स्नेहबंधांची स्मरणयात्रा 

प्रतिमा दुरुगकर
सोमवार, 1 एप्रिल 2019

पुस्तक परिचय
 

‘हरवलेले स्नेहबंध’ हा नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेला स्मरणलेखांचा संग्रह असून रोहन प्रकाशनाने तो प्रकाशित केला आहे. 

आपल्या जीवनात कुटुंबीय, सखे, सोयरे, सहकारी, मार्गदर्शक अशा अनेक रूपात अनेक व्यक्ती येतात. लेखकाच्या जीवनात आलेल्या या स्नेह्यांनी त्यांचे अस्तित्व अर्थपूर्ण केले. अशा व्यक्तींच्या वियोगानंतर (मृत्यूनंतर) लेखकाच्या मनात जे आले, त्या स्नेहबंधांच्या या आठवणी आहेत. लेखकाने मनोगतात म्हटल्याप्रमाणे ‘ही व्यक्तिचित्रे नाहीत. केवळ आठवणींच्या नोंदी आहेत.’ 

लेखकाचा स्नेह अनेक प्रतिभावंतांशी जडला; त्या व्यक्तींनी लेखकाला स्नेहाबरोबर ‘विचार’ दिले, दृष्टी दिली. त्यांच्या जाण्याने काहीतरी ‘गमावले’ ही जाणीव जेवढी तीव्र आहे, तेवढीच त्यांच्या स्मृतींच्या उजेडात काही ‘गवसल्याची’ जाणीवही तीव्र आहे. आकाराने छोटे असे हे मोठ्यांचे स्मरणलेख वाचकालाही खूप काही देऊन जातात. स्मरणलेखांची सुरुवात संयुक्त राष्ट्रसंघातील एक कार्यक्षम अधिकारी, इंदिरा गांधींचे चिटणीस, महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. अलेक्‍झांडर यांच्या आठवणीने होते. तर, शेवट वडिलांच्या आठवणीने होतो. या दरम्यान आपल्याला अंतस्थ अनंताच्या प्रवासाला गेलेले पी. व्ही. नरसिंहराव, विश्‍लेषक विचारवंत अरुण टिकेकर, लोकमान्यांचे हरकामे वासुकाका ऊर्फ वासुदेव गणेश जोशी, इहवादी ऋषी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नितळ मनाचे मास्तर ग. प्र. प्रधान, सत्यनिष्ठ समाजेतिहासकार य. दि. फडके, साहित्याचा सखा श्री. पु. भागवत, ‘आता नाही जवळ नि दूर’ म्हणत निघून गेलेले बा. भ. बोरकर, गाता गाता गळून गेलेलं पिकलं पान मंगेश पाडगावकर, तुरुंगातील विं. दा. करंदीकर, वडीलधारी मैत्रीण शांताबाई किर्लोस्कर अशी अनेक स्नेही मंडळी भेटतात. 

या सर्वांच्या जाण्याने विचारात जे तरंग चपळगावकरांच्या मनात उठले, ते त्यांनी सहजतेने लेखात उतरविले आहेत. म्हणूनच वाचक त्या आठवणी त्यांच्या नजरेतून पाहतो. ‘कोकणीतील ‘पायंजणा’ ही कविता म्हणताना बा. भ. बोरकरांचे सगळे शरीर कसे गात होते एवढे आजही लक्षात आहे,’ हे वाचताना वाचकही तो अनुभव घेतात. अरुण टिकेकरांच्या मृत्यूनंतर मित्र गमावल्याचे वैयक्तिक पातळीवरचे दुःख झाल्याचे लेखक सांगतातच, पण त्याही पलीकडे जाऊन ‘समाज जीवनाच्या इमारतीची वैचारिक बाजू ढासळत चालली आहे, हे ओळखणारा विश्‍लेषक गमावला,’ ही खंत या स्मरणलेखाला वेगळ्या उंचीवर नेते. लोकमान्यांचा हरकाम्या वासुकाका यातील ‘हरकाम्या’ शब्दाचा वेगळा अर्थ लेखक उलगडून दाखवितात. इहवादी ऋषी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ज्ञानपरंपरेकडे पाहण्याची नवी दृष्टी कशी दिली, याचे स्वानुभव कथन त्यांच्या स्मरणयात्रेत येते. 

वाचकालाही अनुभव समृद्ध करणारी ही प्रतिभावंतांची स्मरणयात्रा म्हणूनच वाचनीय व मननीय आहे. राहुल देशपांडे यांची व्यक्तिचित्रांची रेखाचित्रे त्या त्या व्यक्तींना आपल्यापुढे साक्षात उभी करतात. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे.

संबंधित बातम्या