देखणे, माहितीपूर्ण आणि संग्राह्य

श्रीनिवास निमकर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

पुस्तक परिचय

खिका सीमंतिनी नूलकर कित्येक वेळा लदाखला जाऊन आल्या आहेत. तेथील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मिसळल्याने त्यांना तेथील नैसर्गिक व इतरही सर्वप्रकारच्या समस्या मुळापासून समजल्या आहेत. यातील काही समस्या सरकारने तसेच आपल्यासारख्या इतर नागरिकांनीही (आपापल्या मार्गाने), मनावर घेतले तर सुटण्यासारख्या आहेत हेदेखील लेखिकेने त्यांच्या ‘लदाख - भारताचा अद्‍भुत मुकुटमणी’ या पुस्तकात आवर्जून, वेळोवेळी आणि पोटतिडकीने नमूद केले आहे... आणि पुस्तकाचा हाच गाभा त्याला वेगळेपण देणारा आहे. कारण लदाखकडे आत्तापर्यंत फक्त लष्करी (म्हणजेच राजकीय) आणि साहसी पर्यटनाच्या दृष्टीनेच पाहिले गेले आहे, लदाखींना काय वाटते हे समजून घेण्याचा विचार आणि प्रयत्न कोणीच खोलात जाऊन केलेला नाही, असे नूलकर म्हणतात. 

भारत, चीन आणि पाकिस्तान या तिन्ही देशांच्या संदर्भात लदाख हा भूभाग कायमच वादग्रस्त आणि त्यामुळे चर्चेत राहिला आहे. ऑगस्ट २०१९ पासून (३७० वे कलम रद्द केल्यानंतर) लदाख केंद्रशासित प्रदेश झाला आहे, परिणामी तेथील राजकीय व लष्करी चित्र कदाचित बदलेलही. मध्य आशियाशी संपर्क साधण्याच्या ‘सिल्क रूट’सारख्या पारंपरिक मार्गांवरील महत्त्वाचा टप्पा असलेला या भूभागाकडे भारतीयांपेक्षाही परदेशी व्यापारी व धाडसी प्रवाशांचे किती व कसे लक्ष होते, ही माहिती लदाखी लेखक, गाढे अभ्यासक व सांस्कृतिक दूत नवांग छेरिंग शाकस्पो यांनी प्रस्तावनेत विस्तृतपणे दिली आहे. ‘लडाख’ असा उच्चार करणाऱ्‍यांना तिथला पोरगेलासा ड्रायव्हरही सांगतो, ‘लडाख नहीं लदाख बोलिए, हम लड़ाकू* हैं क्या?’ (*युद्धखोर वृत्तीचे). आपल्याच नागरिकांचे लदाखविषयीचे अज्ञान पाहून लेखिका उद्विग्न होते, उदा. लदाखसाठी पासपोर्ट लागतो का? तिथे रुपया चालतो का? इ. इ. ‘थ्री इडियट्स’मध्ये दाखवलेले प्यांगॉँग लेक पाहून चित्कारण्यापलीकडे आपण काहीच करत नाही, असे लेखिका म्हणते आणि पुस्तकात वारंवार दिलेले संदर्भ आणि मांडलेले प्रसंग वाचून ते म्हणणे दुर्दैवाने सत्य असल्याचे जाणवते. 

