पाककृतींचा खजिना

सुजाता नेरुरकर
सोमवार, 20 मे 2019

पुस्तक परिचय

वसुंधरा पर्वते यांचे ‘परफेक्‍ट मेनू’ हे पाककलेचे पुस्तक अलीकडेच ‘मेनका प्रकाशन’तर्फे प्रकाशित झाले. या अगोदर त्यांची पाककलेची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. परफेक्‍ट मेनू हे पाककलेचे पुस्तक खरेच परफेक्‍ट आहे, असे म्हणायला हरकत नाही. या पुस्तकाचा विषय अगदी वेगळा व महिलांसाठी अगदी उपयुक्त असून पुस्तकामध्ये पाककृतीचे ८७ परिपूर्ण मेनू दिलेले आहे. 

‘परफेक्‍ट मेनू’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये वसुंधरा पर्वते यांनी खूप छान माहिती दिली आहे. लग्नसमारंभ, सणवार, वाढदिवस, अधिवेशन, कॉन्फरन्स किंवा घरगुती समारंभ असला, तर अशा प्रसंगी आपल्याला नेहमी मेनू काय करायचा प्रश्न पडतो. प्रत्येक वेळी बाहेरून आणणे सोईस्कर होत नाही. अशा वेळी आपण घरीच कशा प्रकारचा मेनू करू शकतो, हे छान सांगितले आहे. आपण घरी स्वतः केले, तर त्याचा आनंद अगदी वेगळाच असतो. पाहुणे येणार असतील, तर सकाळी नाश्‍त्याला किंवा दुपारच्या चहाला, जेवणात काय करायचे, स्वागतासाठी तसेच गोड पदार्थ काय करायचा, या प्रश्‍नांची उत्तरे मेनूसहित त्यांनी सांगितली आहेत. पुस्तकामध्ये साधारणपणे महाराष्ट्रीय पद्धतीच्या शाकाहारी पदार्थांच्या ४०० हून अधिक पाककृती आहेत.

आपल्या घरी कोणताही समारंभ करायचा ठरवले, तर त्याची पूर्वतयारी कशी करायची, ज्यामुळे ऐनवेळी घाई-गडबड होणार नाही. तसेच अगोदरच सगळा बेत ठरवून सगळी तयारी कशी करायची, हेदेखील पूर्वतयारी या सदरामध्ये दिले आहे. त्यामुळे पाहुण्यांचे आदरातिथ्यपण छान होईल व आपल्यालासुद्धा त्रास होणार नाही. 

‘परफेक्‍ट मेनू’ पुस्तकात वेगवेगळे सहा भाग दिले आहेत. ते म्हणजे, ब्रेकफास्ट आणि ब्रंच मेनू, दुपारच्या-रात्रीच्या जेवणाचे मेनू, दुपारच्या सत्रातले मेनू, संध्याकाळचा फराळ, पारंपरिक मेनू व वन डिश मिल.

ब्रेकफास्ट आणि ब्रंच मेनू यामध्ये रोज सकाळी कोणता नाश्‍ता करायचा किंवा त्याबरोबर कोणता गोड पदार्थ करायचा हे मेनूसह दिले आहे. तसेच काही वेळेस आपण नाश्‍ता न करता ब्रंच करतो, म्हणजेच नाश्‍तासुद्धा होतो व दुपारचे जेवणसुद्धा होते. त्यासाठी भरपेट ब्रंच करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ दिले आहेत. 

दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण म्हणजेच आपले मुख्य जेवण या भागामध्ये आपले नेहमीचे मेनू न करता वेगवेगळी सूप, चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, उसळी, पुलाव, वेगवेगळे भात, आमटी, तोंडी लावणे, पराठे, स्वीट डिश, डेझर्ट असे छान मेनू दिले आहेत. काही वेळेस अचानक आपल्या घरी पाहुणे येतात, तेव्हा झटपट जेवणाचे बेत कसे करायचे किंवा कोणाचा उपवास असेल, तर त्याच्यासाठीसुद्धा कसा बेत करायचा हे सविस्तरपणे दिले आहे.

दुपारी चहा बरोबर रोज काहींना काही हलका नाश्‍ता लागतो. त्याचेसुद्धा अनेक पदार्थ आहेत. दुपारी चहा बरोबर पचायला हलका व त्याबरोबर एखादा गोड पदार्थ करून मुले व घरातील मोठेसुद्धा खूष होतील अशा प्रकारचे मेनू आहेत. संध्याकाळी म्हणजे सहा ते सात वेळेत कधी पाहुणे येतात किंवा आपल्या घरातील मंडळी घरी उशिरा आली, तर मग त्यावेळी चहा किंवा कॉफी करणे योग्य नाही. मग पोटभरीसाठी आरोग्यदायी असे काही पदार्थ करू शकतो. म्हणजेच भेळ, चाट, वडे, डोसे, शेवया वगैरे. मग पाहुण्यांना परत घरी गेल्यावर जेवण करायची गरज भासणार नाही.

आपल्याकडे सणवार असले, की हमखास अगदी गोडा-धोडाचा वेगळा मेनू असतो. नवरात्र, गौरी-गणपती, दिवाळी, दसरा, संक्रांत किंवा होळी या दिवशी आपण नेहमी पंचपक्वान्न करून साग्रसंगीत जेवण करतो. त्यासाठीसुद्धा पूर्ण विविध प्रकारचे मेनू दिले आहेत आणि विशेष म्हणजे ऋतुमानानुसार मेनू दिले आहेत.

