बदलत्या समाजाचे अचूक चित्रण

प्रतिमा दुरुगकर
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018
  • धोक्यात हरवणारी वाट
  •  लेखक ः मंगला गोडबोले
  •  प्रकाशक : सकाळ पेपर्स प्रा. लि., पुणे 
  •  किंमत ः १६० रुपये.
  •  पाने : १३६ 

‘धोक्‍यात हरवणारी वाट’ हे सदर मंगला गोडबोले यांनी सकाळ साप्ताहिकमध्ये सुमारे दीड वर्षे लिहिले. त्यातील निम्म्या लेखांचे संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. सकाळ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे.

  • धोक्यात हरवणारी वाट
  •  लेखक ः मंगला गोडबोले
  •  प्रकाशक : सकाळ पेपर्स प्रा. लि., पुणे 
  •  किंमत ः १६० रुपये.
  •  पाने : १३६ 

‘धोक्‍यात हरवणारी वाट’ हे सदर मंगला गोडबोले यांनी सकाळ साप्ताहिकमध्ये सुमारे दीड वर्षे लिहिले. त्यातील निम्म्या लेखांचे संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. सकाळ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे.
समकालीन समाज, त्यातही स्त्रीजीवन - कुटुंबजीवन - नातेसंबंध- बदलते बाह्य जग यांचा तिरपा व मिस्कील छेद लेखिकेची लेखणी नेहमीच घेते. धोक्‍यात हरवणारी वाट या सदरात लेखिकेने १९९२ नंतर झालेले जागतिकीकरण - खासगीकरण, त्यानंतर आलेले मुक्त व्यापक जग आणि त्यातील समाजजीवनात झालेले बदल टिपले आहेत. वरवर छोट्या वाटणाऱ्या घटनांमध्ये लेखिकेला पुढची धोक्‍याची वाट दिसली. समाजाला काही व्याधी चिकटताना दिसल्या. समाजाचा चेहरा डागाळताना दिसला. समाजचिंतकाच्या भूमिकेतून लेखिकेने या सदरातून भाष्य केले आहे.

रोजच्या जीवनातील छोटे अनुभव, संगती - विसंगती दाखवीत लेखिका आपल्याला शेवटी विचारप्रवृत्त करते. वरवर आकर्षक, दिखाऊ, संपन्न समाज नेमका कोणत्या दिशेला चालला आहे? काळाबरोबर चालताना निष्ठांची घसरण होत नाही ना? आजच्या जगण्याचे दूरगामी परिणाम काय होतील? या सर्वांचा विचार करायला लेखिका प्रवृत्त करते. जुन्या जीवनमूल्यांकडे मंगला गोडबोले स्वतंत्र 
वृत्तीने पाहतात आणि मूल्याधिष्ठित 
जगण्यासाठी आपल्याही विचारप्रवृत्त करतात.

प्रत्येक छोट्या लेखात वेगळा विषय आहे. का लेखात लेखिका १९७० नंतर वाढलेल्या विज्ञानाच्या प्रवाहात वैज्ञानिक दृष्टी आली का? असा परखड सवाल करतात. कॉम्प्युटर खरेदी शुभ दिवस, मुहूर्त बघून आणणाऱ्यांचे निरीक्षण मिस्कीलपणे नोंदवितात. विसंगतीवर बोट ठेवतात. वाहन चालविताना कायदा न पाळणारे पकडले गेल्यास चिरीमिरी देऊन सुटतात. आपणही यावर बोलतो, पण लेखिकेतील समाजचिंतकाला वेगळा प्रश्‍न सतावतो, घाबरवतो. तो म्हणजे त्या वाहकाच्या शेजारी बसलेल्या मुलाने हे सर्व पाहिले आहे तर पुढे तो कसा बनेल? ही वाट खूप धोक्‍याची आहे. स्पर्धेत हरल्यावर किती कारणे सांगितली जातात, त्यावर एका लेखात टिप्पणी आहे व कुठले विचार आपण मुलांमध्ये रुजवतो, 

पुढच्या आयुष्यासाठी कुठली विचारांची, मूल्यांची शिदोरी आपण देतो? हा प्रश्‍न वाचकांना त्या विचारतात. तेव्हा धोक्‍याची 
वाट वाचकांनाही दिसते. संगीत महोत्सव, साहित्य मंडळाच्या निवडणुका त्यातील  बदलते प्रवाह, प्रतिभावंतांची गळचेपी यावर 
त्या नेमके बोट ठेवतात. एका लेखात  ओघाने आलेली विंदांची कविता आपल्यालाही व्यथित करते. विचार करायला लावते. 
स्त्रीचे दिसणे, बांधा यावरही लेखिका विचारप्रवृत्त करते. वरवर छोट्या वाटणाऱ्या घटनांमध्ये लेखिकेला दिसलेले धोके मग आपल्यालाही दिसू लागतात. हे सर्व अंतर्मुख करणारे आहे.

समाजातील साहित्य, संस्कृती, कला, परंपरा यांची तोडफोड होत आहे. पण पुढे काय? याचे विश्‍लेषण नदीच्या उपमेतून लेखिका फार छान पद्धतीने करतात. या लेखांमध्ये पडलेले समाजाचे प्रतिबिंब वाचकाने पहावे, त्यावर विचार करावा आणि ते नितळ करण्याचा प्रयत्न करावा, हा लेखिकेचा हेतू आहे. लेख वाचता - वाचता लेखिकेची दृष्टी वाचकांमध्ये परावर्तित करण्याचे कसब या लेखात आहे.

सकाळ प्रकाशनाची उत्तम छपाई, संदीप देशपांडे यांचे विषयानुरूप मुखपृष्ठ यामुळे पुस्तक उत्तम सजले आहे.
 

संबंधित बातम्या