‘जेथील बर्फ कधीही वितळत नाही असा प्रदेश,’ हे लदाखचे वर्णन रोमँटिक वाटेल आणि आहेही, परंतु त्यामुळेच तेथील दैनंदिन जीवन (अन्नपदार्थांपासून वाहतुकीपर्यंत) विलक्षण खडतर आहे! लेखिकेने कित्येकदा ते अनुभवल्याने व पाहिल्याने त्यांचे वर्णन टोकदारपणे येते. लदाखच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरा, बौद्ध धर्माचे तेथील स्वरूप, लदाखचे मूलनिवासी द्रोक्पा लोक, रौद्रभीषण निसर्ग, वैशिष्ट्यपूर्ण प्राणी-पक्षी आणि वनस्पती-फुले यांचे वर्णन आणि विवरण देणारी स्वतंत्र प्रकरणे पुस्तकात आहेत. साहसी पर्यटकांना खुणावणाऱ्‍या बाबींचा समावेश ‘द लँड ऑफ एंडलेस डिस्कव्हरीज’ यात आहे. ‘द लास्ट पोस्ट’ हे प्रकरण मात्र लदाखची सद्यःस्थिती कोणत्याही ‘शुगर-कोटिंग’खेरीज सांगते व पर्यटनापलीकडे विचार करणाऱ्‍यांना फार त्रास होतो - ‘...२०११ च्या ढगफुटी आणि पुरानंतर लदाखी मनुष्य मात्र अधिकच कोरडा झाला आहे, कारण उर्वरित भारत त्याच्या समस्या आणि वेदना समजून घेत नाहीये. भूगोलानुसार लदाख काश्मीरजवळ असला तरी येथील संस्कृती, भाषा पूर्णपणे वेगळ्या आहेत. काश्मिरींच्या बुरख्याआडून परकीय शत्रू इथे बस्तान बसवत आहेत, तर चिनी वस्तूंनी स्थानिक वस्तू हद्दपार केल्या आहेत. सरहद्दीवरून बेकायदा जाणे-येणे अव्याहत सुरू आहे. सर्वांना सर्व माहीत आहे परंतु त्याबाबत करत कोणीच काही नाही. लदाखला बदली होणे म्हणजे पांढऱ्‍या बर्फाची शिक्षा मानली जातेय...’ 

डॉ. अब्दुल कलाम यांच्या पुढाकारानंतर खूप सकारात्मक बदल होऊ लागले, लष्कराच्या व स्थानिकांच्या गरजा भागवण्याचे प्रयत्न वेगाने झाले. उदा. तेथील हवेतही अथक काम करणाऱ्‍या ‘झांस्कर पोनी’ या संकरित खेचराचाही वापर सुरू झाला. परंतु या बाबींचे लेखिकेला वाटलेले कौतुक फार काळ टिकू शकत नाही, कारण स्थानिकांनी सांगितले, ‘अपनी आखरी पोस्ट से केवल छः किमी. दूर चाइना ने सिक्स लेन हाइवे बनाया है और हम यहाँ ॲनिमल्स पर निर्भर हैं।’ लदाख हा एक ‘त्रास’ का आहे याचे स्पष्टीकरण नूलकरांनी एका परिच्छेदात मलपृष्ठावर दिले आहे. 

माझ्यासहित बहुसंख्य वाचकांची एक सवय असते, पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून झाले की आतल्या पानांवर नजर टाकण्याचे काम, डाव्या हाताच्या अंगठ्याने, शेवटच्या पानापासून सुरू केले जाते! ‘लदाख - भारताचा अद्‍भुत मुकुटमणी’बाबत मीही हेच केले. कारण शीर्षक आणि मुखपृष्ठावरून आशय उघड होताच. परंतु, शेवटच्या  

जवळजवळ वीस पानांवर पसरलेल्या, आशयाला पूरक माहितीचा परिपूर्ण आवाका पाहून बरे वाटले. स्थलवर्णन किंवा प्रवासवर्णन बरेचदा विषय-वस्तूपुरतेच सीमित राहते, त्यासंबंधीची इतर व्यावहारिक माहिती सुटसुटीत स्वरूपात दिली जात नाही. त्यादृष्टीने येथील परिशिष्टे नक्कीच उपयुक्त आहेत.

पुस्तकाचे रूप देखणे व मांडणीचा क्रम योग्य आहे. स्थानिक शब्दांचा परिचय वाचताना होतोच, शिवाय भरपूर, उत्कृष्ट आणि समर्पक छायाचित्रांमुळे ‘शब्दांपलीकडची’ माहितीही सर्व प्रकारच्या वाचकांना लगेच मिळेल. ‘डबल-स्प्रेड’ मुखपृष्ठावरील स्पॉट-ग्लॉस तंत्राने दर्शवलेले बौद्ध भिक्षू प्रथमदर्शनीच जाणवतात. पुस्तक नक्कीच संग्राह्य आहे.

०००
लदाख - भारताचा अद्‍भुत मुकुटमणी
लेखिका - सीमंतिनी नूलकर
प्रकाशन - अनुभव अक्षरधन, मुंबई 
किंमत - ४५० रुपये
पाने - १४३

संबंधित बातम्या