माणदेशाचे प्रभावी वर्णन

संपत मोरे
गुरुवार, 24 मे 2018

पुस्तक परिचय
माणदेश दरसाल दुष्काळ 
लेखक :
आनंद विंगकर
प्रकाशक : लोकवाङ्‌मय गृह, मुंबई 
किंमत : २५० रुपये.
पाने : १८० 

माणदेश आणि माणदेशी माणूस याचं प्रभावी वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांच्या साहित्यातून केलं आहे. दक्षिण महाराष्ट्रातील माण, सांगोला,आटपाडी या तालुक्‍यातील गावं याबरोबरच जत, पंढरपूर तालुक्‍यातील काही गावांचा मिळून माणदेश असल्याचं अभ्यासकांची नोंद आहे. माडगूळकर यांच्या काही कथा,’माणदेशी माणस’हा व्यक्तिचित्रणात्मक अक्षरग्रंथ, नंतरच्या काळात चित्रपटाच्या माध्यमातून आलेली ‘बनगरवाडी‘कादंबरी या पुस्तकातून माणदेशी जीवन ठळकपणे आलेलं आहे. पण या पुस्तकांना बरीच वर्षे झालीत. माणदेशाचं सध्याच वास्तव तसंच आहे काय? असा प्रश्न माणदेशाचे वर्णन वाचताना वाचकांना पडतो. याच प्रश्नांच उत्तर लेखक कवी असलेल्या आनंद विंगकर यांच्या ‘माणदेश दरसाल दुष्काळ’या पुस्तकातून मिळते. मुळात कवी,कार्यकर्ता असलेल्या विंगकर यांनी माणदेशातील खेड्यात फिरून तिथले वर्तमान टिपले आहे. त्यांनी अनेक अंगांनी तिथलं वास्तव शोधून ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एका सर्वेक्षणाच्या निमित्तानं लेखक या भागात फिरला पण नंतरच्या काळात ते केवळ सर्व्हेच काम न राहता त्याचा शोध सुरू झाला. अनेक गोष्टी, माणसं, रूढी,समज,अभिनिवेश, या बाबी समोर आल्या. संवाद हा लेखकाचा मूळ पिंड असल्याने त्याला बोलणाऱ्या माणसांना आणि न बोलणाऱ्या परिस्थितीलाही समजून घेता आलं. मग लेखकाला जे दिसलं ते त्यानं वेगवेगळ्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला.

विंगकर या पुस्तकात माणदेशी माणसाच्या पाचवीला पूजलेल्या दुष्काळावर भाष्य करतात, पण यासोबतच जे नवे प्रश्न आलेत ते समर्थपणे मांडतात. रिपोर्ताजच्या शैलीत त्यांनी माणदेशाची सद्य परिस्थिती मांडत वाचकांच्या बोटाला धरून माणदेश फिरवून दाखवला आहे. पण त्यांचा रिपोर्ताज पारंपरिक नाही. त्यात नवेपणा आहे. मराठीत अनिल बर्वे, अनिल अवचट, निळू दामले, दत्तप्रसाद दाभोळकर, संध्या नरे पवार,राजा कांदळकर यासह मान्यवर लेखकांनी रिपोर्ताजची बाजू समृद्ध केली आहे. या लेखकांचे त्या त्या शैलीतील रिपोर्ताज वाचकांना भावले आहेत. विंगकराचा रिपोर्ताज वेगळा आहे. त्याची शैली काव्यात्म वाटते. या प्रकारचा तो पहिलाच रिपोर्ताज आहे. बाज्या बैज्याच्या खिंडीपासून ते पाणीपरिषदेपर्यन्तचा लेखकाचा प्रवास वाचकाला अनेक अंगांनी समृद्ध करतो. माणदेशाचे प्रश्न मांडताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी खुंटलेला माणदेशाचा विकास, अजून कोणत्याही नकाशावर न आलेली गावं, कसलीही ओळख न मिळालेली माणस, याची नोंद घेतली आहे.ही नोंद घेताना लेखक संवाद करत चालला आहे. त्यांच्या ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट ‘हा कादंबरीतही ते आलेलं आहे. वाचक समोर बसला आहे आणि त्याच्याशी लेखक बोलतोय असंच या पुस्तकात सतत वाटत रहात.

माणदेशी माणसांचे केवळ प्रश्न आणि तिथल्या सार्वत्रिक समस्या याच गोष्टीवर लेखक बोलत नाही. तिथल्या संस्कृतीवर, विधायक रूढी परंपरा, लोकजीवन,सामाजिक ,राजकीय घडामोडी यावर लेखकाचा संवाद सुरू राहतो. लेखक माणदेशाच्या सीमेलगत असलेल्या चितळी या गावात नोकरीच्या निमित्तानं राहिला असल्याने त्याला माणदेश आणि तिथली माणसं जवळून पाहता आली. तिथल्या माणसांवर त्याचा लोभ जडला, त्यांच्याविषयी मनात अपार प्रेम दाटून आलं. या प्रेमातूनच लेखक माणदेश समजून घ्यायला गेला. जितकं तळात जाऊन समजून घेता आल तितकं त्यानं समजून घेतलं.याच दरम्यान काही गाव,घर त्याची स्वतःची झाली. मारकड वस्तीवरच मारकड कुटुंब त्यांच कसं झालं? हे लेखकाला कळत नाही आणि वाचकालाही. माणदेशी माणसंच वर्तमान समजून घेताना लेखक रडतो आणि रडवतोही. हे सहज होतं आणि झालं आहे.

इतर रिपोर्ताजमध्ये बरोबर आलेल्या दोस्तांची दखल घेतली जात नाही पण या रिपोर्ताजमध्ये लेखक बरोबरच्या दोस्तांची नोंद घेतो त्यांची ओळख सांगतो आणि तो जी गोष्ट समजून घ्यायला निघाला त्या दरम्यानच्या दोस्तांच्या प्रतिक्रियाही त्यांच्या मर्यादेसह समजून घेतो. पैलवान समीर पवार यांच्यापासून ते बातमीदार अंकुश चव्हाण हे दोस्त विंगकर यांना भटकंती करताना भेटतात.

‘माणदेश दरसाल दुष्काळ हे काय आहे असं विचारलं ते एवढंच सांगता येईल माणदेशावर जिवापाड प्रेम करणाऱ्या एका कार्यकर्ता वृत्तीच्या लेखकाने सांगितलेले माणदेशाचे वर्तमान आहे. 

संबंधित बातम्या