्तकात असे काय वेगळे असणार या कल्पनेला छेद देणारे आणि एक वेगळा वाचनानंद मिळवून देणारे असे हे पुस्तक साकारलेले आहे. राजू देसले या सर्पविश्वात आणि वन्यजीवांमध्ये रंगलेल्या

या अवलियाचा जीवनप्रवास त्याच्यासमवेत रानावनांत फिरून लिहिलेला असल्याने एक रसरशीत जीवनपट आपल्यासमोर निश्चितपणाने उभा राहतो.

रंगुनी रंगात साऱ्या - राजेश ठोंबरे : सखा वन्यजीवांचा

  • लेखिका : मृणालिनी चितळे
  • प्रकाशन : राजहंस प्रकाशन, पुणे
  • किंमत : ३२० रुपये
  • पाने ः  २५६

संबंधित बातम्या