आजच्या गतिमान जीवनात महिलासुद्धा दिवसभर कामात व्यग्र असतात. आपल्याला पूर्ण चटणी, कोशिंबीर, भाजी, चपाती, वरण-भात याची सवय असली, तरी कधी कधी हे सर्व पदार्थ करणे शक्‍य होत नाही. मग एखादा पदार्थ किंवा दोन पदार्थ करून भूक भागवावी लागते. तर, त्यासाठीसुद्धा विविध पदार्थ पौष्टिकतेचा विचार करून दिले आहेत.

वसुंधरा पर्वते यांचे ‘परफेक्‍ट मेनू’ हे पाककलेचे पुस्तक खरोखरच उपयुक्त आहे. त्यामुळे आपल्याला स्वयंपाक करताना झटपट मेनू मिळतात. या पुस्तकाची सजावट आकर्षक आहे. तसेच नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी व महिलांसाठी उपयुक्त आहे. या पुस्तकाची किंमतसुद्धा वाजवी आहे. कुठे नाव ठेवायला जागा नाही, इतके छान पुस्तक आहे.


पाककृतींचे रंग
वसुंधरा पर्वते यांचे ‘रुची-रंग’ हे पाककलेचे पुस्तक अलीकडेच ‘मेनका प्रकाशन’तर्फे प्रकाशित झाले. या अगोदर त्यांची पाककलेची ‘मुलांसाठी डब्बा’,  ‘स्वाद संवाद‘, ‘जिन्नस परदेशी, लज्जत स्वदेशी’ व ‘उपकरण एक, पदार्थ अनेक’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘रुची-रंग’ पाककलेचे पुस्तक रस, गंध, स्वादाबरोबरच रंगाचा वापर करून साकारलेली ४४० हून अधिक पदार्थांची खाद्यजत्रा आहे, असे म्हणायला हरकत नाही. ‘रुची-रंग’ पाककलेच्या पुस्तकाचा विषय अगदी निराळा आहे. या पाककलेच्या पुस्तकात रंगसंगती वापरून पदार्थ सादर केले आहेत. ‘रुची-रंग’ पुस्तकासाठी वसुंधरा पर्वते यांना  ‘GOURMAND cookbook Award’ मिळाले आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

हिरवीगार चटणी असो वा लालभडक टोमॅटो सूप असो, पिवळे धमक वरण असो किंवा केशरी भात असो, प्रत्येक रंगाचे आकर्षण असते. छान रंगीत पदार्थ बघितले, की आपल्याला त्या पदार्थाबद्दल रुची वाढते. ताटात विविध रंगांचे स्वादिष्ट पदार्थ बघितले, की आपले लक्ष वेधले जाते व ते पदार्थ खाऊन बघायची ओढ निर्माण होते. प्रत्येक रंग हा त्या पदार्थाविषयी तसेच त्यातील पोषक घटकांविषयी नकळत सांगतात. हिरवा, लाल, केशरी, पिवळा, जांभळा, पांढरा असे विविध रंगांचे पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

‘रुची-रंग’ या पुस्तकात मनोगतामध्ये प्रत्येक पदार्थ कशा प्रकारे रंगसंगतीने अगदी उत्कृष्ट होतो ते सविस्तरपणे सांगितले आहे. या पुस्तकात हिरवा, लाल, पांढरा, पिवळा, तपकिरी, जांभळा-काळा रंग या प्रत्येक रंगाविषयी माहिती, त्याचे महत्त्व व त्याचे वेगवेगळे पदार्थ, म्हणजेच भाज्या, चटणी, कोशिंबिरी, आमटी, भात, गोड पदार्थ इ. दिले आहेत.

हिरवा रंग म्हटले, की हिरव्या रंगाच्या भाज्या, त्या भाज्यांचे महत्त्व, त्यातील पौष्टिकता, जीवनसत्त्व, क्षार या सगळ्यांचा विचार करून हिरव्या रंगाचे नानाविध पदार्थ दिले आहेत. अशाच प्रकारे लाल रंग, पांढरा रंग, पिवळा रंग, तपकिरी रंग, जांभळा रंग-काळा रंग यांचेसुद्धा भाज्यांचे महत्त्व, त्यातील पौष्टिकता, जीवनसत्त्व, क्षार यांचा विचार करून वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ दिले आहेत.

वसुंधरा पर्वते यांनी शेवटच्या भागामध्ये रंगीबेरंगी पदार्थ यामध्ये अनेक प्रकारचे सॅलड, सूप, पुलाव व काही बेकिंगचे पदार्थ दिले आहेत. यामध्ये तिरंगी पुलाव, सप्तरंगी कुकीज, चार रंगी भाजी, आकर्षक सॅलड अशा प्रकारचे पदार्थ आहेत. तसेच केकवर आयसिंग करताना नैसर्गिक रंग कसे वापराल, अशा टिप्सही दिल्या आहेत. 

नावाप्रमाणेच या पुस्तकात रुची आणि रंग यांचा मिलाफ साधण्याचा छान प्रयत्न केला आहे. यामध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या पदार्थांच्या पाककृती पाहायला मिळतात. ‘रुची-रंग’ हे पाककलेचे पुस्तक महिलांना नक्की आवडेल. प्रत्येकीच्या संग्रही असावे, असे हे पुस्तक आहे. पुस्तकाची मांडणीही आकर्षक आहे. एकंदरीत पुस्तक अगदी छान आहे.

संबंधित बातम्या